Friday, 17 April 2020

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 17.04.2020 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 April 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ एप्रिल २०२० दुपारी १.०० वा.

**** 

कोरोना विषाणू संसर्गावर उपचार करून घेण्यास अनिच्छुक रुग्णांपासून डॉक्टर, परिचारिका तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या या निर्देशात, उपचारांबाबत उदासीन असलेल्या अशा रुग्णांपासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना असलेला धोका पाहता, त्यांना योग्य सुरक्षा देण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांची संख्या, त्यांच्यासाठीची निवासी शिबीरं तसंच कामगारांच्या समुपदेशनासाठी केलेल्या उपायांची माहिती दोन आठवड्यात देण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे.

दरम्यान, येत्या पाच मे पर्यंत फक्त आवश्यक खटल्यांची सूनावणी करण्यात येणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

****

सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात धान्य वाटप प्रकियेवर लक्ष देऊन, सर्व गोरगरीबांपर्यंत धान्य पोहोचेल याची खात्री करावी, असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांनी याबाबत सर्व पालकमंत्र्यांना आज पत्रं जारी केली. धान्यवाटप लाभार्थ्यांच्या अडचणींचं तत्काळ निराकरण करावं, असं पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतला धान्यसाठा तीन लाख ८७ हजार मेट्रिक टनावरून सात लाख ७४ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवला असून, गरजूंसाठी सुमारे दीड लाख मेट्रीक टनांहून अधिक धान्य उपलब्ध करून दिल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रशासकीय यंत्रणा करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

****

कोरोना प्रादुर्भावाचं संकट निवळल्यानंतर देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के एवढा होऊ शकतो, असं रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. जगभरात कच्चा तेलाच्या दरामध्ये घसरण होत असून, जगामध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. महागाईचा दरही खाली येत असून, या आर्थिक वर्षाच्या मध्यापर्यंत तो चार टक्क्यांपर्यंत कमी होईल, असा अंदाजही दास यांनी वर्तवला आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचं दास यांनी नमूद केलं. दरम्यान, बँकांनी आताच्या परिस्थितीत लाभांश वाटप करू नये, अशी सूचनाही रिजर्व्ह बँकेनं केली आहे.

****

पॅरासिटामोलपासून तयार केलेल्या औषधांवरची निर्यातबंदी केंद्र सरकारनं मागे घेतली आहे. मात्र पॅरासिटामोलच्या ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियन्टस, - सक्रिय औषधी घटकांवरची निर्यातबंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे. केंद्र सरकारनं कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन मार्च रोजी २६ औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, पॅरासिटामोल त्यापैकी एक आहे.

****

टाळेबंदीच्या काळात नागरिकांसाठी प्रशासनाच्या वतीनं विविध उपाय योजना करण्यात येत आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातल्या किन्ही गावातल्या धनश्री मोरे यांच्या आईसाठी या हेल्पलाईनद्वारे घरपोच औषध मिळाली. त्या बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर इथं पोलीस आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आमदार रमेश बोरनारे यांच्या वतीनं पाणी बॉटल, नाष्ट्याचे पाकीट वाटप करण्यात आले. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी निर्जंतुकीकरण कक्षही स्थापन करण्यात आला.

****

पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले इथल्या ग्रामस्थांनी चोर असल्याच्या गैरसमजातून तीन प्रवाशांची हत्या केली. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, चिखले, शिगाव भागातल्या अनेक गाव पाड्यांमध्ये सध्या चोर आले असल्याच्या अफवा पसरत असून या दरम्यान काल रात्री दाभाडी खानवेल मार्गावर नाशिक कडून येणाऱ्या वाहनातील प्रवाशांची विचारपूस केल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना चोर समजून दगड आणि इतर साहित्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती कासा पोलिसांनी दिली. घटनास्थळी पोलिसांच्या वाहनांची ही नासधूसही करण्यात आली असल्याच आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सोलापूर शहरात विडी घरकूल इथं एका परिचारिकेची गाडी जमावानं पेटवून दिली. कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी गर्दी करू नका, सामाजिक अंतर पाळा असं आपण जमावाला सांगितलं, मात्र जमावानं आपल्याला धमकी दिली आणि नंतर रात्री आपली गाडी जाळल्याचा आरोप या परिचारिकेने केला आहे. पोलीसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ होत असल्याचाही आरोप या परिचारिकेनं केला आहे.

//***********//






No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...