Friday, 4 September 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 04 SEPTEMBER 2020 TIME – 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 September 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

**परभणीमधे कोरोना योद्ध्यासह दोघांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू

**सातबाऱ्यामध्ये बारा बदल - महसूलमंत्र्यांची माहिती

**सैन्यदल कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज - सैन्यदल प्रमुख नरवणे 

आणि

**गोदावरी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा

****

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रशिक्षण काळात वैद्यकीय सेवा देणाऱ्या २४ वर्षाच्या `कोरोना योद्धा` डॉक्टरांचा आज सकाळी या विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. परभणी तालूक्यातल्या पिंगळी गावातल्या एका व्यक्तीचाही या विषाणू संसर्गावर उपचार सुरू असताना आज मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयानं दिली आहे.

****

औरंगाबादमधे कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत असलेल्या एका ६५ वर्षीय महिला रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला. शहरातल्या आरेफ कॉलनी इथल्या या रुग्णावर शासकीय महाविद्यालय रुग्णालय `घाटी`मधे उपचार सुरू होते. जिल्ह्यात आतापर्यंत ७२६ रुग्णांचा या विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. 

****

धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे १९१ रुग्ण आढळले आहेत तर दोन रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात या आजाराचे आतापर्यंत ९ हजार २०४ रुग्ण आढळले असून २६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ८२५ झाली आहे.

****

राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत ग्रामपातळीवरील महसुली लेखांकन पद्धत म्हणजेच सातबारामध्ये १२ बदल करण्यात आले असल्याचं महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. यात प्रत्येक गावासाठी संगणकीय सांकेतिक क्रमांक, प्रत्येक सात बारावर सांकेतिक चिन्हासह शासनाचा शिक्का आणि `क्यूआर कोड` हे सातबाराचं वैशिष्ट्य ठरणार असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे. यापुढे आता प्रत्येक गाव आणि खातेदाराला स्वतंत्र वैयक्तीक संगणकीय क्रमांक देण्यासोबत गाव नमुना नंबर ७ अधिकार अभिलेख पत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सातबारा उताऱ्यात नव्या बदलामुळे राज्यातील जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसूलविषयक वाद कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही मंत्री थोरात यांनी व्यक्त केला आहे.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपुत हत्या प्रकरणाशी संबंधित आरोपी, अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आब्देल बासित परिहार याला स्थानिक न्यायालयानं नऊ सप्टेंबर पर्यंत अमली पदार्थ नियंत्रण विभागाची कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याच्या सांगण्यावरुन अमली पदार्थ पुरवत असल्याची कबुली परिहार यानं दिल्याचं विभागानं न्यायालयात सांगितलं. अमली पदार्थांच्या मोठ्या पुरवठादारांमधला परिहार हा एक आहे, असंही विभागानं म्हटलं आहे.

****

ज्यांना महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहणं सुरक्षित वाटत नसेल त्यांना राज्यात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. अभिनेत्री कंगना रणावत हिनं मुंबईची पाकव्याप्त काश्मीर सोबत तुलना केली होती आणि पोलिसांवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. मुंबई आणि पोलिसांबद्दल कंगनाचं विधान हास्यास्पद असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

****

या खरीप हंगामात एक हजार ९५ लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी झाल्याची माहिती सरकारनं दिली आहे. धान्याची पेरणी अजून सुरु असून, डाळी, बाजरी आणि तेलबियांची पेरणी पूर्ण झाली असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं आहे. खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाली असून, कोरोना विषाणू संसर्गाच्या महामारीचा यावर काहीही परिणाम झाला नसल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ परिस्थिती संवेदनशील आणि तणावपूर्ण आहे, मात्र आपले सैनिक कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सैन्यदलाचे प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीमेवर सैनिक तैनात करण्यात येत असून, आपल्या देशाचं सार्वभौमत्व अबाधित असल्याचं त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. भारत आणि चीन मधला वाद चर्चा करुन सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

**** 

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची - जेईई आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची - एनईईटी परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी दुसरी याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यावेळेस विरोधी पक्षांचं सरकार असलेल्या सहा राज्यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायालयानं आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं या याचिकेत म्हटलं होतं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या जलविद्युत केंद्रामधून एक हजार ५८९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी आज नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. त्यामुळे नागरीकांनी चल, अचल मालमत्ता गोदावरी नदीपात्रातून काढून घ्यावी, कोणीही नदीपात्रात जाऊ नये आणि कोणतीही जीवीत आणि वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असं अवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागानं केलं आहे. दरम्यान, जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून आज १०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. तर उजव्या कालव्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या चार हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत असून धरणाची पाणी पातळी ९७ पूर्णांक ०८ शतांश टक्के झाली आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानीच्या नियमांनुसार २५ टक्के रक्कम आगाऊ देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा आमदार अभिमन्यू पवार यांनी दिला आहे. जिल्ह्यातल्या खरीप पिकांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. दरम्यान, लातूर तालूक्यातल्या येळी ढोकी, भिसेवाघोली, शिराळा या परिसरात  पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे प्रशासनानं तातडीनं पंचनामे करावेत, असं आमदार धिरज देशमुख यांनी म्हटलं आहे.  

****   

औरंगाबादचे नवे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडून आज पदभार स्विकारला. गुप्ता यांनी यापूर्वी २००३ ते २००५ दरम्यान औरंगाबादच्या पोलिस उपआयुक्त पदावर काम केलं आहे. ते केंद्रीय नियुक्तीवरून राज्यात परतले आहेत. शांतता आणि सौहार्दाचं वातावरण राखण्याचं प्रयत्न आपण करणार असून गुन्हे कमीत कमी व्हावे आणि त्यांची उकल लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्नशील राहू, असं त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. औरंगाबाद पोलीस दलासाठी नागरिकांच्या काही सूचना  असल्यास त्यांचं स्वागत केलं जाईल, असंही ते यावेळी म्हणाले.

****

परभणीच्या शासकीय रुग्णालयातल्या कोरोना विषाणू कक्षातून पळून गेलेल्या तिसऱ्या बंदीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या मंगळवारी या कक्षात उपचार घेत असलेले तीन बंदी पळून गेले होते. त्यातल्या दोघांना अटक करण्यात आली होती. तिसऱ्या बंदीला सेलू मधल्या एका हॉटेलच्या परिसरात सापळा रचून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

****

लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग तपासणीच्या तात्काळ चाचण्यांसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीचा तुटवडा नसल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातल्या महापालिका औषधी भंडारात १४ हजार ७०० तर जिल्हा शल्य चिकीत्सक भंडारात १० हजार ९०० `किट` उपलब्ध असल्याचं त्यांनी एका निवेदनाद्वारे कळवलं आहे.

****

पुण्यात कार्यरत असलेले खाजगी वृत्तवाहिनीचे वार्ताहर पांडूरंग रायकर यांचा कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर शासकीय रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघानं केला आहे. रायकर यांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांची आर्थिक मदत द्यावी अशा मागणीचं निवेदन संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे यांना पाठवलं आहे. संघटनेच्या पत्रकारांनी आज शासनाच्या आरोग्य सेवेतल्या अनास्थेचा निषेध म्हणून दिवसभर काळ्या फिती लावून काम केले.

****

औरंगाबाद इथल्या हर्सुल कोलठाणवाडी रस्त्यावरील सात एकर जमिनीवर सुरू अनधिकृत भुखंड विक्रीविरुद्ध महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागानं आज कारवाई केली. 

****

पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड -पाली मार्गावर वाकडुपाडा इथं राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कंटेनरमधे झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह अकरा जण जखमी झाले आहेत. काल संध्याकाळी झालेल्या या अपघातातल्या जखमींना उपचारांसाठी विक्रमगडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

धुळे तालुक्यात मोरदडतांडा शिवारात काल रात्री पोलिसांनी एका दुकानावर छापा टाकुन अवैधपणे साठवलेला गुटखा ताब्यात घेतला असून याची किंमत सुमारे दहा लाख एक्कावन्न हजार रुपये आहे. दुकानातल्या चाळीस पोत्यांमध्ये हा गुटखा दडवण्यात आला होता, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेमधे दिली आहे.

****

नवी मुंबईमधे कर्ज वितरीत करण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याच्या आरोपावरून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कर्ज वितरीत करणारे प्रतिनिधी भासवण्यासाठी या तिघांकडून खोटा दस्तावेज सादर केला जात असे आणि विविध शुल्काच्या नावाखाली पैसे लुबाडले जात, असं वरिष्ठ पोलिस निरीक्षक भालचंद्र पालव यांनी सांगितलं. या तिघांनी नेरुळ भागातल्या तिघांना फसवून सुमारे आठ लाख रुपये लुबाडल्याचा आरोप असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

****

No comments: