Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 December 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
पाच
राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये, तेलंगणा वगळता इतरत्र मतमोजणीचे कल सत्ताधाऱ्यांच्या
विरोधात असल्याचं स्पष्ट झालं आहे. तेलंगणात मात्र सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती
सत्ता राखण्यात यशस्वी ठरली आहे. छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेसनं
आघाडी मिळवली आहे. मिझोराममध्ये सत्ताधारी काँग्रेसला मागे टाकून मिझोराम नॅशनल फ्रंट
या प्रादेशिक पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.
मिझोराममध्ये
एकूण ४० जागांपैकी २४ जागा मिझो नॅशलन फ्रंटनं जिंकल्या आहेत. काँग्रेस पाच, भाजप एक
आणि आठ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
छत्तीसगढमध्ये
एकूण ८४ जागांपैकी काँग्रेस ६४ आणि भारतीय जनता पक्ष १७ जागांवर आघाडीवर आहे.
मध्य
प्रदेशमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एकूण २३० जागांपैकी भाजपनं एका जागेवर
विजय मिळवला. काँग्रेस ११५, भाजप १०५ जागांवर, तर अन्य नऊ जागांवर आघाडीवर आहेत.
राजस्थानमध्ये
एकूण १९९ जागांपैकी काँग्रेसनं २२ जागा जिंकल्या असून, ७८ जागांवर आघाडी मिळवली आहे.
भाजपनं १४ जागा जिंकल्या असून, ५९ जागांवर आघाडी मिळवली आहे.
तेलंगणात
एकूण ११९ जागांपैकी तेलंगणा राष्ट्र सतिमीनं २५ जागा जिंकल्या असून, ६३ जागांवर आघाडी
मिळवली आहे. भाजप एक, काँग्रेस १३, तर एमआयएम सहा जागांवर आघाडीवर आहे.
****
राज्यातल्या
बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच शासकीय रुग्णालयात
जन्मणाऱ्या बालकांना बेबी केअर कीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या
आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेचा लाभ पहिल्या प्रसूतीसाठीच मिळणार आहे.
प्रधानमंत्री
कृषि सिंचन योजनेंतर्गत बांधकाम सुरु असलेल्या एकूण ४८ प्रकल्पांसाठी नाबार्डकडून सहा
हजार ९८५ कोटी रुपये कर्ज सवलतीच्या दरानं घेण्यास, तसंच राज्याच्या ग्रामीण भागातल्या
महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाची महिला शक्ती केंद्र ही योजना राज्यात राबविण्याचा
निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.
****
स्वच्छता
विषयक जनजागृती करण्यात वारकरी संप्रदायाची भूमिका महत्वाची असल्याचं विधानसभेचे अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित ‘स्वच्छतेचा
महाजागर’ या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियानात आघाडीवर
असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
महाराष्ट्रासह
देशभरात बालकांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र
सरकारनं पॉक्सो कायद्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा करून बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारासाठी
आरोपीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद केली असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा
विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण अधिनियम २०१२
- पोक्सो आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेल्या सुधारणांबाबत, महाराष्ट्र राज्य
महिला आयोगानं औरंगाबाद इथं आज एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती, त्यावेळी
त्या बोलत होत्या.
****
केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथ इथं धक्का-बुक्की करण्यात आल्याच्या
निषेधार्थ आज हिंगोली इथं भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं रेल्वे स्थानकावर रेल रोको
आंदोलन करण्यात आलं. यावेळी पूर्णा-अकोला पॅसेंजर रेल्वे थांबवण्यात आली होती. आठवले
यांच्या सुरक्षेत वाढ करून, त्यांना झेड-प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी
करण्यात आली.
****
धुळे
महानगरपालिकेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये फेरफार केल्याचा
आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, लोकसंग्राम या पक्षांनी केला आहे. ईव्हीएम
मशिनची तात्काळ चौकशी करावी, तसंच ही निवडणूक रद्द करुन मतपत्रिकेवर पुन्हा निवडणूक
घ्यावी, अशी मागणी करत या पक्षाच्या उमेदवारांनी आज महापालिकेवर मूकमोर्चा काढला.
****
हिंगोली
जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराव पतंगे यांचं आज अपघाती निधन झालं,
ते ६४ वर्षांचे होते. त्यांना अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं नांदेड इथल्या खासगी रूग्णालयात
दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भाजपची विविध तसंच
राज्यस्तरीय महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली आहेत.
****
‘झेप
प्रकाशन’ तर्फे पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना देण्यात
येणारे ‘मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पुरस्कार’ आज घोषित करण्यात आले. यात नाशिकच्या
लेखिका प्रतिभा जाधव, जालना इथल्या लेखिका ज्योती धर्माधिकारी, पुण्याच्या कवयित्री
भाग्यश्री देसाई, औरंगाबाद इथले पत्रकार मनोज सांगळे यांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment