Sunday, 23 June 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.06.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी” हे अभियान महत्वपूर्ण असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमुळं देशाचं नाव जगाच्या नकाशावर गेल्याचं सांगत यामध्ये सहभागी झालेले सर्वजण इतिहास बनले असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले. पुणे विद्यापीठात या अभियानाच्या महासंकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. एकाच वेळी मोठ्या संख्येनं कडूलिंबाची रोपं लावण्याचा आणि त्याचं संवर्धन करण्याचा विक्रम `गिनिज बुक`मध्ये नोंद होत असल्याबद्दल राष्र्टिय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. या बळीराजाचा चुकीच्या व्यवस्थेमुळं बळी जाता कामा नये, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असं शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या वतीनं आज अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथं पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद आणि बियाणं वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
****
काँग्रेस पक्षाचे नेते पळवून नेणं आणि त्यांना मंत्री करणं हा भ्रष्टाचार असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्री करणं हा गैरप्रकार असून या दोघांना मंत्री मंडळातून काढलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी बरोबर युती करायची किंवा नाही याबाबत चर्चा सुरू असल्याची माहितीही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली.
****
रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या कामांचं स्वरूप काळानुरूप बदललं जावं, जिल्ह्यातल्या शेतमजूर-शेतकऱ्यांना, आपण गावामध्ये रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो तर त्यांना शहराकडे स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही यादृष्टीनं उपाययोजना कराव्यात, असं प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलं आहे. त्यांनी आज बीड जिल्ह्यातील रोजगार हमी योजना, कृषी, फलोत्पादनसह विविध कामांचा तपशीलवार आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
****
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी विधीज्ज्ञ संजीव पुनाळेकरला पुण्यातील एका न्यायालयानं आज सहा जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुन्हे अन्वेषण विभागानं पुनाळेकरच्या लॅपटॉपमध्ये गुन्हेगारी स्वरुपाचे दस्तावेज आणि माहिती आढळल्याप्रकरणी चौकशी आवश्यक असल्याचं म्हटल्यानंतर विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी गेल्या गुरुवारी त्याची २३ जूनपर्यंत गुन्हे अन्वेषण विभागाच्या कोठडीत रवानगी केली होती. गुन्हे अन्वेषण विभागानं आज यापुढं कोठडीची गरज नसल्याचं नमूद केल्यानंतर विशेष न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
****
नागपूर-औरंगाबाद मार्गावर, बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातील जवळ, अंजनी बुद्रूक फाट्यावर काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात औरंगाबादच्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. चार चाकी गाडी आणि कंटेनरदरम्यान हा अपघात झाला. मनोहर क्षीरसागर, त्यांची पत्नी नलिनी क्षीरसागर आणि मुलगी मेघा क्षिरसागर तसंच चालक सुगदेव नागरे यांचा यात मृत्यू झाला आहे.
****
राज्यात मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात, मराठवाड्याच्या बहुतेक भागात आणि विदर्भाच्या आणखी काही भागात मान्सूननं आगेकूच केली आहे. येत्या दोन दिवसात राज्याच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. या काळात कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सातारा इथं शहरी भागासह तालुका आणि जिल्ह्याच्या विविध भागात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

No comments: