Wednesday, 1 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.05.2019 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date 01 May 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मे २०१९  - २०.००

****

लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित तीन टप्यातला प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित  करण्यासाठी प्रचार फेऱ्या काढत आहेत. निवडणुकीचे  आतापर्यंत  चार टप्पे पार पडले असून येत्या सहा तारखेला पाचवा , १२ तारखेला सहावा,  आणि शेवटचा सातवा टप्पा येत्या १९ तारखेला पार पडणार आहे.

****

आजचा भारत हा नवीन भारत असून तो दहशतवादी आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर देईल असं भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तरप्रदेशमध्ये आंबेडकर नगर इथं एका निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आज आपलं भाषण कामगारांच्या समस्यांवर केंद्रीत केलं होतं. गृह योजना, आयुष्यमान भारत, श्रम धन आणि कौशल भारत अभियान यासारख्या विविध योजनां कामगारांसाठी लाभदायी ठरल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.

****

भारतीय जनता पक्षानं काँग्रेस पक्षाला उत्तरप्रदेशातली मतं कापणारा पक्ष म्हटलं आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी काँग्रेस पक्ष हा, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या युतीचे मत कापत नाही तर त्यांना जिंकवू शकणाऱ्या तसंच भाजपला नुकसान पोहचवणाऱ्या उमेदवारांना पक्षानं उभं केलं आहे या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपनं हे विधान केलं आहे. प्रियंका गांधी यांचं हे विधान काँग्रेस पक्षानं आपली हार स्विकारल्याचं द्योतक असल्याचं पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्यांनी काँग्रेसवर नकारात्मक राजकीय खेळी करण्याचा आरोपही यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवणे हाच या पक्षाचा एकमेव उद्देश असल्याचं ते म्हणाले.

याआधी काँग्रेस महा सचिव प्रियंका गांधी यांनी अमेठी मधे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या युतीवर ही टीका केली. त्यांनी  भारतीय जनता पक्षाचे लक्ष जनतेच्या समस्या सोडवण्याकडे असले पाहिजे, त्याऐवजी ते गांधी परीवाराकडून मानसिक त्रास होत असल्याचा आरोप करत असल्याचं त्या म्हणाल्या.

****

वाराणसी लोकसभा मतदार संघातले समाजवादी पार्टीचे उमेदवार तेज बहादुर यादव यांचं नामनिर्देशन पत्र निवडणूक आयोगानं रद्द केलं आहे. तेज बहादुर यांच्या नामनिर्देशन पत्राच्या दोन्ही प्रतींमध्ये विसंगती आढळल्यामुळे वाराणसी निवडणूक अधिकाऱ्यांने काल त्यांना नोटीस जारी केली होती. यासंदर्भात यादव यांनी आपले नामनिर्देशन पत्र चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आले असून या निर्णया विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं.

****

बिहारमध्ये सातव्या आणि अंतिम टप्प्यातल्या निवडणुकीसाठी राज्यातल्या ६५ उमेदवारांचे नामांकन पत्र रद्द करण्यात आले आहेत. या टप्प्यासाठी २२७ उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल केले होते. उद्या अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. या टप्प्यात पाटणासाहिब, नालंदा आणि पाटलीपुत्रसह आठ लोकसभा मतदारसंघात १९ मे रोजी निवडणूक होत आहे.

****

निवडणुकीच्या कार्यकाळात निती आयोगाचा पंतप्रधान कार्यालय दुरूपयोग करत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षानं केला आहे. निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु संघवी यांनी निती आयोगाच्या माध्यमातून पंतप्रधान कार्यालय निवडणूक होत असलेल्या राज्यातून वेगवेगळ्या मुद्यांबाबत माहिती संकलित करत असल्याचा दावा केला. यासंदर्भात काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाकडे सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग होत असल्याची तक्रार केली असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांना निवडणूक प्रचारासाठी आपल्या अधिकाऱ्यांचा आणि सरकारी यंत्रणांचा दुरूपयोग करण्यापासून रोखण्यासाठी निवडणूक आयोगानं संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश जारी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

****

आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निर्दोष असल्याचे घोषित केल्याबद्दल मार्क्‍सवादी कम्‍युनिस्‍ट पार्टीचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी हाताळण्याची निवडणूक आयोगाची पद्धत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना प्रोत्साहन देणारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आदर्श आचारसंहितेच्या तक्रारीमध्ये पंतप्रधानांना निर्दोष घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या पद्धतीबाबत संपूर्ण देशात चिंता व्यक्त केली जात असल्याचं येचुरी यांनी आयोगाला लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

No comments: