Saturday, 4 May 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 04.05.2019 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 May 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४  मे २०१ सकाळी ७.१० मि.

****

·       फोनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमधल्या खडकपूर भागात दाखल; ओडिसात आठ जणांचा मृत्यू

·        जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे तीन दहशतवादी ठार; बुऱ्हाण वाणी गटाचा खात्मा

·       माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती न दिल्यामुळं औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ४५ हजार रुपयांचा दंड

आणि

·       जालना शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडून पाणी चोरणाऱ्या १२ शेतकऱ्याविरूद्ध गु्न्हे दाखल

****

ओडिसातल्या प्रचंड नुकसानी नंतर आता फोनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमधल्या खडकपूर भागात दाखल झालं आहे. तासी ९० किलोमीटर वेगानं हे वादळ उत्तर पूर्व दिशेला सरकत आहे. सध्या या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. सायंकाळी हे वादळ बांगला देशाच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या वादळामुळे कोलकत्ता विमानतळांवरची उड्डाणं काल दुपारी तीन वाजल्यापासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत थांबवण्यात आली आहेत. किनाऱ्यावर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. ओडिशात काल या वादळानं अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. पुरी इथं मोबाईल आणि वीज सेवा ठप्प झाली असल्याचं मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सांगितलं. राज्य सरकारनं १३ जिल्ह्यातल्या जवळपास १२ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. आतापर्यंत यावादळामुळे आठ जणांचा मृत्यु झाला आहे.

****

जम्मू काश्मीरमधील शोपियांत जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे तीन दहशतवादी ठार झाले. सैन्य दलाचा एक जवान यात जखमी झाला आहे. शोपिया जिल्ह्यात अदखारा गावात अकराव्या बुऱ्हान वाणी गटाचा दहशतवादी लतीफ अहमद दार उर्फ लतीफ टायगर आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना या कारवाईत ठार करण्यात आलं. लतीफ टायगर हा बुऱ्हाण वाणी गटाचा जिवंत असलेला एकमेव दहशतवादी होता, त्याच्या मृत्यू बरोबरच आता बुऱ्हाण वाणी गटाचा खात्मा झाला आहे.  सैन्य, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त दलातर्फे या भागात तपास आणि नाकेबंदीची कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर काल पहाटे ही चकमक उडाली होती.

                                      ****

गडचिरोलीसारखा नक्षलवादी हल्ला पुन्हा होणार नाही याची खबरदारी केंद्र आणि राज्य सरकार घेईल, असं केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी म्हटलं आहे. काल हैद्राबाद इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. शीघ्र कृती पोलिस दलाच्या जवानांचे वाहन नक्षलवाद्यांनी भूसुरुंग लाऊन उडवून दिल्यामुळे या स्फोटात १५ जवान शहीद झाले होते, याशिवाय वाहनाचा चालक मृत्यूमुखी पडला होता. या घटनेकडे सरकार एक आव्हान म्हणून बघत असल्याचं अहीर यांनी यावेळी सांगितलं. आतापर्यंत नक्षलवाद्यांवर सरकारने वचक निर्माण केल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हा हल्ला केला, मात्र यातील कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

****

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यावर्षीपासून सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांसाठीचं - मराठा आरक्षण लागू व्हावं यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सांगितलं. मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हे आरक्षण या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चालू वर्षापासून लागू करण्यास नकार दिला होता, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. कायदा लागू झाल्यानंतर राज्य सरकारनं प्रवेश प्रक्रिया सुरू केली असल्यामुळे हे आरक्षण या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लागू करता येऊ शकते असं राज्य सरकारचं म्हणण आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. या टप्प्यात सात राज्यातल्या ५१ लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. यामध्ये उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि जम्मू काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. सोमवारी सहा मे रोजी या टप्प्यासाठी मतदान होणा आहे. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्यानं सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही प्रचार जोरात करत आहेत. यानिमित्त प्रचार सभा, फेऱ्या, कार्यकर्त्यांच्या बैठका यावर भर दिला जात आहे.

****

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजप - शिवसेना युतीचा धर्म पाळला नाही अशी तक्रार युतीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे. दानवे यांनी आपले जावई शिव स्वराज्य पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना मदत केल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे, असं पी टीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. मात्र, तरीही आपण मोठ्या फरकाने विजयी होऊ, असा दावा खैरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत खैरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही तक्रार केली असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

रम्यान, भारतीय जनता पक्षाचे राज्य सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघात भाजपने खैरे यांचाच प्रचार केला असल्याचा दावा एका पत्रकाद्वारे केला आहे.

****

माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती वेळेत न दिल्यामुळं राज्य माहिती आयोगानं औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गंगापूर तालुक्यातल्या वडाळी इथले रहिवाशी रामनाथ पाटील यांनी गावातल्या ग्रामपंचायतीशी संबंधित २००५ ते २००९ या कालावधीतली भारत निर्माण योजना, शौचालय अनुदान, वृक्षरोपण, रस्त्याची कामं, लेखा परिक्षण अहवाल अशा १५ विषयांची  माहिती मागितली होती. ही माहिती सदर ग्रामसेवकानं दिली नाही, त्यांनतर पाटील यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपील केले, या अपिलाच्या सुनावणी दरम्यान, ३० दिवसात माहिती देण्याचे आदेश आयोगाने दिले, मात्र त्यांनतरही अर्जदाराला माहिती देण्यात आली नाही, शेवटी माहिती देण्याची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर निश्चित करून त्यांना दंड ठोठावण्यात आला. या काळात औरंगाबाद जिल्हा परिषदेत वासुदेव सोळंके, व्ही. एफ. परदेशी आणि के. बी. क्षीरसागर उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा इथले जवान संतोष चव्हाण यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळ गावी ब्राह्मणवाडा इथं काल सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातले शहद जवान अग्रमन रहाटे यांच्या पार्थिव देहावर आर्णी तालुक्यातल्या तरोडा इथं तर बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शहीद जवान तौसिफ शेख यांच्या पार्थिवावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातल्या ाजु गायकवाड या जवानावर मेहकर इथं तर सर्जेराव खार्डे यांच्या पार्थिवावर आळंद या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. किशोर बोबटे, लक्ष्मण कोडपे, शाहूदास मडावी, पुरणशहा डुग्गा, प्रमोद भोयर आणि योगाजी हलामी यांच्यावर गडचिरोली जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

पैठणच्या जायकवाडी धरणातून जालना शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन, पाचोड ते दावरवाडी दरम्यान फोडून पाणी चोरणाऱ्या १२ शेतकऱ्याविरूद्ध गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत. जालना नगर परिषदेचे नगर अभियंता राजेश बगळे यांच्या फिर्यादीवरुन या शेतकऱ्याविरूद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. व्हॉल्व्हची नासधूस करुन या पाईपलाईनमधले पाणी चोरले जात असल्याचं निदर्शनास आढळून आल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले. यात जालना नगर परिषदेचं जवळपास ३६ लाख रूपयांचं नुकसान झालं आहे.

दरम्यान, या चोरी आणि पाणीगळतीमुळे जालना शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरातल्या अनेक भागात गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा झाला नसल्यामुळं नागरिकांची गैरसोय होत आहे. या प्रार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी जालना- देऊळगावराजा मार्गावर दीड तास रास्तारोको आंदोलन केलं. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

दरम्यान नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यांनी पाणीपुरवठ्याचं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागं घेतलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कुरूंदा गावात काल पहाटे तीनच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आई-वडील आणि मुलगी अशा एकाच कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यु झाला, माळवदाचं घर असल्यानं स्फोटात संपूर्ण घरही जळालं. सोनाजी दळवी, सुरेखा दळवी आणि पूजा दळवी अशी या तिघांची नावं असून गॅसची गळती झाल्यामुळं एकापाठोपाठ दोन स्फोट झाले आणि झोपेत असलेल्या या तिघांचा होरपळून मृत्यु झाला.

****

जालना शहरानजिकच्या राजलक्ष्मी फर्टिलायझर्स कंपनीच्या गोदामावर जिल्हाधिकाऱ्यांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा छापा टाकून बनावट सेंद्रीय खताचा साठा जप्त केला आहे. या ठिकाणी नीम पावर नावानं तयार करण्यात येत असलेलं जवळपास ६३ लाख ३१ हजार रुपये किमतीचं बनावट सेंद्रिय खत आढळून आलं. लवकरच खरिपाचा हंगाम सुरू होणार असल्यानं शेतकऱ्यांना विकण्यासाठी हे खत बाजारात जाणार होतं. या प्रकरणी जिल्हा गुण नियंत्रक सयप्पा गरांडे यांच्या तक्रारीवरुन चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

लातूर शहरातल्या ज्या मालमत्ता धारकांनी आपल्या इमारती वर पावसाच्या पाण्याचं जलपुर्नभरण केलं आहे अशा मालमत्ता धारकांना लातूर शहर महानगरपालिके तर्फे मालमत्ता करावर पाच वर्ष पाच टक्के कर सवलत देण्यात येणार असल्याची माहिती  महापालिका आयुक्त एम डी सिंह यांनी दिली आहे. शहरातल्या भूगर्भातील पाण्याची पातळी खूपच खोल गेली असल्यानं जल पुनर्भरण शहरासाठी अत्यावश्यक झालं असल्याचं ते म्हणाले.

****

नांदेड जिल्ह्यातल्या आठ तालुक्यांमध्ये ७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नांदेड, भोकर, हदगाव, मुखेड, लोहा, हिमायतनगर, देगलूर आणि किनवट या तालुक्यांमध्ये ही पाणीटंचाई जाणवत आहे. यातल्या ४५ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवला जात असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं.

****

नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातल्या गोंदे भायगाव परिसरात काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास भुकंप सदृश्य धक्के जाणवले असून कोणत्याही प्रकारची जिवीत वा वित्तहानी नसल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

//************//

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 August 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्र...