Friday, 3 April 2020

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 03.04.2020 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 April 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.

****

** २१ दिवसांच्या बंदचा आदेश मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याच्या केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना

** पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी नऊ वाजता व्हिडिओ संदेशामार्फत जनतेला संबोधित करणार

** राज्यातल्या स्थितीनुसार टप्प्याप्प्यानं लॉकडाऊन संपवण्याबाबत नियोजन करण्याचे पंतप्रधानांचे राज्यांना निर्देश

** राज्यातली ३० शासकीय रुग्णालयं कोरोना विषाणू बाधित उपचारासाठी विशेष रुग्णालयं म्हणून घोषि

** औरंगाबाद आणि उस्मानबादमध्ये प्रत्येकी दोन तर हिंगोलीत एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले

आणि

** हिंगोली जिल्ह्यात आजपासून पाच एप्रिलपर्यंत केवळ औषधी दुकानं वगळता कडकडकीत बंद

****

कोविड -१९ ची साखळी खंडित करण्यासाठी सरकारनं लागू केलेल्या २१ दिवसांच्या बंदचा आदेश मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं दिल्या आहेत. गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी सर्व राज्यांना याबाबतचे लेखी निर्देश दिले आहेत. कोविड -१९ ला रोखण्यासाठी  देशात लागू असलेल्या २१ दिवसांच्या बंदच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांसाठीची रक्कम सर्व राज्यांनी सुरळीतपणे वितरित करावी, असे निर्देशही गृहमंत्रालयाने दिले आहेत.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी नऊ वाजता व्हिडिओ संदेशामार्फत जनतेला संबोधित करणार आहेत. ट्विटरवरुन काल त्यांनी ही माहिती दिली.

****

राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातल्या स्थितीनुसार टप्प्याप्प्यानं त्याचं नियोजन कराव, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत बोलत होते. सर्व काही व्यवस्थित सुरु झालंय अस समजून लोकांचे लोंढे रस्त्यावर येऊ नयेत, कोविड- १९ मुळे जास्त जीवित हानी होऊ नये, यावर आपला भर असला पाहिजे, असं ते म्हणाले. केंद्रानं राज्याला द्यायाचा ११ हजार कोटी रुपयांचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी संशयितांचा शोध, तपासणी, आणि विलगीकरण यावर अधिक भर देणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सामुहिक प्रयत्नातून आपण या संकटावर मात करू, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. शेतात कापणीच्या हंगामात गर्दी होणार नाही, तसंच शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांव्यतिरिक्त इतर पर्यायांचा विचार व्हावा, असंही त्यांनी सांगितलं. कोरोना विषाणूग्रस्तांवर उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालयांची गरजही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. वैद्यकीय उपचारांसंदर्भात माहिती देण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करावं, तसंच निमवैद्यकीय कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसी आणि राष्ट्रीय सेवा योजना - एनएसएसच्या स्वयंसेवकांची मदत घेण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून या बैठकीत सहभागी झाले होते. मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षाची मर्यादा दोन हजार शंभर रुग्णशय्यापर्यंत वाढवण्यात आली असून, पुण्यातही कोविड रुग्णालय उभारण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वैद्यकिय उपकरणांसाठी स्थानिक पातळीवरील उद्योगांना प्रोत्साहन द्यावं असंही मुख्यमंत्री म्हणाले.

****

या बैठकीत पंतप्रधानांनी, जलद चाचणी रॅपिड टेस्टसाठी परवानगी दिली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही याची माहिती पाच मिनिटात मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले



आपल्याला रॅपिड टेस्ट हा एक मास टेस्टींगच्या संदर्भान मान्यता दिलेली आहे. आज सगळ्यात महत्वाची मला वाटतं व्हीसीच्या संदर्भातील उपलब्धी समजले. रॅपिड टेस्टच्या माध्यमातून एक प्राथमिक चाचणी, स्क्रिनिंग ज्याला म्हणू आपण, ती मोठ्या संख्येनं आपल्याला कळणार, पाच मिनिटात कळणार की कोणाला कोविड त्याठिकाणी प्रार्दुभाव आहे का? यावरून आपल्याला लोकांचा संख्येचा अंदाजा आला तर त्यांना इमिजिएट आयसोलेट करण्याचं काम केलं जाईल आणि त्यांच्यावर पुढचं ट्रिटमेंट करण्याचं काम केलं जाईल.



स्थलांतरित कामगारांच्या निवास, भोजन तसंच मनोरंजनाची काळजी घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचं टोपे यांनी सांगितलं. एन नाईंटी फाईव्ह मास्क तसंच व्हँटिलेटरचं उत्पादन वाढवलं जाणार असून, संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळावी असं आवाहनही त्यांनी पुन्हा एकदा केलं.

****

दिल्लीत निझामुद्दीनमधल्या संमेलनाला गेलेल्या नऊ हजार लोकांची ओळख पटली असून, यापैकी चारशे जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. अठराशे जणांना दिल्लीत विलगीकरणात ठेवण्यात आलं असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांच्या सचिवांना कोरोना विषाणूच्या अतिप्रभावाच्या क्षेत्रात लॉकडाऊनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

****

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या मदतीची गरज असल्याचं कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. काल दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. खासदार राहुल गांधी यावेळी उपस्थित होते. सर्व राज्यशासनांनी या अनुषंगानं वयोवृद्ध, फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त असलेले लोक, मधुमेही आणि हृदयरुग्णांसाठी विशेष सूचना प्रसिद्ध कराव्या आणि त्यांची अधिक काळजी घेतली जावी, असं राहुल गांधी म्हणाले.

****

आरोग्य विभागानं राज्यातली ३० शासकीय रुग्णालयं कोरोना विषाणू बाधित उपचारासाठी विशेष रुग्णालयं म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे. या रुग्णालयादोन हजार ३०५ खाटा उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद इथलं जिल्हा रुग्णालय, हिंगोली- जिल्हा रुग्णालय, कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय, लातूर- उदगीर उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नवीन इमारत, उमरगा- उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत, नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने आणि मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा या विशेष रुग्णालयात समावेश आहे.

****

कोरोना विषाणूपासून बचावासाठी होम क्वारंटाईन्‌ किंवा हॉस्पिटल क्वारंटाईन्‌ हे दोनंच पर्याय उपलब्ध असून, नागरिकांनी स्वेच्छेनं होम क्वारंटाईन्‌व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, असा इशारा  त्यांनी दिला आहे. कोरोना विषाणूसंदर्भातले नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात असल्याचं ते म्हणाले. ज्या खासगी डॉक्टरांनी अद्याप दवाखाने सुरु केलेले नाहीत, त्यांची नोंद राज्य शासनानं आणि स्थानिक नागरिकांनी घेतली असून, या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल, असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात अन्नधान्याचा, खाद्यतेलाचा, दुध, भाजीपाल्याचा, औषधांचा, इंधनाचा मुबलक साठा असून, या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही, त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.

****

नागरिकांनी लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करावं, लॉकडाऊन अधिक कठोरपणे राबवण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडू नये, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून जनतेशी संवाद साधताना बोलत होते. नागरिकांनी नियमांचं काटेकोरपणे पालन केल्यास, लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागणार नाही, सध्या तरी चौदा तारखेपर्यंत नागरिकांनी संयम पाळण्याचं आवाहन, पवार यांनी केलं. खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी, आपले दवाखाने बंद ठेवू नयेत, असं आवाहनही त्यांनी केलं. पुढच्या आठवड्यात येणारा शब ए बारात, तसंच येत्या चौदा तारखेला, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, नागरिकांनी घरात बसूनच साजरी करण्याचं आवाहन, पवार यांनी केलं. दिल्लीत निजामुद्दीन इथला कार्यक्रम व्हायला नको होता, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

राज्यात काल कोरोना विषाणूचे ८८ नवे रुग्ण आढळून आल्यानं, एकूण रुग्णांची संख्या ४२३ झाली आहे. मुंबईतल्या सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीत काल तिसरा कोरोनाचा रुग्णा आढळला. दरम्यान, या आजारामुळे राज्यात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे.

****

मराठवाड्यात काल कोरोना विषाणू बाधित पाच रुग्ण आढळून आले. औरंगाबाद इथं दोन नवीन कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एक महिला तसंच एका पुरुषाचा समावेश आहे. आरेफ कॉलनी तसंच सिडको एन फोर परिसरात राहणाऱ्या या दोघांवर, शहरातल्या शासकीय जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी दिली.



उस्मानाबाद इथं काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडले. यातला एक रुग्ण उमरगा तालुक्यातला असून, दुसरा लोहारा तालुक्यातला  धानुरी इथला आहे. हा रुग्ण मुंबईत एका हॉटेलमध्ये काम करत होता, काही दिवसापूर्वीच तो गावी आला होता. त्याला तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या २५ जणांची यादी तयार करण्यात आली असून, त्या सगळ्यांना गावातल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी दिली.

दरम्यान, हिंगोली जिल्हा रुग्णालयात ३१ मार्चला दाखल झालेल्या पाच संशयित रुग्णांपैकी, एका रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला आहे.

बुलडाणा शहरातल्या ३१ रूग्णांच्या तपासणी अहवालांपैकी, तीन जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये एक रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आणखी नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. काल या सर्वांचे अहवाल मिळाल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधितांची संख्या, झाली आहे.

****

परभणी जिल्ह्यातून दिल्लीत निजामुद्दीन इथल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या, तीन व्यक्तींचे तपासणी अहवाल नकारात्मक आले असल्याची माहिती, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. या तीन जणांच्या संपर्कात आलेल्या पाच व्यक्तींना, घरी विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.



नांदेड जिल्ह्यातून २५ लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या पैकी २३ व्यक्तींचा शोध लागला आहे. १४ व्यक्तींच्या स्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. अन्य सात व्यक्ती अद्याप राज्याबाहेर आहेत. तर दोघांचा तपास अद्याप लागलेला नाही.

****

नांदेड जिल्ह्यात विद्यार्थी आणि स्थलांतरित मजुरांना विविध शासकीय निवाऱ्यांच्या माध्यमातून दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवल्या जात असल्याचं जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी सांगितलं. नांदेड शहरातल्या नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही, असं ते म्हणाले....

आपल्या जिल्ह्यामध्ये बाहेरगावचे लेबर, विद्यार्थी हे सगळे अटकलेले आहेत. त्यामुळे आपण त्यांची अरेंजमेंट, व्हेरिएस कँम्प आपण बनवले आहेत. मंगल कार्यालय, शाळा, हॉस्टेल याठिकाणी आपण केली आहे. सगळी सोय आपण केली आहे. आमचे अधिकारी, रेव्हेन्यूचे अधिकारी आणि पोलिस प्रशासन त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे अशा लोकांना आणि त्यांच्या परिवार जणांना माझ्याकडून एसपी साहेबांकडून आव्हान करतो की त्यांनी बिलकुल चिंता करण्याची गरज नाही आहे. प्रशासनानं ईसेंसिएशल गोष्टी, जीवनोपयोगी वस्तूंसाठी आम्ही परवानगी दिलेली आहे. त्याचा गैरवापर करून जर कोणी बाहेर पडलं. तर आता एसपी साहेब आणि आम्ही ठरवलय की स्ट्रीक्ट ॲक्शन घेवू त्यांच्या गाड्या जप्त करू.

****

हिंगोली जिल्ह्यात आजपासून पाच एप्रिलपर्यंत बाजारपेठेसह किराणा, भाजीपाला दुकानंही पूर्णपणे बंद राहणार आहेत. फक्त औषधी सेवांना यातून वगळण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल हे आदेश जारी केले. या पार्श्वभूमीवर शहरातले मुख्य बाजारपेठेचे आणि जुन्या हिंगोलीतले सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. संचारबंदी लागू असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अधिक झाल्यानं, आणि कोरोना विषाणू बाधित एक रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. शासकीय वाहनं, वैद्यकीय कारणास्तव परवाना घेतलेले वाहनं, आणि अत्यावश्यक सेवा पुरवठा करण्यासाठी परवानगी घेतलेल्या वाहनांनाच या काळात रस्त्यावर फिरण्यास परवानगी असेल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद शहरात दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्या अकरा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसंच जमावबंदी उल्लंघन प्रकरणी कारवाई करण्यात आली. मांस विक्रीचे दुकान सुरू ठेवून गर्दी जमवल्याबद्दल एका दुकानदाराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



लातूर इथं काल सकाळी फिरण्यासाठी रस्त्यावर आलेल्या १२० नागरिकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पोलिस उपाधीक्षक सचिन सांगळे यांनी ही माहिती दिली. धुळे शहरातही काल सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या ३२ जणांविरूद्ध  पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये दोन महिलांचा सुद्धा समावेश आहे.

****

जालना जिल्हा रुग्णालयाच्या जवळच्या इमारतीमध्ये  कोरोना विषाणूग्रस्तांसाठी स्वतंत्र रुग्णालय तयार करण्यात येत आहे. सध्या याठिकाणी विद्युतीकरण, रंगरंगोटी, विलगीकरण कक्ष उभारणी यासह अन्य कामं वेगानं सुरु आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू रूग्णांच्या उपचारासाठी दोन रूग्णालयांना राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि मुखेड इथल्या रूग्णालयात प्रत्येकी पन्नास खाटांची मान्यता मिळाली आहे.

नांदेड शहरात गल्लीबोळातील रस्ते रहदारीस बंद करण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यावर विनाकारण वाहने घेन फिरणाऱ्यांवर आळा बसला आहे. काल रस्त्यावर आलेल्या १०९ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, बंदीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात गरजूंच्या मदतीसाठी तृतीय पंथी लोकही पुढाकार घेत आहेत.

****

होम क्वारंटाईनचे शिक्के असणाऱ्या १५ जणांना उस्मानाबाद जिल्ह्यातून मुंबईकडे जाताना काल पुणे - मुंबई महामार्गावर पकडण्यात आलं. लॉकडाऊनच्या काळात ३१ मार्चला हे पंधरा जण अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी मुंबईहून उस्मानाबादला आले होते. या सगळ्यांना वडगाव इथं विलगीकरण कक्षात ठेवलं असून, वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्याचं सहायक उपनिरीक्षक विश्वास अंबेकर यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या पाथरी शहरात भाजी बाजारात योग्य सामाजिक अंतर न पाळता नागरिक गर्दी करताना दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्याच्या नायगाव शहरातही काल गुरूवारच्या आठवडी बाजारात लोकांनी योग्य अंतर न पाळता नियमांची पायमल्ली केल्याचं दिसून आलं. उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तालुक्यात भाजी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. लॉकडाउन मुळे नागरिकांना भाजी खरेदी करण्यासाठी सकाळी काही ठराविक वेळ देण्यात आला असल्यामुळे नागरिकांनी गर्दी केल्याच आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, नांदेड शहरातल्या तरोडा बुद्रुक भागात काल घराघरात जतूंनाशक औषधीची फवारणी करण्यात आली.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात शिवभोजन थाळीची सुरूवात करण्यात आली असून या केंद्राकडून सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेदरम्यान दररोज दिडशे भोजन थाळी वितरित केली जाणार आहे. पहिल्या दिवशी ६५ नागरिकांनी या थाळीचा लाभ घेतला.



परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ, पूर्णा, सेलू, पाथरी आणि मानवत इथं काल शिवभोजन केंद्राचं उद्घाटन झालं. याठिकाणी गरजुंना पाच रुपयात दोन पोळ्या, वरण, भाजी आणि भात मिळणार आहे.

****

देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर परराज्यातले अनेक मजूर राज्यातल्या अनेक भागात अडकले असून, प्रशासनातर्फे त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे.

जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेलं बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचं काम सध्या बंद असल्यामुळे इथल्या परप्रांतीय कामगारांच्या निवास आणि भोजनाची जबाबदारी संबंधित कंपनीवर सोपवण्यात आली आहे. कामगारांचं स्थलांतर होणार नाही याची खबरदारी कंपनी व्यवस्थापनासह रस्ते विकास महामंडळाकडून घेतली जात असल्याची माहिती महामंडळाचे कार्यकारी अभियंता रामदास खलसे यांनी दिली.



परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरात काही परराज्यातल्या मजुर कुटूंबांची व्यवस्था कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयात करण्यात आली आहे. या कुटुंबियांना काल शहरातल्या दानशूर व्यक्तींनी मदत केली.

उस्मानाबाद जिल्ह्यात मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आठ ठिकाणी शासकीय निवारागृह सुरू केली आहेत. परराज्यातील मजूर, कामगार तसंच संचारबंदीमुळे अन्न पाण्याच्या शोधात स्थलांतर करणाऱ्या एक हजार ६६ जणांना निवारा देण्यात आला आहे. यासंदर्भात बोलतांना पोलिस निरीक्षक हिना शेख म्हणाल्या,



परराज्यामधून आपल्याकडे कामाला असलेले जे कामगार होते.त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. सध्या इथं ५९ राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश मधले जे कामगार आहेत. ते त्यांच्या गावी जाणार होते.त्यांना आपण इथं शेल्टर होम मधून इथं त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे त्यांची वैद्यकीय तपासणीची देखील शासनानं इथं व्यवस्था केली आहे. उस्मानाबाद तालुक्यामध्ये तीन ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.



या निवारागृहामध्ये आश्रयितांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून त्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. याशिवाय त्यांना हँडवॉश, सॅनिटायझर देण्यात येत असल्याचं हैदराबाद इथून आलेल्या मजुरानं सांगितलं.

राजस्थान से है.और हैदराबाद में रहते है फॅक्ट्री में काम करते है. हैदराबाद से पैदल रवाना हो गये थे राजस्थान के लिए कुछ तकलीफ हुई थी हम को. पैदल रवाना हो गए थे लॉक डाऊन के बाद में. उस्मानाबाद जिले में कर्फ्यू में रोक लिया गया. इधर हमारे खाने पिने का व्यवस्था अच्छा हो रहा है.यहां पर रहने में कोई तकलीफ नहीं है.



****

उस्मानाबाद इथल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमार्फत शंभर कुटुंबासाठी आवश्यक अशा किराणा साहित्याच्या पिशव्या देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आलं.

औरंगाबाद शहरात अडकून पडलेल्या लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या तरुणाला आमदार अभिमन्यू पवार यांनी मदत केली.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षांचं सुधारीत वेळापत्रक १५ एप्रिलनंतर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जारी झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या  आहेत.

****

कोरोना विषाणूपासून सुरक्षेच्या दृष्टीनं परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरातल्या ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाचे दैनंदिन कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत. विद्यालयाच्या संचालीका मिरा दिदी यांनी लॉकडाऊन करत विद्यालयातच ध्यानधारणा सुरु केली आहे. तसंच सामाजिक कार्य म्हणून त्यांनी काल सोनपेठ इथल्या झोपडपट्टीत राणाऱ्या गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तुंचं वाटप केलं.

****

परभणी शहरातल्या कडबी मंडी भागातल्या अब्दूल रहीम हार्डवेअर ट्रेडींग कंपनीला काल दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जालना जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात काल १२ नवीन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले. या कक्षात आजपर्यंत दाखल सर्व १०४ रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्यापैकी ८९ रुग्णांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. तर १२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. तिघांचे नुमने प्रयोगशाळेनं नाकारले आहेत. दरम्यान, दिल्ली इथल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी दोन संशयितांचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले असून हे दोघे विलगीकरण कक्षात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.

परभणी इथल्या जिल्हा रुग्णालयात काल २७ कोरोना संशयित रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात १२९ जणांचं घरी विलगीकरण करण्यात आलं आहे.

****

संचारबंदीत जालना शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर काल बऱ्यापैकी शुकशुकाट पहायला मिळाला. बसस्थानकासमोर एका युवतीनं हातात हस्तलिखित फलक घेऊन डॉक्टर, पोलीस आणि कोरोना विषाणूविरुद्ध लढणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

****

नांदेड शहर महानगर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी गेले सात दिवस रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. सोशल डिस्टसिंगचा नियम पाळून त्यांनी हे शिबिर घेतलं. सात दिवसात २४९ जणांनी रक्तदान केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

श्रीराम नवमी काल अत्यंत साधेपणानं साजरी झाली. भाविकांनी कोणत्याही मंदिरात न जाता घरोघरीच श्रीरामाचं पूजन केलं.

//**************//




No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...