Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 May
2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
देशातली
टाळेबंदी हटवण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आपलं धोरण स्पष्ट करावं, असं काँग्रेस नेते
खासदार राहूल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज सामाजिक माध्यमांवरून पत्रकारांशी बोलत
होते. यासंदर्भात पंतप्रधानांनी समोर येऊन जनतेला माहिती द्यावी, असं आवाहनही गांधी
यांनी केलं. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशातल्या कामगारांबाबत
केलेलं विधान योग्य नसल्याचं सांगत, प्रत्येक भारतीयाला देशभरात कोठेही काम करून, आपली
स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क असल्याचं, गांधी यांनी या पत्रकार परिषदेत नमूद केलं.
****
राज्यातला
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी
मागणी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केली आहे. राणे यांनी नुकतीच राज्यपालांची
भेट घेऊन ही मागणी केली, त्यासंदर्भात आज एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना, राणे यांनी
आपल्या या भूमिकेचा पुनरुच्चार केला. राज्यात कोरोना विषाणू बाधितांची रुग्णसंख्या
५२ हजारावर पोहोचली आहे, मृतांचा आकडा वाढत आहे, मात्र मुख्यमंत्र्यांना या प्रादुर्भावापेक्षा
आपली खुर्ची वाचवण्याची काळजी असल्याची टीका राणे यांनी केली. राज्यात राष्ट्रपती राजवट
लागू करावी, ही आपली वैयक्तिक भूमिका असल्याचं, राणे यांनी स्पष्ट केलं.
****
महाविकास
आघाडीचं सरकार भक्कम असून, कोणताही धोका नसल्याचं, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी
म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांत विविध पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांची भेट घेतल्यानंतर, राज्य सरकारसंदर्भात सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर
थोरात आज एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. सरकार म्हणून तीनही पक्ष एकत्र काम करत
आहेत, सरकार स्थिर असून उत्तम काम करत आहे. याबाबत काहीही शंका काढण्याचा प्रश्न नाही,
असं सांगतानाच थोरात यांनी, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांत केलेली
विधानं ही त्यांची वैयक्तिक मतं असल्याचं नमूद केलं
****
देशात
कोरोना विषाणूग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण ४१ पूर्णांक ६१ शतांश टक्के एवढं झालं
आहे. गेल्या २४ तासात देशात दोन हजार ७६९ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत ६० हजार ४९० रुग्ण
बरे होऊन घरी परतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोना
विषाणूची लागण झालेले ६ हजार ५३५ नवीन रुग्ण आढळले. देशातली रुग्णसंख्या एक लाख ४५
हजार ३६० झाली आहे. गेल्या २४ तासात या आजारामुळे १४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून,
आतपर्यंत एकूण मृतांची संख्या चार हजार १६७ झाली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
जालना
जिल्ह्यात आज आणखी २ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची
संख्या ७६ झाली आहे. बाधितांमध्ये जाफराबाद तालुक्यातील हिवराकाबली आणि जालना तालुक्यातील
वखारी वडगाव इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज कोरोना विषाणूची बाधा झालेले नवे २२ रुग्ण आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात
कोरोना विषाणूबाधित रुग्णांची एकूण संख्या एक हजार ३२७ झाली आहे.
****
अमरावती
जिल्ह्यात आज आणखी ४ रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं दिसून आलं. यात ३ महिला
आणि १ पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूची बाधितांची एकूण संख्या १८२
झाली आहे.
****
वर्धा
जिल्ह्यात विलगीकरणात असलेल्यांपैकी ३ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये
मुंबईतल्या सायन इथल्यर खाजगी रुग्णालयातली परिचारिका तसंच मुंबईतल्या चेंबूर परिसरातल्या
एका दाम्पत्याचा समावेश आहे. या तीन रुग्णांमुळे वर्धा जिल्ह्यात कोरोना विषाणूची बाधितांची
एकूण संख्या १६ झाली आहे.
****
अमरावती
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी इथं एका घरावर छापा टाकून चार लाख ७८ हजार रुपयांचा अवैध
गुटखा स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून संचारबंदीच्या
काळात आतापर्यंत १३ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये एकूण ११ लाख ८३ हजार रुपयांचा गुटखा
जप्त करण्यात आला असून सतरा जणांविरुद्ध गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
परभणी
जिल्ह्याच्या पाथरी पोलिस ठाण्यातल्या सहायक पोलीस निरीक्षकासह पाच कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात
कसूर केल्याबद्दल बदल्या करण्यात आल्या आहेत. पाथरी शहरात जमावबंदी तसंच संचारबंदीचा
आदेश असतानाही सामुहिक नमाजसाठी जमा होणाऱ्या नागरिकांना मज्जाव न केल्याबद्दल तसंच
वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना न दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. या सामुहिक
नमाज पठण प्रकरणी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांविरूध्द पाथरी पोलीस ठाण्यात
काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment