Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 03 May 2019
Time 20.00 to 20.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ मे २०१९ सायंकाळी २०.००
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार उद्या संध्याकाळी संपणार आहे.
सोमवारी सहा मे रोजी या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. प्रचाराचा एकच दिवस शिल्लक असल्यानं सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष
उमेदवारही प्रचार जोरात करत आहेत. यानिमित्त प्रचार सभा, फेऱ्या, कार्यकर्त्यांच्या
बैठका यावर भर दिला आहे.
****
मतदान पडताळणी - वीवीपॅट पावत्यांची इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशी पडताळणी, करण्याची संख्या आणखी वाढवण्याच्या, २१ विरोधी पक्षांच्या पुनर्विचार याचिकेवर, सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी करणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातल्या, एका ऐवजी पाच मतदान केंद्रातल्या, पावत्यांची मतदान यंत्राशी, पडताळणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं, आठ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला दिले होते. मात्र ही संख्या पुरेशी नसल्याचं
सांगत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी पुनर्विचार याचिका दाखल
केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या पीठासमोर या
याचिकेची सुनावणी होणार आहे.
****
भाजपमुळे मंदावलेली अमेठी मतदार संघातली विकास कामं वेगानं करण्याचं आश्वासन,
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे. अमेठीतल्या लोकांच्या बळावर आपण ताकदीनं
उभं राहू आणि त्यांचा आवाज बुलंद करु असं सांगत, भाजप निवडणुकीत अपप्रचार करत असल्याचा आरोप, गांधी यांनी अमेठीतल्या लोकांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राहूल गांधी हे
लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. गांधी-नेहरु परिवारानं अमेठी आणि रायबरेलीच्या
लोकांचा छळ केल्याचं सांगत, विकास केला नसल्याचं ते म्हणाले.
****
दिल्लीच्या गांधीनगर विधानसभा मतदारसंघाचे, आम आदमी पक्षाचे, आमदार अनिल वाजपेयी यांनी आज भारतीय
जनता पक्षात प्रवेश केला. भाजप ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल आणि पक्षाचे
प्रभारी शाम जाजु यावेळी उपस्थित होते.
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि इतर मुद्यांसंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं
आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. मतमोजणीच्या दरम्यान पारदर्शकता निश्चित करण्यासाठी
मतदान यंत्रं आणि केंद्रांची आकडेवारी देण्याची मागणी केल्याचं पक्षाचे नेते अभिषेक
मनू सिंघवी यांनी वार्ताहरांना सांगितलं. अमेठी मतदार संघातल्या सर्व मतदान केंद्रांवर
विशेष निरीक्षक नियुक्त करण्याची मागणीही, या शिष्टमंडळानं आयोगाकडे केली असल्याचं, सिंघवी यांनी सांगितलं.
****
ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुड्डुचेरीतल्या वादळग्रस्त
भागांशी केंद्र सरकार सातत्यानं संपर्कात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. ते आज राजस्थानमधल्या हिंदाऊँ शहरात एका प्रचार सभेत बोलत होते. केंद्र सरकारनं
या वादळाचा सामना करण्यासाठी संबंधित राज्यांना एक हजार कोटी रुपयांहून अधिक मदत दिली
असल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल,
तटरक्षक दल, भारतीय सेना आणि नौदल, मदत आणि बचाव कार्य करत असून, या वादळाच्या
संकटात सर्वजण एकत्रित लढा देत असून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चं हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचं
ते म्हणाले.
लक्ष्यभेदी आणि हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानमधल्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी
ठरवणं हे दहशतवाद आणि त्यांच्या नेत्यांवर झालेला तिसरा आंतरराष्ट्रीय हल्ला असल्याचं
पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयाचा, हवाला देत सांगितलं. दहशतवादाशी सामना करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये कोणतीही
तुलना नसल्याचंही ते म्हणाले.
****
कॉंग्रेस पक्षानं वचन दिल्याप्रमाणे न्याय योजनेद्वारे, देशाच्या अर्थकारणात उसळी येईल आणि नोटबंदी तसंच वस्तू आणि सेवा कर-जीएसटीच्या
माध्यमातून गेलेला पैसा पुन्हा लोकांच्या खात्यात येईल, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल
गांधी यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशातल्या रेवा जिल्ह्यात प्रचार सभेत ते आज बोलत
होते. किमान वेतन योजनेचा पैसा, थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल
असं ते म्हणाले.
****
पंजाबमधल्या अमृतसर जिल्ह्यात भिट्टेवद गावात काल संध्याकाळी पोलिसांनी चार
जणांना पाच किलो हेरोईनसह अटक केली.
****
No comments:
Post a Comment