Wednesday, 2 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.09.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 September 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकाविना गणरायाला निरोप; विसर्जना दरम्यान राज्यात सात जणांचा मृत्यू.

·      माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

·      राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं निधन.

·      अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची संयुक्त प्रवेश परिक्षेला प्रारंभ.

·      राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्या आठ लाखावर; काल दिवसभरात ३२० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

आणि

·      मराठवाड्यातल्या सहा जिल्ह्यात ४२ बाधित रुग्णांचा मृत्यू तर एक हजार १०१ नवीन रुग्णांची नोंद.

****

दहा दिवस मनोभावे पूजन केलेल्या गणरायाला काल भक्तीभावानं निरोप देण्यात आला. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कुठेही मिरवणुका न काढता काल गणेश विसर्जन पार पडलं. गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनानं ठिकठिकाणी विसर्जन व्यवस्था केली होती. विसर्जनादरम्यान काल राज्यात सात जणांचा बुडून मृत्यू झाला.

 

मुंबईत विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी ३५ हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. पुण्यातही मानाच्या गणेश मूर्तींसह इतर मूर्तींचं साधेपणानं मिरवणुका न काढता विसर्जन झालं. पुण्यात १२८ वर्षात प्रथमचं मिरवणुकीनं होणारी गणेश विसर्जनाची परंपरा खंडीत झाली. अधिक माहिती देत आहेत, आमचे प्रतिनिधी –

पुण्याची ‘श्रीं’ ची मिरवणूक खरंतर जगभर प्रसिध्द आहे. पण यंदाच्या कोरोनाच्या संसर्गामुळं ही मिरवणूक निघालीच नाही. टाळ, मृदुंग आणि ढोलताशांच्या गजरात, बँडच्या सुरावटीत लाडक्या बाप्पाला वैभवशाली मिरवणुकीनं भावपूर्ण निरोप देण्याची पुण्याची परंपरा. यंदाच्या १२८व्या वर्षात मात्र ही परंपरा खंडीत झाली. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘श्रीं’ ची मिरवणूक निघाली नसली तरी मानाच्या पाचही गणपती मंडळांसहीत प्रमुख मंडळांनी ‘श्रीं’ च्या विसर्जनाची ऑनलाईन व्यवस्था केली होती. त्यामुळे नागरिकांनी घरी बसूनच हा विसर्जन सोहळा पाहिला.

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रसाद पाठक यांच्यासह मनोज क्षीरसागर, पुणे.

औरंगाबाद महापालिकेनं शहरात २२ ठिकाणी मूर्ती संकलन करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली होती, तर अकरा ठिकाणी थेट विसर्जनाची व्यवस्था होती. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिरात बसवलेल्या गणेश मूर्तीचं मंदिरासमोरच व्यवस्था केलेल्या कृत्रिम कुंडात विसर्जन झालं. ग्रामीण भागातही गणेश मूर्ती संकलनासाठी फिरत्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

जालना नगरपालिकेनं शहरातल्या प्रत्येक प्रभागातून वाहनाद्वारे गणेश मूर्तींचं संकलन करुन त्यांचं तराफ्यांच्या सहाय्यानं मोती तलावात विसर्जन केलं.

परभणी महानगरपालिकेनं प्रभाग निहाय गणपती एकत्रित करून त्यांचं विसर्जन केलं.

नांदेड जिल्ह्यात अत्यंत साधेपणानं सामाजिक आंतर राखत गणेश विसर्जन पार पडलं. जिल्ह्यात ठिकठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वतीनं गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. नांदेड शहरात १४, तर आसना नदीकाठी पासदगाव आणि सावंगी पुलाजवळ तर झरी इथं कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते.

बीड जिल्ह्यातही साधेपणानं आणि शिस्त पाळून गणपती विसर्जन झालं. संकलित झालेल्या मूर्तींचं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विहीरीत विसर्जन केलं.

हिंगोली जिल्ह्यात मिरवणूक, ढोल-ताशांची वर्दळ नसल्यानं साध्या पद्धतीने, शांततेत गणपती विसर्जन झालं. हिंगोली नगरपरिषदेच्या वतीनं फिरत्या कुंडाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

दरम्यान, गणपती विसर्जनादरम्यान राज्यात सात जणांचा बुडून मृत्यू झाला.

नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी विसर्जनाच्या वेळी पाच जण बुडाले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून, दोन जणांना वाचवण्यात यश आलं, तर एकाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

देवळाली गाव इथं वालदेवी नदीकिनारी वडारवाडी इथला नरेश कोळी हा वालदेवी नदी मध्ये बुडाला, तर चेहडी पंपिंग वालदेवी दारणा नदी संगम या ठिकाणी अजिंक्य गायधनी हा युवक बुडाला असून, त्याचा शोध सुरु आहे.

निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा कादवा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला, तर दोन कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं.

जालना शहराल्या काद्राबाद झेंडा परिसरातले तीन जण गणेश विसर्जनासाठी रोहनवाडी शिवारातल्या शेतात गेले असता विहीरीत पडले. त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर एक जण वाचला.

बुलडाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातल्या नागझरी पुलाजवळ अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर नाका इथले दोन सख्खे भाऊ गणेश विसर्जन करताना बुडाले.

पुणेनजिक वाघोली इथला १८ वर्षाच्या मुलाचा गणपती विसर्जनादरम्यान तलावात बुडून मृत्यू झाला.

****

माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर काल नवी दिल्लीत शासकीय इतमामात कोविड प्रतिबंधासंबंधीचे नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्यदलाच्या वतीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यापूर्वी काल सकाळी मुखर्जी यांच्या निवासस्थानी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नवी आझाद, लोकसभेतले काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, यांच्यासह अनेक नेत्यांनी मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पायदल, वायुदल, तसंच नौदल या तीनही संरक्षण दलाच्या प्रमुखांनी मुखर्जी यांना मानवंदना दिली. १० ऑगस्टला मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्यापासून कोमात असलेले मुखर्जी यांचं परवा सायंकाळी दिल्लीतल्या सैन्य रुग्णालयात निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते.

****

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरच्या वीरमठ संस्थानचे मठाधिपती राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं काल नांदेड इथं निधन झालं, ते १०४ वर्षांचे होते. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना तीन दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यांच्यावर नांदेड इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. लिंगायत समाजाचे ते धर्मगुरु होते. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशात त्यांचा मोठा भक्त वर्ग आहे.

डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्म १९१७ मध्ये झाला होता. १९३२ साली वीरमठ संस्थानचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची घोषणा झाली. साहित्य विशारद आणि एमबीबीएस पदवीधारक असलेल्या महाराजांनी १९४७च्या स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय सहभाग दिला आणि दोन वेळा तुरुंगवासही भोगला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते प्रचारक होते. इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, पंजाबी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या इच्छेनुसार अहमदपूर इथल्या भक्तीस्थळावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरुतुल्य अशी वंदनीय मूर्ती काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनीही शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा जे ई ई कालपासून सुरु झाली. देशभरातल्या ६६० केंद्रांवर होत असलेल्या या परीक्षेसाठी नऊ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा केंद्रांवर कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे.

दरम्यान, - जेईई परीक्षा स्थगित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिला आहे. मात्र राज्यात विशेषत: विदर्भातल्या पूरग्रस्त भागातून एखादा उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहोचू शकला नाही, किंवा उशीरा पोहोचला, तर तो राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडे पुनर्परीक्षेची मागणी करू शकतो, असं खंडपीठानं म्हटलं आहे. अशा अर्जांचा विचार करून त्याची सत्यता पडताळून परीक्षा संस्थेनं त्याबाबत १५ दिवसांत निर्णय घ्यावा, असंही खंडपीठानं, म्हटलं आहे.

****

राज्य सरकारनं राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर मध्य रेल्वेनंही आजपासून राज्यातर्गंत प्रवासासाठी रेल्वे तिकीट नोंदणी सुरू केली आहे.  यासंदर्भात मध्य रेल्वेनं एक पत्रक जारी केलं असून आरक्षण पद्धतीने राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होणार असून, सध्या देशात ज्या लांब पल्ल्याच्या २०० रेल्वे सुरु आहेत, त्याचं रेल्वेचं तिकीट आरक्षित करता येईल, असं या पत्रकात म्हटलं आहे.

****

राज्यातील सर्व खासगी आणि धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या रुग्णालयांमधल्या शासनाने दर नियंत्रित केलेल्या ८० टक्के खाटा कोरोना विषाणू संसर्ग तसंच अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या निर्णयाला राज्य शासनानं तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सुधारित अधिसूचना जारी केली आहे.

विविध कायद्यांमधील तरतुदींनुसार जारी करण्यात आलेले हे आदेश पाळणं रुग्णालयांवर बंधनकारक आहे. याचबरोबर शासन निर्धारित दरानुसार रुग्णांवर उपचार करणंही बंधनकारक असून या दरसूचीमध्ये आता ऑक्सीजनचे दर देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.  

****

राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येनं आठ लाखाचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात १५ हजार ७६५ रुग्ण आढळल्यानं राज्यातली एकूण रुग्णसंख्या आठ लाख आठ हजार ३०६ झाली आहे. काल ३२० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत २४ हजार ९०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल दहा हजार ९७८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत पाच लाख ४२ हजार ५३७ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ९८ हजार ५२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यातल्या सहा जिल्ह्यात काल ४२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी एक हजार १०१ रुग्णांची नोंद झाली.

जालना जिल्ह्यात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ९७ रुग्णांची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ३१२ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला, ते नवे २३४ बाधित रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यातली आठ रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी २२४ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १६८ रुग्णांची भर पडली. परभणी जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ६६ रुग्ण आढळले.

****

मुंबईत काल आणखी एक हजार १४२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३५ जणांचा उपचारादरमम्यान मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात तीन हजार ४३३ नवे रुग्ण आणि ५६ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ७८८ रुग्ण आढळले, तर पाच जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात एक हजार ४४७, सांगली ७६८, सातारा ५८९, जळगाव ५४१, पालघर ३०१, अमरावती १४८, रत्नागिरी १२५, बुलडाणा ८८, गोंदिया ६२, वाशिम ५८, तर गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी १६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. 

****

शासनानं सर्व धार्मिक स्थळं उघडावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. ते काल शहरातल्या खडकेश्वर महादेव मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देऊन मंदीर उघडण्याची विनंती करणार होते. मात्र, खासदार जलील येण्या अगोदरच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंदिरासमोर जमा होत जलील यांच्या आंदोलनाला विरोध केला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, काल गणपती विसर्जनासाठी पोलिस दलावर ताण असल्यानं, हे आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी केली, त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घेत असल्याचं जलील यांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद इथल्या कौडगाव औद्योगिक वसाहतीत तांत्रिक वस्त्रोद्योग केंद्र - टेक्निकल टेक्स्टाईल हब उभारणीच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याची मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. दहा हजारांहून अधिक रोजगार निर्मितीचं उद्दीष्ट असलेल्या या औद्योगिक क्षेत्राकडे सरकारचं दुर्लक्ष का आहे, असा सवालही आमदार पाटील यांनी देसाई यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.

****

परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून काल पहाटे फरार तिघा गुन्हेगारांविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिनही गुन्हेगारांना कोरोना विषाणू लागण झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सकाळी सहा वाजता वैद्यकीय कर्मचारी औषधं देण्यासाठी गेले असता, हे तिघे फरार झाल्याचे निदर्शनास आलं होतं.

****

नांदेड शहरात ख्रिश्चन दफन भूमीसाठी दहा एकर जमीन आरक्षित करण्यात यावी या मागणीसाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं धरणे आंदोलन केलं. सध्या अस्तित्वात असलेली दफनभूमी अपुरी आणि गैरसोयीची आहे, असं जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात वैद्यकीय प्रवेशासाठीचे ७०:३० सूत्र रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी कालपासून स्वाक्षरी मोहीम सुरू झाली. शिवाजी चौक इथून या स्वाक्षरी मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, आमदार राहुल पाटील, महापौर अनिता सोनकांबळे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

****

महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाअंतर्गत १५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात आलेल्या जागर अस्मितेचा या कार्यक्रमात उस्मानाबाद जिल्ह्यानं राज्यात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ६२९ गावात ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ या विषयात सॅनिटरी नॅपकिन बॉक्सची सर्वाधिक नोंदणी केली आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातल्या महिलांना माफक दरात आणि जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या किशोरवयीन मुलींना पाच रुपयात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिलं आहे.

****

नांदेडचे नामांकित प्रकाशक आणि लेखक निर्मलकुमार सूर्यवंशी यांना प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कार प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन आणि वाङ्‌मय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रुपये पाच हजार, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पहार असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. सूर्यवंशी यांच्या ‘अक्षरनाती’ या आत्मकथनाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

****

जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या आन्वी राळा इथले कैलास राठोड या शेतकऱ्याचा काल तळ्यात बुडून मृत्यू झाला. कापसावर औषध फवारणी करण्यासाठी पाणी नेत असताना त्यांचा पाय घसरून ते पडले होते.

तर जालना तालुक्यातल्या साळेगाव इथल्या १८ वर्षीय समीर शेरखान याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.

****

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार औरंगाबाद जिल्ह्याचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण बाबा पाटील यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यांच्यावर वैजापूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते.

****

No comments: