Monday, 24 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.06.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 June  2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जून २०१९ दुपारी .०० वा.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणांबद्दल आभार प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. राष्ट्रपतींनी वीस जूनला दोन्ही सदनांना उद्देशून अभिभाषण केलं होतं. लोकसभेत केंद्रीय मंत्री प्रतापचंद्र सारंगी चर्चेला सुरुवात केली.  संसदेचं हे अधिवेशन 26 जुलै पर्यंत चालणार आहे.
****
बिहारच्या मुज्जफरपूरमधे मेंदूज्वरानं शंभरपेक्षा अधिक मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि बिहार सरकारला सात दिवसात यावर उत्तर द्यायला सांगीतलं आहे. न्यायमुर्ती संजीव खन्ना आणि ऩ्यायमुर्ती बी आर गवई यांच्या पीठानं बिहार सरकारला आरोग्य सुविधा , पोषण आहार आणि स्वछतेच्या स्थितीवर शपथपत्र सादर करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी दहा दिवसांनी होणार आहे.
****
उत्तराखंडमधे नंदादेवी शिखरावर चढाई करण्यासाठी गेलेल्या पथकातून बेपत्ता झालेल्या सात गिर्यारोहकांचे मृतदेह इंडो तिबेटन सीमा पोलीस दलाला सापडले आहेत. महिनाभरापूर्वी आठ गिर्यारोहक या परिसरात वाट चुकून बेपत्ता झाले होते. हवाईदलाच्या डेअर डेव्हिल हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं तपास केल्यावर हिमाच्या थरा खालून हे सात मृतदेह आज काढण्यात आले असून आणखी एका गिर्यारोहकाचा शोध सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
मराठवाडा आणि विदर्भात दुधामुळेच क्रांती घडून येईल, असा विश्वास राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी व्यक्त केला आहे. ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. या भागातून दूध संकलनात दरवर्षी मोठी वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या नांदेड, लातूर आणि उस्मानाबादसह विदर्भातल्या सात जिल्ह्यातल्या सुमारे आठ हजारावर दूध उत्पादकांनी कोणत्याही अनुदानाशिवाय दुभती जनावरं खरेदी केल्याची माहितीही दुग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष रथ यांनी यावेळी दिली.
****
राज्य अॅथलेटिक्स स्पर्धांसाठी प्रथमच खेळाडुंची अमलीपदार्थ सेवन चाचणी घेतली जाणार आहे. भारतीय अॅथलेटीक्स संघटनेचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी काल मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली. मुंबईत होणा-या वरिष्ठगट अॅथलेटिक्स स्पर्धेत नाडा म्हणजेच राष्ट्रीय अमली पदार्थ सेवन विरोधी यंत्रणे मार्फत या चाचण्या होतील. सर्व राज्यांमधे क्रीडा स्पर्धांपूर्वी अशी चाचणी घेण्याचे निर्देश नुकतेच क्रीडा मंत्रालयानं दिले आहेत.
****
राज्याच्या कोकण किनारपट्टीवर आणि गोव्यात येत्या गुरुवारपर्यंत सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. मध्यमहाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसंच मराठवाड्यात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात काल सलग दुस-या दिवशीही पावसानं हजेरी लावली असून जिल्ह्यातील तीन महसूली मंडळात अतिवृष्टी झाली आहे. केज तालुक्यातल्या केज, हरिश्चंद्र पिंपरी आणि होळ या महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. दोन दिवसांत बीड जिल्ह्यात जून महिन्याच्या सरासरीच्या ४३ टक्के येवढा पाऊस झाला आहे. कृषी विभागानं चांगला पाऊस पडल्या शिवाय शेतक-यांनी पेरणी करू नये असं आवाहन केलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे . अमरावती जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसामुळं लालखडी परिसरातील इमाम नगर इथं १०५ घरांची पडझड झाली तसंच झाडं उन्मळून पडली. पडझड झालेल्या घरधारकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत प्रशासनानं केली असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून राज्यातल्या ३० लाख पात्र शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नसून याप्रकरणी सहकार मंत्र्यांनी गांभीर्य दाखविले नाही. त्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यवतमाळ इथं केली आहे. 
****
हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या सविता अतुल जयस्वाल विजयी झाल्या आहेत, तर औंढा नागनाथ पंचायत समिती पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या माया कराळे विजयी झाल्या आहेत. येळेगाव तुकाराम जिल्हापरिषद गटाच्या पोट निवडणुकीत भाजपच्या जनाबाई माहुरे या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेना-भाजप हे पक्ष स्वतंत्र लढल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या रविवारी झालेल्या दोन प्रभागातील पोटनिवडणुकीत पद्माराजे गार्डन प्रभागातून अजित राऊत तर सिद्धार्थनगर प्रभागातून जय पटकारे विजयी झाले आहेत. राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तर पटकारे हे काँग्रेसचे उमेदवार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  दरम्यान, ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगर महापालिका प्रभाग क्रमांक `एक` बच्या पोटनिवडणुकित रिपाई आठवले गटाच्या मंगल वाघ या 373 मतांनी विजयी  झाल्या आहेत.
****

No comments: