Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 21 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २१ मार्च २०२० सकाळी
७.१०
मि.
****
Ø आज मध्यरात्रीपासून उद्या रात्रीपर्यंत देशभरातली रेल्वे
वाहतुक स्थगित
Ø कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या
परीक्षा रद्द
Ø मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूरमध्ये
येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व व्यवहार बंद
Ø पाच रुग्णांच्या प्रकृतीत
सुधारणा; घरी गेल्यावरही १४ दिवस विलगीकरणात राहण्याची सूचना
Ø मध्यप्रदेशचे
मुख्यमंत्री कमलनाथ यांचा बहुमतचाचणीपूर्वी राजीनामा
आणि
Ø मंगल कार्यालय बंद ठेवण्याच्या आदेशाचं उल्लंघन; परभणी जिल्ह्यात गुन्हा दाखल
****
देशभरात उद्या पाळण्यात येणाऱ्या जनता संचारबंदीच्या
पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री १२ वाजेपासून ते उद्या रात्री १० वाजेपर्यंत देशातल्या
सगळ्या प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आधीपासून धावत असलेल्या मेल
आणि एक्सप्रेस रेल्वेगाड्या उद्या पहाटे चार वाजता जिथे असतील तिथेच थांबवण्यात येणार
असल्याचं रेल्वे मंडळाच्या आदेशात म्हटलं आहे. मुंबईत उपनगरी रेल्वेची संख्याही कमी
करण्यात येणार आहे. उद्या सकाळी सात वाजेच्या आधीपासून धावत असलेल्या प्रवासी रेल्वेगाड्या
मात्र नियमित धावणार आहेत.
दरम्यान, संसर्गाचा अधिक धोका असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना
अनावश्यक प्रवासापासून परावृत्त करण्यासाठी, आरक्षित आणि अनारक्षित अशा सर्व प्रकारच्या तिकिटांवरच्या
सवलती स्थगित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी, रुग्ण आणि
दिव्यांग व्यक्ती वगळता, इतर प्रवाशांना या सवलती मिळणार नाहीत.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिली
ते आठवीपर्यंतच्या परीक्षा
रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी
बोलतांना ही माहिती दिली. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना
त्यांच्या चालू वर्षातल्या सरासरी कामगिरीच्या आधारावर पुढच्या वर्गात प्रवेश दिला
जाणार आहे. काही शाळा तसंच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नववी तसंच
अकरावीची परीक्षा सुरू आहे, या वर्गांची उर्वरित परीक्षा १५ एप्रिलनंतर
होणार असून, दहावीची उर्वरित परीक्षा मात्र वेळापत्रकानुसार होणार
असल्याचं, गायकवाड यांनी सांगितलं.
****
मुंबई महानगर, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या चार महानगरांमध्ये
जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता इतर सर्व आस्थापना येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे
निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. काल जनतेला
उद्देशून केलेल्या संबोधनात ते बोलत होते. सर्व सरकारी कार्यालयं
२५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील, ज्या खासगी
आस्थापनांना घरून काम करवून घेणं शक्य नाही, त्यांनी
काम पूर्ण बंद ठेवावं, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
पाणी पुरवठा, स्वच्छता, उपनगरी रेल्वे या सेवांसह बँकाही नियमित सुरू राहतील, अशी माहिती त्यांनी दिली.
या बंद काळात हातावर पोट असलेल्या रोजंदार कामगारांचे
पगार कापू नयेत, नागरिकांनी
या बंदला सुटी समजून पर्यटनाला निघू नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी
केलं. या नंतरही उपनगरी रेल्वेतली गर्दी कमी झाली नाही,
तर सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय
घ्यावा लागेल, असा इशाराही देत, पुढचे पंधरा
दिवस खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
या सर्व परिस्थितीमुळे आयकर विवरणपत्रं, जीएसटी विवरणपत्रं,
तसंच अग्रिम कर भरण्याची तारीख वाढवून देण्याची विनंती केंद्रीय अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांना केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात वार्ताहरांशी बोलताना,
विवाह किंवा अंत्यविधीसारखे सुखदु:खाचे विधी कमाल
पंचवीस नातलगांच्या उपस्थितीत करावेत, अशी सूचना केली.
****
राज्यात कोरोनाग्रस्त पाच रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. या रुग्णांच्या थुंकीचा
चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतरही
या रुग्णांना पुढचे चौदा दिवस घरी विलगीकरणात राहावं लागणार असल्याचं आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात
काल मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड इथं प्रत्येकी एकेक असे आणखी
तीन नवे रुग्ण आढळले असून, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ झाल्याची
माहिती टोपे यांनी दिली.
दरम्यान,
कोरोना विषाणू संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी मायगोव्ह कोरोना हेल्प
डेस्क या नावानं व्हाट्सअप चॅट सुरु केल्याची माहिती राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाच्या
सूत्रांनी दिली. ९० १३ १५ १५ १५ या व्हाट्सअप क्रमांकावर जनतेनं
आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून हवी ती माहिती जाणून घेता येईल. ही स्वयंचलित यंत्रणा आहे.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमतचाचणीला सामोरं न जाता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. काल भोपाळ इथं पत्रकार परिषद
घेऊन, त्यांनी ही माहिती दिली. काँग्रेसच्या
सोळा बंडखोर आमदारांचे राजीनामे मध्यप्रदेश विधानसभाध्यक्ष एन पी प्रजापती यांनी स्वीकारल्यामुळे
कमलनाथ सरकार अल्पमतात आलं होतं. राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ
यांना पुढील सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितलं
आहे.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मराठवाड्यात अनेक शहरांमध्ये आज आणि उद्या बंद पाळला
जात आहे. औरंगाबाद शहरातली बाजारपेठ आज आणि उद्या बंद राहणार आहे.
जिल्हा व्यापारी महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लातूर,
नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यातल्या आस्थापनाही आज आणि उद्या बंद राहणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात देशी-विदेशी मद्य आणि बिअरची किरकोळ विक्री
येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले आहेत.
****
राज्यात सर्व मंगल कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश असतांनाही परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं समर्थ मंगल कार्यालयात परवा विवाह सोहळा पार पडला,
यामुळे मंगल कार्यालयाचे मालक सदानंद जोशी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात भिलवडी
आणि कोकरुड या दोन ठिकाणी अशाच कारणावरून चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले
आहेत.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
महाविद्यालयांना सुट्या देण्यात आल्या असून बहुतांश विद्यार्थी आपापल्या मूळ गावी परतले
आहेत. हे विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास करत असून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे
विद्यार्थी ऑनलाईन क्लासेसवर भर देत आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर
मंबई, पुणे आणि इतर ठिकाणाहुन शिक्षणासाठी
गेलेले विद्यार्थी आपापल्या गावी परत आले आहेत. अनिश्चित काळासाठी सार्वजणीक बंद पाळण्यावर
सरकारने लक्ष दिले आहे. अभ्यासक्रमात मोठा खंड पडणार असणार असल्यामुळे संभाव्य नुकसान
टाळण्यासाठी ऑनलाईन अभ्यासाकडे विद्यार्थी वळलेले आहेत.
-अरूण समुद्रे आकाशवाणी
बातम्यासाठी लातूर.
****
सौदी अरबमधून जालन्यात परतलेल्या तिघांना प्रशासनानं
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथं कोरोना
विषाणू प्रसाराला प्रतिबंध व्हावा म्हणून बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांसाठी आखाडा
बाळापूर ग्रामपंचायतीनं हात
स्वच्छ धुण्यासाठी बसस्थानक तसंच गर्दीच्या ठिकाणी हात धुण्याचे स्टॉल लावले आहेत.
उस्मानाबाद इथंही ब्रेक द चेन अभियानाअंतर्गत शहरातल्या १२ ठिकाणी हात
धुण्यासाठी स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
नांदेड इथं कपडा बाजार पेठेत दि क्लॉथ मर्चंट
वेलफेयर संघटनेकडून सर्व व्यापारी गुमास्ता हमाल यांना मोफत मास्क वाटप करण्यात आलं.
****
अंबाजोगाई नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बबन लोमटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगर परिषदेच्या सभागृहात काल ही निवड प्रक्रिया
पार पडली
****
जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यातल्या हिवरा
काबली सजाचा तलाठी विजय गरड याच्यासह एकाला सहा हजार रूपयांची लाच घेतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक
विभागानं रंगेहाथ पकडलं. वडिलोपार्जित जमिनीची वारसाहक्काप्रमाणे
वाटणी करून तशी नोंद घेण्यासाठी गरड यानं लाचेची मागणी केली होती.
****
राज्य सरकारनं जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव
फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ६१ हजार २५७ लाभार्थ्यांच्या
याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यापैकी ५१ हजार ३३२ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं असून,
३९ हजार ५७७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३२२ कोटी ७६ लाख रुपये रक्कम जमा
झाले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आधार
प्रमाणीकरण लवकरात लवकर करून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान
संस्थेत साथरोग नियंत्रण प्रयोगशाळा सुरु करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता कोरोना विषाणू संशयित रुग्णाची
तपासणी आणि इतर तपासण्या या प्रयोगशाळेत करता येतील. येत्या १०
दिवसात ही प्रयोगशाळा सुरु होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment