Wednesday, 21 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.10.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 October 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. तुळजापूर तालुक्यातल्या काटगाव इथं हरणी धरण क्षेत्रातल्या बाधित क्षेत्राची नुकसान पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. काटगाव इथं घराचं नुकसान झालेल्या एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तसंच पशुधन वाहून गेलेल्या शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. काही दिवसांत पंचनामे पूर्ण होऊन बाधित शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यावेळी उपस्थित होते.

****

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागाला भेट दिली. त्यांनी नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. आमदार गोपीचंद पडळकर या दौऱ्यात त्यांच्याबरोबर उपस्थित होते.

आटपाडी भागात द्राक्ष, डाळिंब, सोयाबीन, कापूस आणि ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून नुकसानाची तीव्रता लक्षात घेऊन सरकारनं तातडीची मदत लवकर द्यावी असं प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले. राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय तातडीनं निर्णय घेणं गरजेचं असताना, राज्य सरकारमधले नेते राजकारण करत आहेत असा आरोप दरेकर यांनी यावेळी केला.

****

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाला शासनाचा ‘कायाकल्प पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ५० लाख रुपयांचा हा पुरस्कार, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयानं सलग तिसऱ्यांदा पटकावला आहे. या शिवाय जिल्ह्यातल्या विविध १३ रुग्णालयांनाही विविध गटात पुरस्कार मिळाले आहेत. कायाकल्प पुरस्कारासाठी रुग्णालयाची इमारत आणि पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचा प्रभावी वापर या सर्व निकषांवर रुग्णालयांची निवड केली जाते.

****

गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणू संसर्गाचे ५४ हजार ४४ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे देशात या रुग्णांची संख्या ७६ लाख ५१ हजार १०८ झाली आहे. यापैकी ६७ लाख ९५ हजार १०३ रुग्ण या संसर्गातून बरे झाले असून, सध्या देशभरात ७ लाख ४० हजार ९० सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात या संसर्गातून मुक्तीचा दर ८८ पूर्णांक ८१ शतांश टक्क्यांवर पोहोचला असून, सक्रीय रुग्णांची संख्याही एकूण रुग्णांच्या तुलनेत ९ पूर्णांक ६७ शतांश टक्के एवढी आहे. देशात आतापर्यंत या संसर्गाने एक लाख १५ हजार ९१४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५१ शतांश टक्के एवढा असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या बातमीत म्हटलं आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद-आयसीएमआरने काल एका दिवसांत एकूण १० लाख ८३ हजार ६०८ नमुन्यांची कोविड तपासणी केल्याचं सांगितलं. देशातली चाचण्यांची संख्या आता ९ कोटी ७२ लाख ३७९ झाली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ८४५ झाली आहे. यापैकी ३४ हजारांवर रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ४२ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला असून, सध्या जिल्ह्यात एक हजार ८०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

वाशिम जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूचे ३२ नवे रुग्ण आढळले तर ६६ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ४३४ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून ११७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ६४२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. २० नोव्हेंबरपासून या परीक्षांना सुरुवात होणार असून, दहावीच्या परीक्षा ५ डिसेंबर पर्यंत तर बारावीच्या सर्वसाधारण विषयांच्या ७ डिसेंबरपर्यंत आणि व्यावसायिक विषयांच्या परीक्षा १० डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांसह संपूर्ण परीक्षेचं वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...