Thursday, 2 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.05.2019 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 May 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ मे २०१९ सायंकाळी २०.००

****

उन्हाचा वाढता पारा आणि मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यात मतदानाची वेळ सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत करण्याच्या मागणीवर निवडणूक आयोगाने आवश्यक आदेश जारी करावेत अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. तात्काळ सुनावणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. एका वकिलासह दोघां जणांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांनी नियमित वेळेपेक्षा दोन ते अडीच तास अगोदर मतदान सुरू करण्याची मागणी केली होती, न्यायालयानं आयोगाला याबाबत आवश्यक आदेश जारी करण्याचे आदेश देत ही याचिका निकाली काढली.

****

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं आपल्या कार्यकाळात पाकिस्तानविरूद्ध सहा सर्जिकल स्ट्राईक्स केल्याचा खोटा दावा करून काँग्रेस पक्ष लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंहा यांनी केला आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. वायु सेना प्रमुखांनी २००८ मध्ये २६ अकराला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपण पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं, मात्र आघाडी सरकारनं त्यावेळी परवानगी नाकारली होती. सशस्त्र दलाला परवानगी नाकारून काँग्रेस सरकारनं चूक केल्याचा आरोपही नरसिंहा यांनी यावेळी केला.दरम्यान, काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात पाकिस्तानविरूद्ध सहावेळा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते, याची यादी वार्ताहरांना दिली. यापैकी दोन हल्ले हे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना करण्यात आले होते, मात्र त्यावेळी वाजपेयी आणि त्यानंतर पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी या हल्ल्यांची कधीही जाहीर वाच्यता केली नव्हती असं सांगितलं. लष्करी कारवाईबाबत वाच्यता न करण्याची आतापर्यंतची परंपरा आहे, मात्र सध्याच्या सरकारनं ही परंपरा मोडीत काढल्याचं शुक्ला यांनी सांगितलं.

****

लोकसभेच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची मुदत होती. या टप्प्यात आठ राज्यांमधल्या एकूण ५९ लोकसभा मतदारसंघासाठी १९ मे रोजी निवडणूक होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी लोकसभा निवडणूक प्रचारावेळी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याच्या काँग्रेसनं केलेल्या आरोपांबाबत येत्या सहा मे पर्यंत निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला दिले आहेत. या प्रकरणी सादर अकरा पैकी दोन आरोपांवर यापूर्वीच निर्णय घेण्यात आल्याची माहिती या संदर्भात निवडणूक आयोगानं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाला दिली आहे. काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे.

****

भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यावर वयाची साठ वर्षे पूर्ण करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि छोट्या व्यावसायिकांना सहा हजार रुपये निवृत्ती वेतन देणार आहे, असं पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज मध्य प्रदेशातल्या राजगड जिल्ह्यात एका प्रचार सभेत बोलतांला सांगितलं. गरीबांसाठी उज्ज्वला योजनेतून मोफत गॅस,आयुष्यमान योजनेतून मोफत उपचार आणि प्रत्येक नागरिकाला घर यासारख्या योजना राबवून त्यांची गरीबी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचंही शहा यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

****

नोटबंदीमुळे लोकांची आर्थिक कोंडी झाली आणि बेरोजगारीही वाढली अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. झारखंडमधल्या सिमडेगा इथं ते आज एका प्रचार सभेला संबोधित करत होते. काँग्रेस सत्तेत आल्यावर न्याय योजनेतून गरिबांना थेट पैसे दिले जातील असंही त्यांनी या सभेत जाहीर केलं. तसंच कारखानेही सुरु केले जातील जेणेकरुन लाखोंना नोकऱ्या मिळतील आणि आर्थिक स्थिती सुधारेल.

****

भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ इथल्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर घातलेल्या ७२ तासांच्या प्रचारबंदीच्या आदेशावर पुर्नविचार करावा अशी मागणी पक्षानं निवडणूक आयोगाकडं केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे आणि बाबरी मस्जीद प्रकरणी आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पक्ष नेत्या निर्मला सितारामन आणि विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वात काल एका शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली. प्रज्ञा सिंह या राजकारणात नवीन असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. तेव्हा त्याच्यावर करण्यात आलेली कठोर कारवाई मागे घेण्यात यावी, अशी विनंती या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाकडं केल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

गोव्यातल्या पणजी विधानसभा निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झालं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी सहा उमेदवार रिंगणात उरले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सिद्धार्थ कुणकलीयेन्कर, काँग्रेसचे अतान्सियो मोन्सेरेट, आम आदमी पक्षाचे वाल्मिकी नायक, गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर आणि दिलीप घाडी आणि विजय मोरे या दोन अपक्षांचा समावेश आहे. १९ मे रोजी या पोटनिवडणुकीचं मतदान होणार आहे.

****

No comments: