आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ ऑक्टोबर २०२० सकाळी ११.००
वाजता
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांच्या १५१व्या जयंतीनिमित्तानं आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
त्यांना आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रपती तसंच पंतप्रधानांनी दिल्लीत राजघाटावर गांधीजींच्या
समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली.
माजी पंतप्रधान लाल बहादूर
शास्त्री यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. दिल्लीत
विजयघाटावर पंतप्रधानांनी शास्त्रीजींच्या समाधीवर पुष्पांजली वाहून शास्त्रीजींच्या
स्मृतीला अभिवादन केलं.
गांधीजी तसंच शास्त्रीजींच्या
जयंती निमित्तानं देशभरात अनेक भागात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कोविड
साथीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होत
आहेत.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता, सेवाकार्य तसंच वृक्षारोपणाच्या माध्यमातून महात्मा
गांधी यांची जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. आजचा दिवस महात्मा गांधी यांच्या
सत्य, अहिंसा आणि स्वावलंबन या त्रिसूत्रीची आठवण करून देतो, असं राज्यपालांनी आपल्या
संदेशात म्हटलं आहे.
****
गांधीजींच्या जयंती निमित्त
आज सकाळी औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
लिमिटेड यांच्या वतीनं “सायकल फॉर चेंज” ही सायकल फेरी काढण्यात आली. मनपा आयुक्त अस्तिक
कुमार पांडे आणि औरंगाबाद पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला.
नांदेड इथं आज महात्मा गांधी
यांच्या १५१ व्या जयंती निमित्त धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या वतीनं गांधीजींच्या पुतळयास
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
देशात कोविड बाधितांचा बरे
होण्याचा दर ८३ पूर्णांक ७० शातांश टक्के इतका झाला आहे. देशात बाधितांची संख्या ६३
लाख ९४ हजार ६८ झाली आहे, त्यापैकी ५३ लाख ५२ हजार ७८ रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून
मुक्त झाले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना
विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ८४१ झाली आहे. तर २७ हजार ८१४
रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
No comments:
Post a Comment