Sunday, 22 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 22.03.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 22 March 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****
कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचारबंदीच्या आवाहनाला देशभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून जनतेनं स्वयंप्रेरणेनं लागू केलेली ही संचारबंदी रात्री ९ वाजेपर्यंत असेल. यामुळे सर्वत्र सार्वजनिक वाहतूक कमी झाली असून, जीवनाश्यक वस्तूंची दुकानं वगळता बाकी सर्व दुकानं, आस्थापना आणि बाजार बंद आहेत.

मुंबईसह राज्यभर रस्ते आणि बाजारपेठांमधे आज शुकशुकाट आहे. रेल्वेनं आज रात्री १० वाजेपर्यंतच्या सर्व पॅसेंजर गाड्या रद्द केल्या असून, उपनगरी रेल्वे फेऱ्यांमध्येही कपात केली आहे. दिल्लीसह सर्व शहरांमधली मेट्रो सेवाही बंद आहे. गोएअर, इंडिगो, विस्तारा या विमान कंपन्यांनीही आपली आजची विमानउड्डाणं रद्द केली आहेत. अखिल भारतीय व्यापारी महासंघानेही आज आपल्या आस्थापना बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान ,कामानिमित्त परगावी राहणाऱ्यांनी घाबरून आपापल्या गावी रेल्वे किंवा बसने जाण्याची घाई करु नये, आहेत तिथेच रहावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रवासात या आजाराच्या प्रसाराचा जास्त धोका असून, आपल्या आयुष्याशी आणि कुटुंबाच्या भविष्याशी खेळ करु नये, असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.
****
मुंबईत आज आणखी एका कोरोनाग्रस्त नागरिकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात या विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे. मरण पावलेली ही व्यक्ती ६३ वर्षांची होती. या व्यक्तीला आणखी इतरही आजार होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या आता ७४ झाली आहे. काल हा आकडा ६४ होता, आज मुंबईत सहा तर पुणे इथं ४ कोरोनाग्रस्त नवीन रूग्ण सापडले. देशात आता कोरोनानं बाधित झालेल्यांची संख्या ३२४ झाली आहे.
****
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची रंगीत तालिम राज्य शासन सर्व शासकीय, पालिका आणि संलग्न रुग्णालयात आज घेणार आहे. यासाठी सर्व रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात स्वच्छता, तसंच श्वसनमार्गाला बाधा होऊ नये, यासाठी घेण्याची काळजी या प्रमुख बाबींचा समावेश आहे. रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी घेण्याच्या दक्षतेबाबत यात काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार संबंधितांनी तात्काळ कार्यवाही करायचे निर्देश प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.
****
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांनी आता एकत्र येऊन लढण्याची गरज असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बोलत होते. ही वेळ राजकारण करण्याची नसून, आता खुर्च्या नाही तर राज्य वाचवण्याची वेळ आहे, असं ते म्हणाले. जनता संचारबंदी आठ दिवसांआधीच लावायला हवी होती असं सांगून गरज पडल्यास मुख्यमंत्री ही संचारबंदी वाढवू शकतात असे संकेतही राऊत यांनी दिले.
****
औरंगाबाद शहरातल्या सर्व प्रमुख बाजारपेठेत कडकडीत बंद असून औरंगपुरा, निराला बाजार, पैठण गेट, गुलमंडी, टिव्ही सेंटर, गजानन महाराज रोड या सह सर्वच ठिकाणी रस्त्यांवर शांतता आहे. लोक घरातच बसून असल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाधववाडी इथली भाजी मंडई आणि व्यापारी संकुलंही आजपासून येत्या मंगळवारपर्यंत पूर्ण बंद रहाणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फळे आणि भाजीपाला अडत व्यापारी असोसिएशनने काल हा निर्णय घेतला

शहरासह ग्रामीण भागातही या संचारबंदीचं जनतेनं पालन केलं आहे. सिल्लोड, कन्नड, गंगापूर या तालुक्यांच्या ठिकाणी कडकडीत बंद आहे. आज पैठण तालुक्यातल्या पाचोड इथं भरणारा रविवारचा आठवडी बाजार भरला नाही त्यामुळं बाजार मैदानात शुकशुकाट असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, परभणी या शहरांतही नागरिकांनी जनता संचारबंदीचं शंभर टक्के पालन केल्याचं चित्र आहे.
****
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी सध्या घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. विदेशात जाऊन आलेल्या लोकांबद्द्लची आणि कोरोनाविषाणूशी संबधित काही लक्षणं आढळतात का, याची चौकशी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या मुरूड इथल्या एका युवकाचा कोरोना विषाणूबाबतचा अहवाल नकारात्मक आला असल्याची माहिती मुरूडच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एल. एस. देशमुख यांनी आज सकाळी दिली. फ्रान्सवरून आलेला हा युवक स्वतःच्या घरीच होम क्वारंटाईनमध्ये थांबला होता.
****


No comments: