Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 September 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात
कोविड संसर्गाच्या सक्रीय रुग्णांपेक्षा या संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या
साडे तीन पटीपेक्षा अधिक झाली आहे. देशभरात कोविडबाधितांची संख्या ३८ लाख ५३ हजार ४०७
झाली आहे. यापैकी ३० लाखापेक्षा अधिक रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून मुक्त झाले आहेत.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा ही संख्या
चौपट असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. तपास, निदान आणि उपचार या तंत्रामुळे
रुग्ण या संसर्गातून मुक्त होण्याचं प्रमाण वाढलं असून, मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे.
सध्या मृत्यू दर एक पूर्णांक ७५ शतांश टक्के एवढा खाली आला आहे.
दरम्यान
देशात गेल्या २४ तासांत ११ लाख ७२ हजारापेक्षा अधिक कोविड नमुन्यांची तपासणी करण्यात
आली. एकूण तपासण्यांची संख्या आता चार कोटी ५५ लाख ९ हजारांवर पोहोचली आहे.
****
चीन
आणि भारतात सध्या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख मनोज नरवणे आजपासून
दोन दिवसांच्या लडाख भेटीवर पोहोचले आहेत. तुर्तास चीनकडून सीमारेषा बदलण्याच्या आगळीकी
संदर्भात ते सेनादलाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत. २९ आणि ३० ऑगस्ट रोजी चिनी
सैन्यानं लडाखच्या पेनगांग भागात प्रत्यक्ष सीमारेषा बदलण्याचा प्रयत्न केला होता.
यानंतर भारतानं या भागात बंदोबस्तात वाढ केली आहे
****
अभिनेता
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयकडून इंद्रजीत चक्रवर्ती
यांची आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे. इंद्रजीत हे सुशांतची मैत्रीण अभिनेत्री
रिया चक्रवर्तीचे वडील आहेत, गेल्या दोन दिवसांत सीबीआयने इंद्रजीत यांची सुमारे अठरा
तास चौकशी केली आहे. रियाची त्यापूर्वीच्या चार दिवसांत जवळपास ३५ तास चौकशी झाली आहे.
****
राज्य
सरकारचं संपूर्ण मंत्रिमंडळ राज्यभरात फिरून कोविड प्रतिबंधाचा आढावा घेत आहेत, आणि
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य संवाद प्रणालीने सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत,
असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत
होते. प्रत्येक गोष्टीत सरकारला दोष देण्यात अर्थ नाही, असं सांगतानाच, पंतप्रधान नरेंद्र
मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची काम करण्याची शैली सारखीच असल्याचं मत त्यांनी व्यक्त
केलं. पुण्यातले पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणी बोलताना, पुण्यासारख्या शहरात
सुसज्ज रुग्णवाहिका मिळू नये, हे वाईट असून, याबाबत मुख्यमंत्र्यांना आपण पत्र लिहिणार
असल्याचं राऊत यांनी सांगितलं.
****
राज्यातली
उपाहारगृहं पुन्हा सुरु करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया
सुळे यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सरकारने सोमवार पासून हॉटेल आणि लॉज सुरु
केले आहेत. उपाहारगृहातून फक्त पार्सल सेवा सुरु असल्यामुळे या व्यवसायात असणारे इतर
लोक आर्थिक अडचणीत आहेत. त्यांचा विचार करुन, सामाजिक अंतर राखून तसेच कोरोना विषाणू
प्रतिबंधासंबंधीचे सर्व नियम पाळून हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी
सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
****
ज्येष्ठ
अभिनेते दिलीपकुमार यांचे धाकटे बंधू एहसान खान यांचं आज मुंबईत कोरोना विषाणू संसर्गामुळे
निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. दिलीप कुमार यांचे सर्वात लहान बंधू असलम खान यांचंही
२१ ऑगस्टला कोविड संसर्गामुळे निधन झालं. या दोघांनाही गेल्या १५ ऑगस्टला रुग्णालयात
दाखल करण्यात आलं होतं.
****
ठाणे
जिल्ह्यात कोविडग्रस्तांची संख्या एक लाख २६ हजारावर पोहोचली आहे. आज जिल्ह्यात १ हजार
४८७ नवे रुग्ण आढळले. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ६१४ रुग्णांचा या संसर्गामुळे
मृत्यू झाला आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातली कोविडग्रस्तांची संख्या २५ हजारापेक्षा
अधिक झाली आहे. पालघरमध्ये आतापर्यंत ५१५ रुग्ण या आजारामुळे दगावले आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या २४ हजार १४ झाली आहे. आजपर्यंत एकूण
७१६ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ४ हजार ५२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत १८
हजार ७७५ कोविड बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
****
नवी
दिल्ली रेल्वे स्थानकावर पकडलेल्या त्रेचाळीस कोटी रुपयांच्या सोने तस्करी संदर्भात
सीमाशुल्क आणि केंद्रीय जीएसटी पथकानं सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात छापे घातले.
विविध ठिकाणी केलेल्या या कारवाईत महत्त्वाची अनेक कागदपत्रं जप्त केल्याचं वृत्त आहे.
या प्रकरणी अटक केलेले आठही जण हे सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातले आहेत.
****
बनावट
नोटा तयार करून चलनात आणणाऱ्या टोळीचा हिंगोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी
एका आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून १७ लाख ४७ हजार ३५० रुपये दर्शनी
किमतीच्या बनावट नोटा, आणि स्कॅनर, प्रिंटर, झेरॉक्स असा एकूण २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालासोबत लक्ष्मी देवीच्या पिवळ्या धातूच्या
तेरा मूर्तीही पोलिसांनी जप्त केल्या. या मूर्ती सोन्याच्या आहेत असं भासवून त्या लोकांची
फसवणूक करण्याकरता वापरल्या गेल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment