Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 2 December 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
देशात
वैद्यकीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकार एक व्यापक धोरण तयार करत असल्याचं
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात
ते आज बोलत होते. जगातल्या विविध भागातून भारतात येणाऱ्या रुग्णांना सर्व प्रकारची
मदत पुरवण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं ते म्हणाले. या रुग्णांसाठी स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण
उपचार असतील, अशी ग्वाही प्रभू यांनी यावेळी दिली.
****
अटल
आरोग्य शिबीराच्या माध्यमातून राज्य शासन आदिवासी आणि दुर्गम भागातल्या शेवटच्या गरजू
व्यक्तिपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
दिली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी नांदुरी इथं आज अटल ग्रामीण
आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वैद्यकीय उपचाराचा खर्च सामान्य माणसाला
परवडत नसल्यामुळे रोगाचं निदान झाल्यावरही अनेक जण उपचार घेऊ शकत नाहीत, याबाबत राज्य
शासनानं आपली जबाबदारी स्वीकारुन गरजू रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मोफत देण्याचा
निश्चिय केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. अशा प्रकारचं हे २७वं आरोग्य
शिबीर असून, सर्व वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी वृत्तीनं सेवा देत असल्याचं पालकमंत्री
गिरीश महाजन यांनी सांगितलं. यावेळी डॉ. तात्याराव लहाने आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित
होते.
****
राज्यात
उद्भवलेली दुष्काळाची परिस्थितीवर मात करण्यासाठी नागरिकांना पिण्याचं पाणी, जनावरांना
पाणी, चारा आणि मागेल त्याच्या हाताला काम देता येईल, यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशील
राहून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी
दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात टंचाई आढावा बैठकीत ते आज बोलत होते. राज्यातली दुष्काळी
परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य शासनानं केंद्र शासनाकडे सात हजार ५०० कोटी रुपयांचा
प्रस्ताव पाठवला असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या ८७ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा
काढला असून, त्यांना मदत मिळणार आहे, तसंच सध्याची टंचाई परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना
पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं
पाटील यांनी सांगितलं.
****
धुळे
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष
रावसाहेब दानवे यांची मतदारांना आवाहन करणारी एक ध्वनीफीत प्रसिद्ध झाली आहे. यावर
आक्षेप घेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांवर
आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या ध्वनीफीतीमध्ये
प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी सामाजिक तणाव निर्माण करणारं वक्तव्य केलं, त्यामुळे याची
चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे.
****
भारतीय
जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे माजी उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्ह्यातले भाजपचे माजी
खासदार डॉ गुणवंतराव सरोदे यांचं आज जळगाव इथं निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. सरोदे
यांनी १९९१ आणि १९९६ असे दोन वेळा जळगाव लोकसभा मतदार संघाचं नेतृत्व केलं होतं. आज
दुपारी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
बुलडाणा
जिल्ह्यात एचआयव्ही एड्सच्या रुग्णांचं प्रमाण शून्य पूर्णांक ३३ टक्क्यांवरुन शून्य
पूर्णांक १७ टक्क्यांवर आलं आहे. गेल्या सात महिन्यात जिल्ह्यात एड्सचे १३९ रुग्ण सापडले
आहेत. यंदा जागतिक एड्स प्रतिबंधक दिनाच्या अनुषंगानं जिल्ह्यात ‘नो युअर एचआयव्ही
स्टेटस’वर भर देण्यात येत असून, यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी
आणि लोकांची तपासणी मोहिम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली
आहे.
****
पालघर
जिल्ह्यात बोईसर रेल्वे स्थानकानजीक खैरा फाटकाजवळं आज रेल्वेखाली येऊन एका १५ वर्षाच्या
मुलाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. आज पहाटे हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात
दाखल करण्यात आल्याचं पोलिस उपनिरीक्षक रविंद्र शिंदे यांनी सांगितलं.
****
सोलापूर
जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात सहा नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या खून खटल्याप्रकरणी
जिल्हा आणि सत्र न्यायालयानं चार महिलांसह नऊ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मौजे हनुमान कुरबावी इथले अशोक रुपनवर यांनी ११ गुंठे जागा विकण्यास नकार दिल्यामुळे
त्यांची हत्या करण्यात आली होती.
****
ओडिशातल्या
भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या पुरूषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत ‘सी’ विभागात भारताचा
सामना आज बेल्जियम विरुद्ध होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
तर आज दुसरा सामना कॅनडा आणि दक्षिण आफ्रीकेदरम्यान सध्या सुरु आहे.
****
No comments:
Post a Comment