Saturday, 21 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.03.2020 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 21 March 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****

 कोरोना विषाणू संक्रमणाचा सर्व राज्यांना समान धोका असून या आपत्तीचा प्रभावी सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांनी एकत्रित काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरदृष्य संवाद प्रणाली द्वारे संवाद साधत होते. या आव्हानाचा सामना करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असून नागरिकांनी भयभीत होण्याची गरज नसल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. या संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी पुढील तीन ते चार आठवडे अत्यंत महत्वाचे असून सामाजिक विलगीकरण हा यावरील सर्वात प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले. उद्या पाळण्यात येणाऱ्या जनता संचारबंदीसंदर्भात  जनजागृती करण्यासाठी  वेगवेगळ्या क्षेत्रातल्या      एकत्रित येणाऱ्या लोकांचं   मोदींनी   अभिनंदन केलं. या संचारबंदीमध्ये जीवनावश्यक सेवेंमधील लोक सोडून सर्वांनी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत घरातच थांबायचे असून पाच वाजता जे लोक आवश्यक सेवा देत आहेत त्यांच्याप्रति आभार व्यक्त करण्यासाठी घराच्या बाल्कनीत अथवा दरवाजांमध्ये उभे राहून टाळ्या अथवा थाळी नादकरण्याचं आव्हान पंतप्रधानांनी केलं आहे.                       

****

 महाराष्ट्रात कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत ११ ने वाढ होऊन ही संख्या ५२ वरून ६३ पर्यंत गेली असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. यामध्ये मुंबईत १० तर पुण्यात १ नवा रुग्ण पॉजिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. या ११ नव्या रुग्णांमध्ये ८ जण परदेशातून आलेले असून ३ जणांना संसर्गातून लागण झाल्याचं टोपे म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या ६३ रुग्णांपैकी १२ ते १४ जणांना संसर्गातून लागण झालेली असून संसर्गातून लागण होण्याच प्रमाण कमी असल्याचं ते म्हणाले. अजूनही आपण दुसऱ्या टप्प्या मध्ये असून बहुतांश सकारात्मक रुग्ण हे राज्याबाहेरून आले असल्याचं त्यांनी नमूद केलं. या धोक्याचा सामना करण्यासाठी सर्व वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी प्रयोगशाळा उभारणार असल्याचंही टोपे यावेळी म्हणाले. ३१ मार्च पर्यंत जीवनावश्यक वगळून सर्व कार्यालयं आणि दुकानं बंद राहतील, याचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. जनतेनं स्वयंशासित राहून कोरोनाचा सामना करण्याची गरज असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी  नमूद केले.
****

 केंद्रीय लोकसेवा आयोगानं २०१९ मधल्या नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या २३ मार्च रोजी होणाऱ्या  मुलाखती ४ एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच मुलाखतीच्या नव्या तारखा संबंधित उमेदवारांना कळवण्यात आल्या असल्याचंही आयोगानं म्हटलं आहे. गेल्या १७ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या या मुलाखती आता अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत.
****

 औरंगाबादेत कोरोना पॉजिटिव्ह सापडलेल्या महिला प्राध्यापिकेच्या संपर्कातातील २१ विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थ्यांचे कोरोना तपासणी अहवाल नकारात्मक आले आहेत. तर उर्वरित पाच विद्यार्थ्यांचे अहवाल अद्याप प्राप्त होणे बाकी आहेत. ही महिला प्राध्यापिका रशियाहून औरंगाबादेत परतल्यानंतर काही दिवसांनी पॉजिटिव्ह सापडल्याने या महिला प्राध्यापिकेच्या संपर्कातल्या सर्व जणांचे विलगीकरण करून तपासणी करण्यात येत आहे. काल देखील या महिला प्राध्यापिकेच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल नकारात्मक आले होते.   
****

 कोरोना संसर्गाच्या काळात सरकार आवश्यक त्या वस्तूंच्या किंमतींवर लक्ष ठेवून असल्याचं ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं. मास्क आणि हँड सॅनिटायझरच्या किमतींवर नियंत्रण राहण्यासाठी केंद्र सरकारनं या वस्तूंच्या किमती निश्चित केल्या आहेत. दोन स्तरांच्या  मास्कची किंमत आठ रुपये, तर तीन स्तरांच्या मास्कची किंमत दहा रुपये इतकी ठरवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर २०० मिलीलिटर सॅनिटायझर १०० रुपयात मिळणार असून या किमती येत्या ३० जूनपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती पासवान यांनी ट्विटरद्वारे  दिली आहे.
****

 उज्बेकिस्तानमध्ये  अडकलेले ३९ जण आज दुपारी भारतात परतणार आहेत. यामध्ये सांगलीचे १४ जण, सोलापूर १३, पुणे ११ आणि नाशिकमधल्या एक जणाचा समावेश आहे. दिल्ली  इथं वैद्यकीय तपासणी करून त्यांना १४ दिवस वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. हे ३९ जण डॉक्टर आणि औषध विक्रेते असून औषध कंपनीनं त्यांच्यासाठी रशियाची सहल आयोजित केली होती.
****

 चीनकडून कोरोनाची माहिती उशिरा मिळाल्यामुळे संपूर्ण जग या संसर्गानं प्रभावित झालं असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे २३० जण मरण पावले असून १८ हजार लोकांना लागण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
*****
***

No comments: