Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 October 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२
ऑक्टोबर
२०२० सकाळी ७.१० मि.
****
बातमीपत्राच्या सुरूवातीला गांधी वचन –
आवश्यकतेपेक्षा जास्त आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवणे शहाणपणाचे नाही. सर्वात
शक्तीशाली व्यक्ती कमजोरही असू शकते. तर अतिशहाणे लोक चुकाही करू शकतात.
****
·
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१व्या जयंती निमित्त देशभर आदरांजली.
·
सत्य आणि अहिंसेचा स्वीकार करण्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं जनतेला
आवाहन.
·
उत्तर प्रदेशात हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी
जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांची धक्काबुक्की;
राज्यभरात काँग्रेस पक्षाकडून निषेध.
·
विद्यापीठांमधल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या १५ दिवसात पूर्ण करण्याचं
आश्वासन, आंदोलन स्थगित.
·
राज्यात आणखी १६ हजार ४७६ कोविड बाधितांची नोंद, ३९४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·
मराठवाड्यात ३३ रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ९३ रुग्णांची नोंद.
आणि
·
तुळजाभवानी देवीचा नवरात्रोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा मंदिर संस्थानचा
निर्णय.
****
कृतज्ञ राष्ट्र आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१व्या जयंती निमित्त
त्यांना आदरांजली वाहत आहे. यानिमित्त देशभरात अनेक भागात विविध कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं आहे. कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम व्हर्च्युअल माध्यमातून
होत आहेत.
दिल्लीत ‘राजघाट’ या महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळी सर्वधर्म सभा आयोजित
करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरी
केली जाते. याचबरोबर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त
देश त्यांना आदरांजली वाहत आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला स्वच्छता, सेवाकार्य तसंच
वृक्षारोपणाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.
****
नागरिकांनी स्वत:ला देशाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी समर्पित करावं, तसंच
सत्य आणि अहिंसेचा स्वीकार करण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे.
गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात राष्ट्रपतींनी, स्वच्छ, सक्षम, मजबूत
भारत निर्माण करुन गांधीजींचं स्वप्न सत्यात आणावं, असं नमूद केलं. स्वच्छ भारत मिशन,
महिला सशक्तीकरण, गरीब आणि उपेक्षितांचं सशक्तीकरण, शेतकऱ्यांना मदत यासारख्या अनेक
उपाययोजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी
सरकार प्रयत्न करत असून, हे प्रयत्न गांधीजींची शिकवण आणि विचारांना अनुकूल असल्याचं
राष्ट्रपती म्हणाले.
****
उत्तर प्रदेशातल्या हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी
जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी
ताब्यात घेतलं. काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आलं. त्यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांकडून
राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची
गाडी पोलिसांनी रोखल्यानंतर ते चालत निघाले होते. यावेळी पोलिसांनी आपल्याला अडवलं
आणि लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असं राहुल गांधी यांनी सांगितलं. काँग्रेसनं
पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केला आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ काल राज्यात ठिकठिकाणी
काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
मुंबईत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या
नेतृत्त्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं काँग्रेसच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन
करण्यात आलं. परभणी शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध नोंदवण्यात आला. औरंगाबाद,
उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, आणि जालना, सांगली, बुलडाणा, नाशिक जिल्ह्यातही काल
आंदोलन करण्यात आलं.
****
उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांमधल्या शिक्षकेत्तर
कर्मचाऱ्यांच्या मागण्या १५ दिवसांत पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर राज्यातल्या
१४ विद्यापीठांतल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन काल स्थगित केलं.
सामंत यांच्यासोबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची काल बैठक झाली, यावेळी आंदोलन स्थगित
करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृती समितीचे समन्वयक डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी
दिली.
****
राज्य सरकार चित्रपटगृह तसंच नाट्यगृह उघडण्याबाबत सकारात्मक आहे, मात्र कोरोना
विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर नागरिकांना सुरक्षेची खात्री देण्याला सरकारचं
प्राधान्य असल्याची माहिती सांस्कृतिक कल्याण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. ते काल
चित्रपटगृह मालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना बोलत होते. आपण या विषयावर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
यांच्याशी चर्चा करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
****
आणि आता ऐकू या जेष्ठ पत्रकार, गांधी विचारांचे अभ्यासक अरूण खोरे यांनी सांगितलेला
गांधी विचार –
तुम्ही जे कर्तव्य करता, त्या कर्तव्यामधेच परमेश्वराला पाहायचा प्रयत्न करा
असं गांधीजी नेहमी सांगायचे. गांधीजींचं म्हणणं असं होतं, केवळ तोंडी पुटपुटून पार्थना
करता येत नाही. तिचा खरा उच्चार श्वासातूनच होत असतो. ईश्वर प्रार्थनेला त्याच्या पद्धतीने
प्रतिसाद देतो. आणि हे करत असताना गांधीजी पुढे असं सांगतात, की रामाला भावेल असं काम
केलं नाही तर नुसतं रामाचं नाव घेणं व्यर्थ ठरेल. व्यापक अर्थाने प्रार्थनेचा आणि ईश्वराच्या
अस्तित्वाचा शोध गांधीजी हा मनुष्य जे कर्तव्य करतो त्या कर्तव्यातूनच तो पुढे नेतो
अशी त्यांची धारणा होती, अशी त्यांची भूमिका होती. आणि म्हणूनच गांधीजींचं म्हणणं असं
होतं की, आपली प्रार्थना ही आत्मशोध असते. त्याच्या आधाराशिवाय आपण काहीही करू शकत
नाही याचं स्मरण ही प्रार्थना आपल्याला करून देत असते. गांधीजींच्या प्रार्थनेच्या
विचारांमुळे या देशातील सर्वसामान्य माणसाला एक शक्ती मिळाली आणि तो एका बलदंड अशा
सत्तेविरूद्ध उभा राहिला हे आपण सर्वांनी पाहिलं आहे.
****
बीड मधल्या एका मराठा युवकाच्या आत्महत्येला दुःखद संबोधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे
नेते पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप
याचिका दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. विवेक रहाडे याच्या मृत्यूबद्दल ऐकून
आपण सुन्न झालो आहोत. अशा दुर्दैवी घटनेवर प्रतिक्रियांची श्रृंखला तयार होण्यापूर्वी
मराठा समाजातल्या नेत्यांनी जागं व्हावं, असं आवाहन पार्थ पवार यांनी सामाजिक संपर्क
माध्यमाद्वारे केलं आहे.
****
बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेच्या एका नकली अर्जाची माहिती समाजमाध्यमांवर पसरवली
जात आहे. प्रत्येक मुलीला सरकारतर्फे दोन लाख रुपये देण्यात येणार असल्याचा संदेश या
अर्जासोबत पसरवला जात असून, तो पूर्णतः खोटा असल्याचं ‘पत्र सूचना कार्यालयानं’ म्हटलं
आहे. हा अर्ज बेकायदेशीर असून या योजने अंतर्गत कोणत्याही प्रकारची रक्कम दिली जात
नसल्याचं, कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येनं १४ लाखांचा टप्पा पार केला
आहे. काल दिवसभरात आणखी १६ हजार ४७६ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली
एकूण रुग्णसंख्या १४ लाख ९२२ झाली आहे. राज्यभरात काल ३९४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ३७ हजार ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल
१६ हजार १०४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत ११ लाख
चार हजार ४२६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ५९ हजार सहा रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ३३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक
हजार ९३ रुग्णांची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यात दहा बाधितांचा मृत्यू झाला, तर नव्या २३९ रुग्णांची भर पडली.
उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी पाच जणांचा मृत्यू झाला, उस्मानाबाद जिल्ह्यात
१३३, तर परभणी जिल्ह्यात ७५ नव्या रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात चार बाधितांचा
मृत्यू झाला तर नवे १९३ रुग्ण आढळले. नांदेड, बीड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी तीन
रुग्णांचा मृत्यू झाला, नांदेड जिल्ह्यात आणखी १९५, बीड जिल्ह्यात १८२ तर जालना जिल्ह्यात
५८ रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात १८ रुग्णांची नोंद झाली.
****
पुणे जिल्ह्यात दोन हजार ६५६ नवे रुग्ण आढळले तर ६९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. मुंबईत दोन हजार ३५२ नवे रुग्ण आढळले तर ४३ जणांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये एक
हजार १०८ नवे रुग्ण आढळले तर २१ जणांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात ५३५ नवे रुग्ण
आढळले तर २० जणांचा मृत्यू झाला. सांगली ५२५, पालघर ३५४, रत्नागिरी ९१, चंद्रपूर २७२,
भंडारा १५१, गडचिरोली ८९, गोंदिया १००, अकोलामध्ये २४ नवे रुग्ण आढळले.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी चाचण्यांची
संख्या वाढवली पाहिजे, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीलं आहे. राज्यात चाचण्यांची
संख्या वाढवली नसल्यामुळे सप्टेंबर महिन्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असल्याचं
त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीचा नवरात्रोत्सव यंदा साधेपणानं
साजरा करणार असल्याचं मंदिर संस्थानतर्फे जाहीर करण्यात आलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे
हा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात भाविकांना संकेतस्थळावरुन देवीचं थेट दर्शन घेता
येणार आहे. मंदिरात भाविकांना जाता येणार नसून भवानी ज्योत घेऊन जाण्यासही प्रतिंबंध
असणार आहे. सर्व आवश्यक पूजा विधींसाठी संबंधीत मोजक्या जणांनाच मंदिरात प्रवेश असेल.
****
नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या इस्लामपूरनजिक आणि यवतमाळ जिल्ह्याच्या
हद्दीजवळच्या सहस्त्रकुंड धबधब्यात काल दोन मुलीं आणि एका मुलासह दांम्पत्यांनं आत्महत्या
करण्याची घटना घडली. यापैकी पती-पत्नी आणि एका मुलाचा मृतदेह सापडला असून दोघी मुलींचा
शोध सुरु आहे. जिल्ह्यातल्या हदगाव इथले किराणा व्यापारी प्रवीण वलपेटवार-कवानकर यांचं
हे कुटुंब आहे. दोन दिवसांपूर्वीच हे कुटुंब हा धबधबा पाहण्यासाठी गेले होते. छोट्या
भावासोबतच्या मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याचं प्राथमिक वृत्त आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातल्या टाकळीचे हुतात्मा जवान वामन पवार यांच्या पार्थिवावर काल
त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राज्यमार्ग
नरसू या ठिकाणी हुतात्मा झाले होते. वामन पवार हे अठरा वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत
होते. अंत्यसंस्कारावेळी अहमदनगरमधल्या सैन्य दलाच्या तुकडीनं त्यांना सलामी दिली.
****
परभणी इथं महसूल कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न मार्गी लावावा,
या प्रमुख मागणीसाठी काल पुकारण्यात आलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या सामुहिक रजा आंदोलनास
शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचं जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब
भेंडेकर यांनी सांगितलं. या आंदोलनामुळे काल महसूल विभागाचं कामकाज ठप्प झालं होतं.
****
औरंगाबाद विभागातही अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदारपदी
पदोन्नती देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातले तलाठी आणि मंडळ अधिकारी काल सामूहिक रजेवर
गेले होते. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या संघटनेनं यासंदर्भातलं निवेदन जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांना सादर केलं. नांदेड, परभणी इथंही हे आंदोलन करण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी नगर परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या सुरेखा
जट्टावार यांची काल निवड झाली. नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस
पक्षाची आघाडी होती.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या रोहिलागड
चौफुलीवर काल अखिल भारतीय छावा संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे अंबड-रोहिलागड
रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली होती.
परभणी इथंही या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं काल मूक आंदोलन करण्यात
आलं.
****
पुण्याच्या कामगार साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘गदिमा
काव्य प्रतिभा पुरस्कार’ नांदेड इथले कवी जगदीश कदम यांना जाहीर झाला आहे. गीत रामायणकार
ग. दि. माडगुळकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने दरवर्षी पुरस्कार दिले जातात. रोख
रक्कम, स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पहार असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या कोंढूर शिवारात १०७ एकर गायरान
जमिनीवर १५ ते २० शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणावर काल कारवाई करण्यात आली. याबाबत
प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार कळमनुरीचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी सत्यता
पडताळून या जमिनीवरचं अतिक्रमण काढलं.
****
लातूर इथं जलसंपदा खात्याचं मंडळ कार्यालय कालपासून सुरु झालं. अधीक्षक अभियंता
आणि प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, लातूर या नावाने सुरु झालेल्या या कार्यालयाचं
उद्घाटन अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांच्या हस्ते झालं. या मंडळाच्या अखत्यारीत
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्व पाटबंधारे प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापनाचं
काम पाहिलं जाईल.
****
औरंगाबाद शहरात काल मयुरपार्क चौकात एका मोटारीतून १०६ किलो गांजाची वाहतूक
करताना दोन पुरूष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली. या गाडीला पोलिसांनी थांबण्याचा
इशारा केला असता गाडी उभी करून आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडून
१५ लाख ३१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने काल एका टेम्पोमधून वाशिम
वरून नांदेडकडे जाणारा २२ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. गुटखा पुड्याच्या
११० बोऱ्या आणि टेम्पो असा एकूण ३१ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात
आला.
जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या आष्टी इथंही पोलिसांनी एका वाहनातून
अवैधरीत्या वाहतूक केला जाणारा साडेचार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला.
****
औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथल्या तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहायक हर्षल
येवले यास २८ हजार रुपयांची लाच घेतांना काल लाचलुचपत विभागानं रंगेहाथ पकडलं. येवलेसोबतच
यात सहभागी पंडित जेठे या खाजगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. शेततळ्यासाठी
मंजूर अनुदान शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी येवलेनं या लाचेची मागणी केली
होती.
****
No comments:
Post a Comment