Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
कुपोषण निर्मुलनासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय पोषण कृषी कोष स्थापन करणार आहे.
महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही
माहिती दिली. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते बिल गेट्स, कृषीतज्ज्ञ
एम एस स्वामिनाथन यावेळी उपस्थित होते. बिल आणि मिलिंडा गेट्स फौंडेशनच्या सहकार्यातून
राबवल्या जाणाऱ्या या योजनेत बहुक्षेत्रीय आराखडा विकसित करून, विविध १२८ पिकांच्या
उत्पादनावर भर दिला जाणार आहे. बिल गेट्स यांनी यावेळी बोलताना, संपूर्ण जगभरात कुपोषणाची
समस्या भेडसावत असताना, भारताने कुपोषण निर्मुलन क्षेत्रात केलेल्या कामाचं कौतुक केलं.
स्वामिनाथन यांनी कुपोषण निर्मुलनासाठी पंचसूत्री योजना राबवण्याचा सल्ला दिला, यामध्ये
नागरिकांना पोषण आहाराबाबत जागरुक करणं, महिला आणि बालकांना उच्च प्रथिनयुक्त आहार
मिळेल याची व्यवस्था करणं, शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणं, आदी मुद्यांचा समावेश आहे.
****
राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या पक्षांनी
आपला स्वत:चा मार्ग निवडावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी
म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. राज्य विधानसभेच्या निवडणुका
शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशा लढल्या गेल्या,
त्यांनी त्यांचा मार्ग निवडावा, आम्ही आमचा राजकीय निर्णय घेऊ, असं पवार यांनी म्हटल्याचं,
पीटीआयचं वृत्त आहे.
दरम्यान पवार यांनी आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष
सोनिया गांधी यांची भेट घेऊन, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा केल्याचं वृत्त
आहे.
****
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति
हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तियाज
जलील यांनी केली आहे. ते आज लोकसभेत बोलत होते. औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे ४२ हजार
हेक्टर क्षेत्रावरचं उभं पीक संपूर्णपणे नष्ट होऊन, शेतकरी आर्थिक दृष्ट्या एकदम कमकुवत
झाला आहे, या पार्श्वभूमीवर हेक्टरी आठ हजार रुपये ही अत्यंत तोकडी मदत असल्याचं, इम्तियाज
जलील यांनी सांगितलं.
****
बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक लढवणार
नसल्याचं, भारतीय जनता पक्षानं जाहीर केलं आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी
ट्वीट करून ही माहिती दिली. दोन हजार बावीस साली होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक
भाजप स्वबळावर लढवेल, असंही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, अकोला महापालिकेत महापौर, उपमहापौर पदासाठी
आज नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. महापौर
पदासाठी भाजपच्या अर्चना म्हैसने, अनुराधा नावकार यांनी नामांकन अर्ज दाखल केला, तर
उपमहापौर पदासाठी भाजपचे राजेंद्र गिरी तसंच दीपक मानवानी यांनी अर्ज दाखल केला आहे.
****
परभणी जिल्ह्यात सेलू इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीनं
आज कापसाचे लिलाव सुरू करण्यात आले. कापसाला जास्तीत जास्त चार हजार नऊशे पाच रुपये
भाव देण्यात आला. सध्या परतीच्या पावसाने कापसाचे नुकसान झाल्यामुळे कापूस ओला आणि
कवडीयुक्त येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपला कापूस वाळवून आणावा, असं
आवाहन सभापती रविंद्र डासाळकर यांनी केलं आहे.
****
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान
भरपाई मिळावी या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात इसलापूर इथं आज भारतीय किसान सभेनं रास्ता
रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतुक विस्कळीत झाली होती.
****
परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावर नागरी सुविधा उपलब्ध
करून द्याव्यात या मागणीचं निवेदन महानगरपालिका प्रशासनाला वारंवार देऊनही त्यांनी
दखल न घेतल्यामुळे माजी खासदार सुरेश जाधव यांनी आज महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर
बसून ठिय्या आंदोलन केलं. याची तत्काळ दखल घेत आमदार सुरेश वरपुडकर यांनी प्रशासनाला
या समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार
राज्यातल्या खासगी अनुदानित शाळांना १२ टक्के वेतनेतर अनुदान द्यावं, अन्यथा अवमान
याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य शिक्षण संस्था महामंडळ या संघटनेनं
दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत
ही माहिती दिली. गेल्या अडीच वर्षांपासून खासगी अनुदानित शाळांमधे शिक्षक भरती झाली
नसून, रिक्त पदांवर लवकरात लवकर भरती करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या लिंबाळा
गावातलं रोहित्र जळाल्यामुळे हे गाव गेल्या पंधरा दिवसांपासून अंधारात आहे. वीज नसल्यामुळे
नागरिकांना दैनंदिन कामकाजात अडथळा येत आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष
संपर्क साधूनही दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत
असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पन्नासावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
परवा बुधवारपासून गोव्यात सुरु होत आहे. यंदा खुल्या पडद्यावर काही लोकप्रिय चित्रपटांचा
आस्वाद रसिकांना विनामूल्य घेता येणार आहे. त्यासाठी नोंदणीची कुठलीही अट ठेवण्यात
आलेली नाही. या महोत्सवात यंदा बारा हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील
अशी अपेक्षा आहे.
*****
***
No comments:
Post a Comment