Thursday, 2 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.05.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 May 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ मे २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø  गडचिरोली नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात शीघ्र कृती दलाचे १५ जवान शहीद तर खाजगी वाहनाचा चालकही ठार

Ø  हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची विरोधी पक्षांकडून मागणी

Ø  पाकिस्तानमधला जैश- ए- मोहम्म्द या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित

Ø  राज्याचा वर्धापन दिन सर्वत्र उत्साहात साजरा

आणि

Ø  राज्यातल्या चारा छावण्यांची स्थिती सुधारण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी

****



 गडचिरोली इथं काल महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात शीघ्र कृती दलाचे १५ जवान शहीद झाले तर खाजगी वाहनाचा चालकही ठार झाला. जिल्ह्यातल्या कुरखेडा गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जांभूरखेडा गावाजवळ ही घटना घडली. याआधी काल मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातल्या दादापूर इथं नक्षलवाद्यांनी ३६ वाहनं जाळली. पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु असल्यानं हे काम करणाऱ्या कंपनीची अनेक वाहनं दादापूर इथं होती. रात्री दीडशेहून अधिक नक्षलवादी दादापूर इथं गेले. त्यांनी संपूर्ण गावभर शासनाविरोधात बॅनर लावले. आणि त्यानंतर वाहनं आणि इतर यंत्रसामग्रीला आग लावली. या आगीत ११ टीप्पर, डोझर, डिझेल आणि पेट्रोल टँकर, मोठे रोलर अशी तब्बल ३६ वाहनं, मोठे जनरेटर आणि दोन कार्यालयं या नक्षलवाद्यांनी जाळली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुरखेडा पोलिस ठाण्यात असलेल्या शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळाकडे जाण्यास निघाले असता ही घटना घडली. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर



कुरखेडा पोलिस ठाण्यात आसलेल्या अती जलद पथकाचे जवान हे सकाळी ११.०० वाजलेज्या सुमारास एका खाजगी वाहणाने दादापूर कडे जाण्यासाठी निघाले हाते, मात्र, कुरखेडा पासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जांभूरखेडा एका छोट्या पुला जवळ दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी भु-सुरंग  स्फोट घडविला. या स्फोटात वाहणातील १५ जवान आणि वाहन चालक देखील यात शहिद झाले.



आकाशवाणी बातम्यासाठी, मी जयवंत निमगडे, गडचिरोली.



 राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी या हल्ल्याच्या निषेध केला आहे.



 या हल्ल्यातील सूत्रधारांची गय केली जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. पोलीस जवानांवर झालेला हल्ला हा आतताई भ्याडपणाची कृती असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे .



 या हल्ल्यानं आपल्याला वेदना होत आहेत अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याचा निषेध केला.



 या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिस दल तयार असल्याचं राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी सांगितलं. हा हल्ला गुप्तचर यंत्रणांचं अपयश आहे असं म्हणता येणार नाही असंही ते यावेळी सांगितलं.



 भविष्यात नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी अधिक जोमानं लढायचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा निषेध करतांना व्यक्त केला. नक्षलवाद्यांचा हल्ला आणि दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आज राज्य मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.



 या हल्ल्यानंतर काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षानं मुख्‍यमंत्री देवेन्‍द्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेसनं या भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या प्रत्‍येक शहीदाच्या नातेवाईकास ५० लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या हल्ल्याचा निषेध करत, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृह खाते असून या हल्ल्यानं राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्पष्ट होत असल्याचं ते म्हणाले.

****



 नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात ठार झालेल्या जवानांमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या ब्राह्मणवाडा गावच्या संतोष चव्हाण आणि बीड जिल्ह्यातल्या आरिफ शेख यांचा समावेश आहे.

****



 महाराष्ट्र राज्याचा एकोणसाठावा वर्धापन दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठिकठिकाणी ध्वजारोहणही करण्यात आलं. राज्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबईत झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. औरंगाबाद इथं राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, नांदेडमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम, जालन्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, उस्मानाबाद इथं पालकमंत्री अर्जुनराव खोतकर तर बीड इथं पालकमंत्री पंकजा मुंडे तर हिंगोली इथं पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. परभणी इथं जिल्हाधिकारी पी. शिवशंकर तर लातूर इथं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं.

****



 संयुक्त राष्ट्र संघटना- युनोनं जैश- ए- मोहम्म्द या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. संयुक्त राष्ट्र प्रतिबंध समितीनं  काल मसूद अजहर याला दहशतवादी संघटनेच्या यादीत सामील केलं असल्याचं संयुक्त राष्ट्रातले भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी काल ट्विटरवर संदेशाद्वारे सांगितलं. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रांस या देशांनी भारताला पाठिंबा दिल्यानंतरही चीननं मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला चार वेळा विशेषाधिकाराचा वापर करून आडकाठी आणली होती, मात्र आता चीननेही भारताच्या या प्रस्तावाला सहमती दिल्यामुळे संयुक्त राष्ट्राने मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे.



 दरम्यान, हा भारतीय कूटनितीचा विजय असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.

****



हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****



 भारतीय जनता पक्षांचे जेष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या निवडणूक प्रचारादरम्यान, लातूर इथं केलेल्या भाषणात आचार संहितेचं कोणत्याही प्रकारे उल्ल्ंघन झालं नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात आयोगानं राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अहवालाचं परीक्षण केल्यानंतर हे स्पष्टीकरण दिलं आहे.



दरम्यान आयोगानं मध्य प्रदेशातल्या शहडोल इथं केलेल्या भाषणात मोदी यांच्या विरूद्ध कथित व्यक्तव्य केल्याबाबत काँगेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गांधी यांना यावर उत्तर देण्यास ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे.

****



 सरकारनं राज्यातल्या चारा छावण्यांची स्थिती सुधारावी आणि जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्यात वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीची पहाणी करण्यासाठी पवार यांनी दोन दिवसांपासून सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे, त्यात सांगोला तालुक्यातल्या यलमार मांगेवाडी इथल्या चारा छावणीची पाहणी करताना त्यांनी ही मागणी केली. अर्धं राज्य दुष्काळात होरपळत असून, बीड, उस्मानाबाद, धुळ्यासह काही ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करण्यास सरकार, निवडणूक आचार संहितेचं कारण सांगून नकार देत आहेत, याबाबत बोलतांना पवार यांनी, सरकारनं तात्काळ अशा भागात पाण्याचे टँकर्स सुरू करावेत, अशी मागणी केली.

****



 बीड जिल्ह्यात परळी रेल्वे स्थानकाजवळ, दक्षिण मध्य रेल्वेनं हाती घेतलेल्या दुरूस्तीच्या कामामुळे ८, ९, आणि १० मे अशा तीन दिवसांकरता रेल्वे वाहतूक सेवा खंडीत राहणार आहे. यामुळे नांदेड विभागातल्या काही रेल्वे गाड्या पूर्णतः तर काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. पूर्णा ते परळी आणि परळी ते पूर्णा तसंच परळी ते अकोला ही प्रवासी रेल्वे गाडी या तिन दिवसांकरता रद्द करण्यात आली आहे. तर आदिलाबाद ते परळी सवारी गाडी परभणी ते परळी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. परळी ते आदिलाबाद ही गाडी ९ आणि १० मे, रोजी परळी ते परभणी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. अकोला ते परळी प्रवासी गाडी ८ आणि ९मे, रोजी परभणी ते परळी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असल्याचं नांदेदच्या रेल्वे विभागानं कळवलं आहे.

****



 महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं पानी फाउंडेशनकडून काल राज्यात विविध ठिकाणी महाश्रमदान करण्यात आलं. मराठवाड्यातल्या २० गावांमध्ये महाश्रमदान करण्यात आलं, सातारा जिल्ह्यात कोरेगाव इथं अभिनेता अमिर खानने जल मित्रांसह श्रमदानात भाग घेतला. वाशिम इथं जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्यासह गावकऱ्यांनीही श्रमदान केले. सोलापूर मधल्या रानमसले या गावात एप्रिल महिन्याच्या आठ तारखेपासून गावकऱ्यांचं श्रमदान सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा इथंही पानी फाउंडेशनच्या वतीनं महाश्रमदान करण्यात आलं.

****



 बीड जिल्ह्यातल्या विविध साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या दोन हंगामांच्या ऊस बिलाचे, थकवलेले कथित कोट्यवधी रुपये मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आणि धरणं आंदोलन केलं. साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार येत्या वीस दिवसात संबंधित कारखान्यांच्या संचालक मंडळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

****



 न्याय प्रक्रिया राबवताना संबंधित घटकांनी अभ्यासपूर्ण पद्धतीनं न्याय करावा असं मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि बीड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचा उद्घाटन करतांना काल ते बोलत होते. न्याय देतांना पक्षकारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल असा न्याय निवाडा करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

 सांगलीच्या इस्लामपूर इथं एक कोटी रूपयांच्या जुन्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या सर्व ५०० रूपयांच्या नोटा आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. हे तिघेही जण नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शहरातल्या बस स्थानकाजवळ सापळा रचून छापा टाकला. तिन्ही आरोपी वाळवा तालुक्यातल्या किल्ले मच्छिंद्रगड इथले रहिवासी आहेत.

*****

***

No comments: