Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 October 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात
कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ८६ हजार ८२१ रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या ६३ लाख
१२ हजार ५८४ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोरोना विषाणू
संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचं प्रमाण एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत १४ पूर्णांक
९० शतांश टक्के आहे. देशात कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची टक्केवारी
एक पूर्णांक ५६ शतांश टक्के पर्यंत कमी झाली आहे. या संसर्गासाठी कालपर्यंत सात कोटी
५६ लाख १९ हजार ७८१ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातल्या १४ लाख २३ हजार
५२ चाचण्या काल करण्यात आल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं दिली आहे.
****
देशात
येत्या २०३० पर्यंत २ कोटी ६० लाख हेक्टर जमिनीवर वनीकरण करण्याचं उद्दीष्ट असल्याचं
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते जैव विविधतेवर आयोजित केलेल्या
संयुक्त राष्ट्रीय शिखर परिषदेत बोलत होते. भारताची संस्कृती केवळ निसर्गाचं रक्षण
आणि जतन करण्याची नाही तर निसर्गाशी सुसंगत राहण्याची असल्याचं ते म्हणाले. मानवी जीवनाला
बळकट करणाऱ्या नैसर्गिक स्त्रोतांचा अतिरीक्त उपयोग केल्यामुळे निसर्गाला हानी पोहोचते
हे या कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीमुळे लक्षात आलं असल्याचंही जावडेकर यांनी यावेळी
सांगितलं.
****
पाकिस्तानी
सैन्यानं काल रात्री जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजिक
युद्धविरामाचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा झाला तर एक जखमी झाला
आहे. सैन्य दलानं या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती सैन्याच्या प्रवक्त्यानं
दिली आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातल्या टाकळीचे जवान वामन मोहन पवार यांच्या पार्थिव देहावर
आज त्यांच्या मुळ गावी अंत्य संस्कार करण्यात आले. ते जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राज्यमार्ग
नरसु या ठिकाणी हुतात्मा झाले होते. वामन मोहन पवार हे अठरा वर्षांपासून सैन्यदलात
कार्यरत होते. अंत्यसंस्कारावेळी अहमदनगरमधील सैन्य दलाच्या तुकडीनं त्यांना शेवटची
सलामी दिली.
****
सुप्रसिद्ध
कवि, लेखक, संगीत, नाटक, सिनेमा, साहित्य क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व ‘गदिमा’
म्हणजेच ग. दि. माडगुळकर यांची आज जयंती. ते एक प्रतिभासंपन्न साहित्यिक होते, असा
उल्लेख करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आपल्या संदेशातून अभिवादन केलं आहे.
विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ग. दि. माडगुळकर यांना जयंतीनिमित्त
अभिवादन केलं आहे.
****
औरंगाबाद
शहरात आज दुपारी मयुर पार्क चौकात एका मोटारीतून १०६ किलो गांजाची वाहतूक करताना दोन
पुरूष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या गाडीला पोलिसांनी थांबण्याचा इशारा
केला असता गाडी उभी करून आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडून यावेळी
१५ लाख ३१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
औरंगाबाद
विभागात अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदारपदी पदोन्नती देण्याच्या
मागणीसाठी जिल्ह्यातले तलाठी आणि मंडळ अधिकारी आज सामूहिक रजेवर आहेत. तलाठी आणि मंडळ
अधिकाऱ्यांच्या संघटनेनं यासंदर्भातलं निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना आज सादर
केलं.
****
मुंबईमधे
चेंबूर रेल्वेस्थानकानजिक आज पहाटे लागलेल्या आगीमधे सात ते आठ दुकानं जळून खाक झाली.
पहाटे सव्वापाच वाजता ही दूर्घटना झाल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली
आहे. पुण्यातल्या कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधे एका रसायन निर्मिती कारखान्याला काल मध्यरात्रीनंतर
आग लागली. कारखाना या दूर्घटनेवेळी बंद होता. बारा कामगार आणि दोन कुत्र्यांना यावेळी
वाचवण्यात आलं. अग्नीशमन दलानं सुमारे साडे चार तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात
आणल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
चंद्रपूर
जिल्ह्यातल्या ब्रम्हपुरी तालुक्यातल्या वांद्रा गावातल्या एका अकरा वर्षे वयाच्या
मुलाचा आज पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय वनाधिकाऱ्यांनी व्यक्त
केला आहे. हा मुलगा मित्रांसोबत फिरायला गेला होता. बिबट्यानं त्याच्यावर हल्ला करून
त्याला चिचखेडा जंगलात ओढून नेल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली असल्याचं मुख्य
वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी म्हटलं आहे. हे मित्र आणि आजुबाजुच्या लोकांनी आरडाओरड
केल्यानंतर बिबट्या मुलाला सोडून जंगलात पळून गेला. मुलाचा यात घटनास्थळीच मृत्यू झाला
असून दूर्घटनेचा तपास सुरू असल्याचं वनाधिकारी म्हणाले.
****
बृहन्मुंबई
विद्युत पुरवठा आणि परिवहन-बेस्ट ने प्रवाशांच्या गरजा भागवण्यासाठी राज्य रस्ते वाहतूक
महामंडळाकडून एक हजार अत्याधुनिक बस भाड्यानं घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बेस्ट’ कडून
मुंबईत सध्या तीन हजारांहून अधिक बसगाड्यांद्वारे प्रवाशांना सेवा दिली जाते.
****
No comments:
Post a Comment