Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 September 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
समाजाची
सक्रीयता आपल्या देशाची सर्वात मोठी विशेषता असून समाजाच्या शक्तीला नेहमी जोडण्याचं
काम व्हावं, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज हैदराबाद
इथं राष्ट्रीय पोलिस अकादमीमधे भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या दीक्षांत समारंभात
दूर दृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन करत होते. लोकशाहीमधे लोक प्रतिनिधींचं
महत्त्व खूप मोठं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पोलिसांसाठी तंत्रज्ञान हे आज
एक हत्यार म्हणून समोर आलं असल्याचं ते म्हणाले. पोलिस ठाण्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात
काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. पोलिसांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या
या काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावल्याचं नमूद करताना ‘खाकी गणवेषाचा’ ‘मानवी चेहरा’
या काळात दिसल्याचं त्यांनी नमूद केलं. अधिकाऱ्यांनी प्रारंभीच्या काळात अधिक लक्ष
दिलं पाहिजे, असंही पंतप्रधान म्हणाले.
****
देशात
कोरोना विषाणुचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ पूर्णांक १५ शतांश टक्के असल्याची माहिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात कोरोना विषाणुचे नवे ८३ हजार ३४१ रुग्ण
आढळले असून एकूण रुग्ण संख्या ३९ लाख ३६ हजार ७४७ झाली आहे. देशातला मृत्यूदर एक पूर्णांक
७४ शतांश टक्के पर्यंत कमी झाला आहे. आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या तुलनेमधे सध्या
उपचार घेत असलेल्या रुग्णांची टक्केवारी २१ पूर्णांक ११ शतांश असल्याची माहितीही केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. या संसर्गासाठी कालपर्यंत चार कोटी ६६ लाख ७९ हजार १४५
नमुने तपासण्यात आले असून यातल्या अकरा लाख ६९ हजार ७६५ चाचण्या काल करण्यात आल्या
आहेत.
****
`वंदे
भारत` अभियाना अंतर्गत आतापर्यंतच्या पाच टप्प्यांमधे विदेशात असलेल्या तेरा लाख नागरिकांना
देशात आणण्यात आलं आहे. २४ देशांमधून दोन लांखांहून अधिक नागरिकांना सहाव्या टप्प्यात
देशात आणलं जाण्याची शक्यता असल्याचं विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव
यांनी म्हटलं आहे.
****
अभिनेता
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं आज मुख्य आरोपी रिया
चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती तसंच सुशांतचं घर सांभाळणारा सॅम्युअल मिरांडा यांना
ताब्यात घेतलं आहे. त्या आधी त्यांच्या निवासस्थानांची झडतीही घेण्यात आली असल्याची
माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
काँग्रेसचे
नेते आणि राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री
सुनील केदार यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे. त्यांना हा संसर्ग झाला असल्याचा
अहवाल प्राप्त झाल्यानंतर काल संध्याकाळी मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी
दाखल करण्यात आलं असल्याची माहिती पक्ष प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे. एकोणसाठ
वर्षीय केदार हे पूर्व विदर्भातल्या सावनेरचे आमदार आहेत. ते काही दिवसांपासून या भागातल्या
पूरग्रस्तांना प्रत्यक्ष मदत कार्यात सहभागी झाले होते अशी माहितीही लोंढे यांनी दिली
आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीत या विषाणुचा संसर्ग झालेले केदार हे
सहावे मंत्री असून उर्वरित मंत्री या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
****
अहमदनगर
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या ५४९ रुग्णांना आज बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात
आली. यात महापालिका हद्दीतल्या २३९ तर ग्रामीण भागातल्या २९७ जणांचा समावेश आहे. सैन्य
रुग्णालयातल्या १३ जणांनाही प्रकृती सुधारल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात
आतापर्यंत २० हजार ५१० रुग्ण या आजारातून बरे झाले असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
ठाणे
जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे एक हजार ५९० रुग्ण आढळले असून २९ रुग्ण मृत्यूमुखी पडले
आहेत. जिल्ह्यातली रुग्णांची एकूण संख्या एक लाख २८ हजार ४२९ झाली आहे. यात सर्वाधिक
३० हजार ५४ रुग्ण कल्याण शहरात तर २७ हजार ११२ रुग्ण नवी मुंबईमधे आढळले असल्याची माहिती
अधिकाऱ्यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यात या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची
संख्या तीन हजार ६४३ झाली आहे.
****
नाथ
समुह आणि परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमानं देण्यात येणारा यंदाचा बी. रघुनाथ स्मृती
पुरस्कार लेखक बालाजी सुतार यांच्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथासंग्रहाला
जाहीर झाला आहे. सध्या ओैरंगाबाद इथं राहणारे बालाजी सुतार हे मूळचे अंबेजोगाईचे. त्यांच्या
‘गावकथा’ या नाटकाचे प्रयोग राज्यभर सादर झाले असून विविध वाङ्मयीन नियतकालिकांमधून
त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. हा पुरस्कार बालाजी सुतार यांना नाथ समुहाच्या
कार्यालयात ७ सप्टेंबरला साधेपणानं प्रदान करण्यात येणार आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात किनवट आणि हदगाव तालुक्यातल्या काही भागांत काल रात्री मध्यम ते हलक्या स्वरुपाचा
पाऊस झाला. किनवट तालुक्यातल्या देहली इथं सर्वात जास्त ५५ मिलिमीटर तर पिंपरखेड इथं
सर्वात कमी ८ मिलीमीटर पावसाची या काळात नोंद झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली
आहे.
****
No comments:
Post a Comment