Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 September 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ सप्टेंबर २०२० सायंकाळी
६.००
****
**
कुशल मनुष्यबळ घडवणाऱ्या मिशन कर्मयोगी अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
**
पब जी सह आणखी ११८ ॲप्सवर केंद्र सरकारची बंदी
**
अभिनेता सुशांतसिंह राजपुत मृत्यू प्रकरणात एका अंमलीपदार्थ विक्रेत्याला अटक
**
धार्मिक स्थळं उघडण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले खासदार इम्तियाज जलील पोलिसांच्या
ताब्यात
आणि
**
औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन कोविडग्रस्तांचा मृत्यू; परभणीत नवे ६६ रुग्ण
****
केंद्रीय
मंत्रिमंडळानं आज मिशन कर्मयोगी या अभियानाला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय नागरी सेवा
क्षमता निर्मितीच्या उद्देशानं सुरू होणाऱ्या या अभियानातून रचनात्मक, वैचारिक अधिष्ठान
असलेले, नवोन्मेषी, तसंच व्यावसायिक दृष्टिकोन असलेले कर्मचारी घडवले जाणार आहेत. कुशल
मनुष्यबळ निर्मितीच्या दृष्टीनं सरकारचं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं केंद्रीय माहिती
आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. ते आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर
पत्रकारांशी बोलत होते. आज झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं जम्मू काश्मीर राजकीय
भाषा विधेयक संसदेत सादर करण्यास मंजुरी दिली. या भाषांमध्ये उर्दू, काश्मिरी, डोगरी,
हिंदी तसंच इंग्रजी भाषेचा समावेश आहे.
****
केंद्र
सरकारनं पब जी सह आणखी ११८ ॲप्सवर बंदी घातली आहे. यापूर्वी सरकारनं टीक टॉक सारख्या
काही चीनी ॲप वर बंदी घातली होती. या ॲप्सच्या माध्यमातून देशाची सुरक्षा आणि अखंडतेला
धोका असल्याच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्रीय
अर्थ मंत्रालयानं वार्षिक दिनदर्शिका, डायरी, शुभेच्छापत्र यासारख्या प्रकाशनांवर बंदी
घातली आहे. यासंदर्भात मंत्रालयानं आज आदेश जारी केले असून, सर्व मंत्रालयं, तसंच सार्वजनिक
उपक्रम आणि स्वायत्त विभागांना ते लागू आहेत. याऐवजी डिजिटल ऑनलाईन सामुग्रीचा वापर
करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर कॉफीटेबल बुकच्या प्रकाशनावरही बंदी
घालण्यात आली असून, त्याऐवजी ई-बुक्सचा उपयोग करण्यास प्रोत्साहन देण्याची सूचना करण्यात
आली आहे.
****
अभिनेता
सुशांतसिंह राजपुत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं एका अंमलीपदार्थ
विक्रेत्याला अटक केली आहे. जैद नावाचा हा इसम मुंबईत होणाऱ्या मोठमोठ्या पार्ट्यांसाठी
अंमलीपदार्थ पुरवत असल्याचं समोर आलं आहे. अंमली पदार्थांच्या खरेदीबाबत सुशांतसिंहची
मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमधून मिळालेली माहिती अंमलबजावणी संचालनालय
ईडीने - अंमली पदार्थ नियंत्रण विभागाला दिली होती, त्या माहितीवरून या विभागानं मुंबईतून
दोन जणांना अटक केली होती, त्याच्या चौकशीनंतर आजची ही कारवाई करण्यात आली. या तिघांशिवाय
महाराष्ट्र, दिल्ली आणि गोव्यातल्या अंमली पदार्थांच्या काही व्यापाऱ्यांचा शोध सुरू
असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
संसदेचं
पावसाळी अधिवेशनात प्रश्नोतराचा तास आणि खाजगी विधेयकं सादर होणार नाहीत. शून्य काळातल्या
कामकाजावरही काही निर्बंध राहणार आहेत. या अधिवेशन काळात कामकाजाला सुटी राहाणार नसून
दोन्ही सभागृहाचं कामकाज शनिवारी आणि रविवारीही होणार आहे. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर
दोन्ही सदनाचं कामकाज सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी तीन ते संध्याकाळी सात या वेळेत
होणार आहे. पावसाळी अधिवेशनाला येत्या १४ तारखेपासून सुरुवात होणार असून ते एक ऑक्टोबरपर्यंत
चालणार आहे.
****
राज्यात
कोविड प्रादुर्भावावर नियंत्रणाऐवजी राज्य सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात अधिक
स्वारस्य असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
ते आज नागपूर इथं पूरग्रस्त भागाचा दौऱ्या करण्यासाठी आले असता, पत्रकारांशी बोलत होते.
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी बदल्यांना स्थगिती देता येऊ शकते, असंही
ते म्हणाले.
****
विद्यापीठाच्या
अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज
मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या
आदेशाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी सामंत यांची ही भेट होती. कोणतंही विद्यापीठ
अथवा राज्य, विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा घेतल्याशिवाय त्यांना बढती देऊ
शकत नाही असा निर्वाळा गेल्या आठवड्यातच सर्वोच न्यायालयानं दिला आहे. येत्या ३० तारखेपर्यंत
परीक्षा घेण्याबदद्दलही विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीनं सूचित केलं आहे. दरम्यान,
राज्यातल्या १३ विद्यापीठांनी या परीक्षांच्या तारख्या वाढवाव्यात आणि निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत
लावावेत अशी विनंती केली असल्याचं सामंत यांनी परवा सोमवारी सांगितलं होतं.
****
अखिल
भारतीय विद्यार्थी परिषदेनं विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी अकोल्यात डॉ. पंजाबराव
देशमुख कृषी विद्यापीठात कुलगुरूंच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन
केलं. परीक्षा शुल्कात ३० टक्के कपात, शैक्षणिक शुल्क भरण्यास सवलत, आदी मागण्यांची
विद्यापीठ दखल घेत नसल्यानं, हे आंदोलन करण्यात आलं. कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी
आंदोलकांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा केल्याचं वृत्त आहे.
****
जालना
जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या काही जिल्हा मार्गांच्या दर्जात वाढ
करुन हे मार्ग राज्यमार्गांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय
सार्वजनिक बांधकाम विभागानं आज जारी केला. यामध्ये सावरगाव - गुंज - नाथनगर - राजाटाकळी
- अंतरवाली टेंभी - तीर्थपुरी - सुखापूरी - सोनकपिंपळगाव, तसंच डोणगाव - विहामांडवा
- तुळजापूर आणि आपेगाव - चकलंबा - आर्वी - पाडळी - रायमोहा - पाटोदा रस्त्याचा समावेश
आहे. याशिवाय भोकरदन - जालना - रांजणी - परतूर - कुंभार पिंपळगाव - तीर्थपूरी - वडीगोद्री,
तसंच आंतरवालीसराटी - नालेवाडी - भांबेरी या रस्त्यांचा दर्जा वाढवून ते आता राज्य
मार्गांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या रस्त्यांवरची वाहतूक, गावांची संख्या,
तसंच रस्त्यांचा एकूण होणारा वापर लक्षात घेता, या रस्त्यांना राज्य मार्गांचा दर्जा
देण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी शासनाकडे
सादर केला होता, त्याला मंजुरी देण्यात आली.
****
राष्ट्रीय
बाल पुरस्कार २०२१ साठी अर्ज करण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रतिभावान
बालकं, व्यक्ती तसंच संघटनांना हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कार प्राप्त बालकांना
प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावरच्या संचलनात सहभागी करून घेतलं जातं.
****
धार्मिक
स्थळं उघडण्यासंदर्भात आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील
यांना आज पोलिसांनी ताब्यात घेत, आंदोलन करण्यापासून रोखलं. खासदार जलील हे काही कार्यकर्त्यांसह
आपल्या कार्यालयापासून शहागंज भागातल्या बडी मशिदीत दुपारची नमाज अदा करण्यासाठी जात
होते. मात्र, पोलिसांनी त्यांना त्याआधीच ताब्यात घेतलं आणि काही वेळानंतर सोडून दिलं.
त्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना जलील यांनी शासनाच्या सर्व निर्देशांचं पालन करुन मशिदीत
नमाज अदा करण्याची मुस्लिम बांधवांना परवानगी द्यावी अशी मागणी केली. जोपर्यंत धार्मिक
स्थळं उघडत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचंही ते म्हणाले.
****
औरंगाबाद
शहरातल्या छावणी परिसरात बसवल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणपतींचं दरवर्षी प्रमाणे यंदाही
अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज विसर्जन करण्यात येत आहे. कुठलीही मिरवणूक
आणि गर्दी न करता नागरिक साधेपणाने गणेश मूर्तींचं विसर्जन करत आहेत.
****
देशात
कोविड संसर्गातून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. गेल्या
२४ तासांत देशभरात ६२ हजारावर रुग्ण बरे झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात
आली, आता देशात या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २९ लाखापेक्षा अधिक झाली
आहे. गेल्या २४ तासांत देशात कोविड संसर्ग झालेले ७८ हजार ३६७ नवे रुग्ण आढळले, यातले
५० टक्के रुग्ण महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि उत्तरप्रदेश या पाच
राज्यातले आहेत. देशातली कोविडबाधितांची एकूण संख्या आता ३७ लाख ६९ हजार ५२४ झाली आहे.
यापैकी आतापर्यंत ६६ हजार ३३३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, हा मृत्यूदर आता
१ पूर्णांक ७६ शतांश टक्के झाला आहे
****
कोविड-19
च्या संक्रमणातून बरे होण्याचा राज्यातला दर ७२ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे.
राज्यात आतापर्यंत या आजाराच्या संक्रमणातून ५ लाख ८४ हजार ५३७ जण बरे झाले आहेत. राज्यातल्या
विविध रुग्णालायत सध्या एक लाख ९८ हजार ५२३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज तीन कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या मृतांची संख्या
आता ७१० झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या २३ हजार ६९४ झाली आहे.
****
परभणी
जिल्ह्यात आज ६६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातल्या एकूण कोरोना विषाणू
बाधित रुग्णांची संख्या आता दोन हजार ६५६ एवढी झाली आहे. यापैकी एक हजार ५५ रूग्ण बरे
झाले असून १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार ४८०जणांवर उपचार सुरु असल्याचं
जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
मुंबईत
कोविड बाधितांची संख्या १ लाख ४५ हजार ८०५ वर गेली आहे. तर या संसर्गामुळे मृतांचा
आकडा ७ हजार ६५५ वर पोहचला आहे. आतापर्यंत एक लाख १७ हजार २६८ रुग्ण कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त होऊन घरी परतले आहेत.
****
पालघर
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या आता २५ हजाराच्या वर गेली आहे. जिल्ह्यात
आतापर्यंत ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत २१ हजार २५२ इतके रुग्ण कोरोना
विषाणू संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
गडचिरोली
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून आलेला पूर ओसरला आहे. बंद पडलेले सर्व रस्ते सुरु
झाल्यानं जनजीवन पूर्ववत झालं आहे. जिल्ह्यात पाऊस नसला तरी गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे जिल्ह्यात चार दिवस पूर होता. दरम्यान,
वैनगंगा नदीच्या पाण्यामुळे गोदावरी आणि प्राणहिता नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ
होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी,
असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी
धरणाची पाणी पातळी सध्या ९४ पूर्णांक ८३ शतांश टक्के झाली आहे. धरणात सध्या आठ हजार
७८५ घनफूट वेगानं पाणी दाखल होत आहे. धरणाची पाणी पातळी ९५ टक्के पेक्षा जास्त झाल्यावर
आणि पाण्याची आवक सुरुच राहिल्यास धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याचं प्रशासनानं
कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment