Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 18 April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १८ एप्रिल २०२० दुपारी १.०० वा.
****
मुंबईतील नौदलाच्या किमान २६ जवानांना कोरोना विषाणूची
बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आयएनएस आंग्रे इथं हे जवान कार्यरत होते. त्यांच्यावर
नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाधीतांच्या संपर्कात आले असलेल्यांचा शोध
घेण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी
तसंच नौदल मुख्यालय यावर लक्ष ठेऊन आहे. नौदलानं आपल्या सर्व संबंधित कार्यालयांमधील
जवानांना या विषाणूचा संसर्ग होऊ नये या करता सर्वाधिक खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या
आहेत.
****
तातडीनं उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना दाखल
करून न घेणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष
वर्धन यांनी दिला आहे. कोरोना विषाणू बाधीत रुग्णांशिवाय अन्य रुग्णांवरही उपचारांची
आवश्यकता लक्षात घेऊन रुग्णालय, आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्यांविरुद्ध ही कारवाई
केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.
****
औरंगाबाद इथं आज सकाळी एका कोरोना विषाणू बाधित ६५
वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा
त्रास होता. गेल्या तेरा तारखेला या महिलेला खासगी रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोळा एप्रिल रोजी या महिलेला संसर्ग झाल्याचं
स्पष्ट झालं होतं. औरंगाबादमधे या संसर्गामुळे
मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तीन झाली आहे. काल रात्री उशिरा शहरातील एका पंधरा वर्षीय
मुलाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यामधे विषाणूचा
संसर्ग झालेल्यांची संख्या २९ झाली आहे. यातील दोघांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून
सुटी देण्यात आली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तिन्ही कोरोनो विषाणू
बाधीत रुग्णांचा चौदा दिवसांच्या
उपचारानंतरच्या पहिल्या चाचणीचा अहवाल आज नकारात्मक आला आहे. धानुरी, बलसुर, उमरगा इथल्या या रुग्णांनी उपचारांना
चांगला प्रतिसाद दिला असून त्यांचा विलगीकरण कालावधी संपला आहे. आज या तिघांची आणखी एक चाचणी होणार असून याचा अहवाल नकारात्मक आल्यास ते कोरोना विषाणू
मुक्त झाल्याचं स्पष्ट होईल,
असं उस्मानाबादचे वैद्यकीय
अधीक्षक डॉ.
पंडित पुरी यांनी म्हटलं आहे.
****
अमरावती शहरात एका बावीस वर्षीय व्यक्तीला कोरोना
विषाणूची लागण झाली असल्याचं आज स्पष्ट झालं आहे. शहरात याची लागण झालेल्यांची संख्या
आता सहावर पोहोचली आहे. या रुग्णावर उपचार सुरू असून त्याच्या परिवारातल्या सर्वांना
विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे.
****
दिल्लीतील निजामुद्दीनमधे तबलिगी जमातीच्या मरकजसाठी
आलेले २९ परदेशी नागरिक कायद्याचं उल्लंघन करून अहमदनगरमध्ये राहिल्यानं त्यांना पोलिसांनी
अटक केली आहे. द्जिबुती, बेनिन, डिकोटा, आयव्हरी कोस्ट, घाना, इंडोनेशिया, ब्रुनेई
या देशांतील हे नागरिक आहेत. या परदेशी नागरिकांना नागरी रुग्णालयातून सुटी देण्यात
आल्यानंतर ही अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे. हे
नागरिक अहमदनगर जिल्ह्यामधील मुकुंदनगर, जामखेड, नेवासा येथील धार्मिकस्थळी राहिले
होते. पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करून या सर्वांना ताब्यात घेतलं असून त्यांची वैद्यकीय
तपासणी करण्यात आली आहे. त्यांना अहमदनगर जिल्ह्यात
वास्तव्य करण्यास मदत करणाऱ्यांविरूद्ध यापूर्वीच गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
कोरोना विषाणूमुळे लागू टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर
नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. मोसंबी
बाजारपेठेत नेन्यासाठी वाहन उपलब्ध नाहीत, माल खरेदी करणारे व्यापारी पुढे येत नसल्यामुळे
मोसंबी बागेतच पिकून सडून चालल्या आहेत. राज्य शासनानं अशा मोसंबी बागांची पाहणी करून
पंचनामे करावेत, फळ उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी अनुदान द्यावं अशी मागणी
या भागाचे नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य साहेबराव
धनगे यांनी केली आहे.
****
राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना विमा कवच मिळावं
यासाठी राज्याचे बांधकाम तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रयत्न करण्याचं
आश्वासन दिलं आहे. राज्य वृत्तपत्र विक्रेता
संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार यांना काल नांदेड इथं त्यांनी हे आश्र्वासन दिलं.
*****
***
No comments:
Post a Comment