Tuesday, 21 July 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 21 JULY 2020 TIME 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 July 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ जुलै २०२० सायंकाळी ६.००
****
** राज्याची ओळख दर्शवणारी आणि बाजारपेठ असणाऱ्या पिकांची वाणं कृषी विद्यापीठांनी विकसीत करावीत - मुख्यमंत्र्यांचं आवाहन
** औरंगाबाद शहरात पाच तर बीड इथं दोन कोविडग्रस्तांचा मृत्यू
** जालन्यात ४८, नांदेड ३२ तर उस्मानाबाद जिल्ह्यात २० नवे कोविड रुग्ण
** खासदार फौजिया खान यांना कोरोना विषाणूची लागण
आणि
** शेतकऱ्यांच्या खात्यात दूध दर अनुदानाची रक्कम जमा होईपर्यंत दूध दरवाढ आंदोलन मागे घेणार नाही - सदाभाऊ खोत यांचा इशारा 
****
राज्याची ओळख दर्शवणारी आणि बाजारपेठ असणाऱ्या पिकांची वाणं कृषी विद्यापीठांनी विकसीत करावीत, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातल्या कृषीविद्यापीठांच्या कुलगुरूंशी दूरदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपवण्याची गरज असून संशोधनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. संघटित शेती आणि संघटित शेतकरी ही संकल्पना राबवून, जे विकलं जाईल तेच पिकवायची गरज आहे. यादृष्टीनं शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
देशात कोविड १९ आजाराचे रुग्ण बरे होण्याचा दर ६२ पूर्णांक ७२ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत ७ लाख २४ हजार ५७८ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. देशभरातला मृत्यू दरही कमी झाला काल देशभरात ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातल्या कोविड १९ च्या रुग्णांची एकूण संख्या ११ लाख ५५ हजार १९१ वर पोहाचली आहे.
****
औरंगाबाद शहरात आज पाच कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये न्याय नगरात इथली ५१ वर्षीय स्त्री, पडेगावातला ८३ वर्षीय पुरूष, हर्सुलच्या चेतना नगरातली ७० वर्षीय स्त्री, श्रेय नगर इथला ४८ वर्षीय पुरूष, आणि कन्नड तालुक्यातल्या देवगाव रंगारी इथली ६५ वर्षीय स्त्री रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आज दिवसभरात १९९ कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यामध्ये महापालिका हद्दीतल्या १३८ आणि ग्रामीण भागातल्या ५१ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता अकरा हजार ४४० झाली आहे. त्यापैकी सहा हजार तीनशे रुग्ण उपचार घेवून बरे झाले आहेत. तर ४०५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे आणि चार हजार ७३५ जणांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्हा रुग्णालयात आज सकाळी दोन कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. यात रुग्णालयात कार्यरत परिचारिकेचा समावेश असून गेल्या दहा दिवसांपासून त्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार करत होत्या. काल त्यांच्यात लक्षणं आढळून आल्यामुळं त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, मात्र तपासणी अहवाल येण्यापूर्वीच या परिचारिकेचा मृत्यू झाला.
****
जालना शहरात आज ४८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. बाधितांमध्ये ४७ रुग्ण जालना शहरातल्या वेगवेगवळ्या भागातले तर एक रुण्ग भोकरदन तालुक्यातल्या बोरखेडी इथला रहिवासी आहे. जिल्ह्यातल्या एकूण बाधित रुग्णांची संख्या आता एक हजार ५४९ झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज नव्याने ३२ कोरोनाविषाणू बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यात एकूण बाधीत रुग्णांची संख्या एक हजार १८ झाली आहे. आज ४० रूग्ण बरे झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात २० कोरोना विषाणूबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातली रुग्णसंख्या ५७३ झाली आहे. त्यापैकी ३३८ जण या आजारातून बरे झाले असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान यांचा कोरोना विषाणू तपासणी अहवाल बाधित आला आहे. यामुळं परभणी इथं त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोना विषाणू तपासणी करून घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
दरम्यान, कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज सायंकाळी पाच वाजेपासून २६ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
****
धुळे जिल्ह्यात ३७ नव्या कोरोना विषाणूबाधित रुग्णांची भर पडली तर एका वृद्धेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ७१ रुग्ण आढळून आले असून त्यातील १ हजार ४२४ जण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत तर ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, धुळे शहरात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता २८८ भागांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
****
सोलापूर शहरात आज १५३ नव्या कोरोनाविषाणूबाधितांची नोंद झाली आहे तर ५९ रुग्णांना विषाणूमुक्त झाल्यामुळं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आज दोन जणांचा या आजारामुळं मृत्यू झाला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आज १०० रुग्णांनी कोविड १९ या आजारावर मात केली आहे. यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार २३३ झाली आहे.
****
ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच्या निर्णयामागे कोणताही प्रकारचा राजकीय हेतू नसून लोकशाही मार्गाने, पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने योग्य कार्यक्षम व्यक्तीची नियुक्ती व्हावी हीच अपेक्षा असल्याचं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी, राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर केल्या जाणाऱ्या प्रशासकाच्या नियुक्तीबाबत हसन मुश्रीफ यांना पत्र लिहीलं होतं, त्याच्या उत्तरादाखल मुश्रीफ यांनी हजारे यांना पाठवलेल्या पत्रात ही बाब स्पष्ट केली आहे. त्र्याहत्तरावी घटनादुरूस्ती, न्यायालयांचे निर्णय, कोविड १९ मुळे निवडणूका न घेता येणं, या सर्व बाबींचा विचार करूनच हा निर्णय शासनाला घ्यावा लागला असल्याचं मुश्रीफ यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
****
शेतकऱ्यांच्या खात्यात दूध दर अनुदानाची रक्कम जमा होईपर्यंत दूध दरवाढ आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रमुख माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गायीच्या दुधाला प्रतिलीटर दहा रुपये दरवाढ, दूध भुकटी निर्यातीला परवानगी यासह अनेक मागण्या या बैठकीत करण्यात आल्याचं खोत यांनी यावेळी सांगितलं.
****
अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निश्चितच उपस्थित राहणार असल्याचं, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे यांना या सोहळ्याचं आमंत्रण येईल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. राम मंदिराच्या मुद्याशी शिवसेनेचं भावनिक, धार्मिक आणि राष्ट्रीय नातं असल्यानं, मुख्यमंत्री ठाकरे या सोहळ्याला नक्की जातील, असं राऊत यांनी नमूद केलं.
****
आकाशवाणी नांदेड केंद्राचे सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी भीमराव शेळके यांचं आज दुपारी नांदेड इथं निधन झालं ते ६३ वर्षांचे होते. नांदेड आकाशवाणी केंद्रावर वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची आखणी करून त्यांनी मोठा श्रोतावर्ग निर्माण केला आहे.
****
एक ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या  ईद-उल अजहा - बकरी ईद निमित्त आज औरंगाबादचे  पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात मुस्लिम धर्मगुरु आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत बैठक घेतली. राज्य शासनाने बकरी ईदसंदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. बकरी ईदच्या दिवशी शहरातल्या मशीदींमध्ये नमाज पठण करु द्यावे, शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित आंतराच्या नियमाचं पालन करत ईदसाठी जनावरांचे बाजार भरवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही खासदार जलील यांनी यावेळी केली. पैठण पोलीस ठाण्यातही बकरी ईद निमित्त आज पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक झाली. नगराध्यक्ष सूरज लोळगे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस स्टेशनच्या प्रांगणात राबवण्यात येत असलेल्या घनवन आनंद या वन प्रकल्पाचा शुभारंभ नांदेडचे शहर पोलिस उपनिरिक्षक अभिजित फस्के यांच्या हस्ते आज करण्यात आला. या निमित्तानं ३०० वृक्षांची घनवन पद्धतीनं लागवड करण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पाणी आलं असून आज हिमायतनगर भागातल्या हरडप पुलाजवळ एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. गुरख्यांनी ही घटना तहसील कार्यालयाला कळवली असून प्रशासन याबाबतची माहिती घेत आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाउस झाला. तालुक्यातल्या अंभई, सिरसाळातांडा, पिंपळगाव घाट, शेखपूर, रेलगाव, बोजगाव आदी ठिकाणी झालेल्या या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून शेतातल्या मका, कपाशी, उडीद, मूग या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
****
बीड जिल्ह्यात सहा महसूल मंडळात आज अतिवृष्टी झाली असून जिल्ह्याने पावसाची पन्नास टक्के सरासरी ओलांडली आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं असून लघू-मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...