Friday, 30 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.10.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 October 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९१ पूर्णांक १५ शतांश टक्के झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोरोना विषाणू संसर्गाचे ४८ हजार ६४८ नवे रुग्ण आढळल्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८० लाख ८८ हजार झाली आहे. यापैकी ७३ लाख ७३ हजार रुग्ण बरे झाले आहेत. आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५७ हजार रुग्ण बरे झाले असून या काळात ५६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख २१ हजार ९० झाली आहे. एकूण रुग्ण संख्येच्या सात पूर्णांक ३५ शतांश टक्के रुग्ण सध्या उपचार घेत असून त्यांची संख्या ५ लाख ९४ हजार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं काल या संसर्ग तपासणीसाठी ११ लाख ६४ हजार नमुन्यांची चाचणी केली. आतापर्यंत दहा कोटी ७७ लाख चाचण्या झाल्याची माहितीही या परिषदेनं दिली आहे.

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या काल दिवसभरात पाच हजार ९०२ रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ६६ हजार ६६८ झाली आहे. राज्यभरात काल १५६ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मराठवाड्यात काल १३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४७४ रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गाचे ३७ हजार ९१६ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३६ हजार २२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.‌ सध्या ६१८ रुग्णांवर उपचार सुरु असून जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार ६९ झाली आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावसह प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज सकाळपासून कांद्यांचे लिलाव पूर्ववत सुरू झाले. केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्यानं गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू करावेत असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानं आज सकाळीच लासलगाव बाजार समितीमध्ये सहाशे मेट्रिक टन कांद्याची आवक झाली. लासलगाव इथं सरासरी पाच हजार शंभर रुपये क्विंटल तर विंचुर इथं पाच हजार तिनशे रुपये क्विंटल भाव मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ५० टक्के उपस्थितीचा शासकीय संकल्प जाहीर केला आहे. शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांना ‘ऑन लाईन’ आणि ‘ऑफ लाईन’ शिक्षण किंवा दूरध्वनीद्वारे समुपदेशनासंबंधी कार्य पूर्ण करता यावं, यासाठी हा आदेश देण्यात आला आहे.

****

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त असलेला ‘ईद-ए-मिलाद उन नबीचा’ सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ईद ए मिलाद उन नबीच्या’ शुभेच्छा दिल्या आहेत.

****

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देताना हा सण सर्वांच्या जीवनात धन, धान्य, उत्तम आरोग्याची समृद्धी घेऊन येवो, अशा सदिच्छा दिल्या आहेत. 

****

मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात सर्व सामर्थ्यानं लढा देत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. या मुद्दावर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा ते मुंबई असा ५८० किलो मीटर पायी प्रवास करून आलेल्या मराठा तरुणांची भेट घेत आरक्षणासंदर्भात शासन करत असलेल्या कार्यवाहीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी या तरुणांना दिली. मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवावी या तसंच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उमरगा तालुक्यातील बाळासाहेब माने, पंकज जगताप, अक्षय गायकवाड, साहेब जाधव, नितीन जाधव आणि विश्वजीत चुंगे या युवकांनी उमरगा ते मुंबई असा ५८० किलोमीटरचा प्रवास पायी केला. यासाठी त्यांना १३ दिवस लागले. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवास्थानी भेट घेऊन आपलं निवेदन दिलं.

****

सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतीचं ३८ कोटी ३० लाख रुपयांचं नुकसान झालं असून, ३४ हजार १९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्यामुळे ६३ हजार ९४ शेतकऱ्यांच्या शेताचं नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनानं याचा अहवाल नुकताच राज्य सरकारला पाठवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ६४ हजार शेतकऱ्यांच्या ११ हजार ८१२ हेक्टरवरच्या भात आणि नाचणी पिकांचं नुकसान झालं.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...