Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
02 March 2021
Time
1.00pm to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०२ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.
****
राज्यात वीज तोडणी मोहिमेला
स्थगिती देत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
कामकाज सुरु होताच विरोधकांनी वीज बिलाचा मुद्दा उपस्थित करुन गदारोळ केला, त्यावेळी
पवार बोलत होते. प्रश्नोत्तराचा तास रद्द करुन वीज प्रश्नी चर्चेची मागणी विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. वीज तोडण्याचा सरकारचा आदेश मागे घेण्याची
मागणीही त्यांनी केली. मात्र सभागृहात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार
असून, वीज बिलासंदर्भात एक दिवस ठरवून
चर्चा करुन निर्णय घेऊ, असं आश्वासन पवार यांनी यावेळी दिलं.
जोपर्यंत ऊर्जा विभागाची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे वीज
जोडणी तोडणं थांबण्यात येईल, असं ते म्हणाले. वीज तोडणी
तत्काळ थांबवण्याचे आदेश दिल्याबद्दल फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
****
दरम्यान, विधानसभेत
राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर चर्चा सुरु झाली. कोविड मुळे
निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला यश आलं असल्याचं मत शिवसेनेचे
सुनील प्रभू यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर राज्य सरकारच्या भूमिकेचं त्यांनी समर्थन केलं. माझे कुटुंब माजी जबाबदारी, शिवभोजन यासह कोविड प्रतिबंधासाठी सरकारनं राबवलेल्या योजनांचा आणि
उभारलेल्या आरोग्य यंत्रणेचा प्रभू यांनी उल्लेख केला. उद्योगात विदेशी गुंतवणूक,
ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन याकडेही सरकारनं विशेष लक्ष दिल्याचं
ते म्हणाले.
पाथरीचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी चर्चेत
सहभागी होत, कोविड प्रतिबंधासाठी राज्य सरकारनं कृती दल
स्थापन करुन अनेक महत्वाची कामं केल्याचं नमूद केलं.
राज्यपालांच्या अभिभाषणात प्रत्यक्ष
आकडेवारी जाहीर केली नसल्याकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं.
****
देशात काल १२ हजार २८६ नव्या
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९१ नागरीकांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी ११ लाख २४ हजार ५२७ झाली असून,
या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५७ हजार २४८ रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. तर काल १२ हजार ४६४ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत एक
कोटी सात लाख ९८ हजार ९२१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ६८ हजार ३५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, देशात आतापर्यंत एक
कोटी ४८ लाख ५४ हजार १३६ नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात
आल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
****
राज्यात काल पहिल्या दिवशी सहा
हजार ७०० ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आलं. अनेक ठिकाणी लसीकरण करुन घेण्यासाठी नागरीकांमध्ये
उत्साह दिसून आला.
****
महाराष्ट्रातल्या साखर
कारखान्यांनी उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करावी आणि याकामी मराठा चेम्बरनं
पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं
आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय
परिषदेमध्ये ते बोलत होते. पुण्यात ब्रॉडगेज मेट्रोचा प्रस्ताव असून, हा मेट्रो प्रकल्प
पुणे-बारामती, पुणे-अहमदनगर, पुणे
लोणावळा-खंडाळा आणि इतर शहरांना जोडणार आहे, असं गडकरी
म्हणाले. इलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्रात भारताला जगातला पहिल्या क्रमांकाचा देश
बनवायचं आहे, यासाठी मराठा चेम्बरनं पथदर्शी आराखडा तयार
करावा असंही त्यांनी सांगितलं.
****
प्रस्तावित औरंगाबाद-अहमदनगर या
१२० किलोमीटर अंतराच्या नव्या रेल्वे मार्गाच्या फिल्ड सर्वेक्षणाला काल सुरुवात
झाली. यात पर्यटन स्थळे, व्यापारी, महत्वाच्या बाजारपेठा किती आहेत, औरंगाबाद पुणे-नगर साठी बसवाहतुकीतून किती उत्पन्न मिळते, या मार्गावर मालवाहतुक किती आहे, या बाबी तपासल्या
जाणार आहेत. या रेल्वे मार्गामुळे थेट पुण्याला कनेक्टिव्हिटी मिळणार असून,
हा मार्ग अधिक सोयीचा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे.
****
बीड इथल्या लेखा परीक्षण
कार्यालयातला लेखा परीक्षक किरण घोटकर याला २२ हजार रुपयांची लाच घेताना अटक
करण्यात आली. लेखा परीक्षण वेळेत आणि व्यवस्थित करून त्याचा अहवाल देण्याकरता त्यानं ही लाच
मागितली होती.
****
बुलडाणा जिल्ह्यात चिखली -
देऊळगावराजा रस्त्यावर अंचरवाडी इथं टिप्पर आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या
अपघातात दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. काल सायंकाळी हा अपघात झाला. घटनेनंतर
टिप्पर चालक पसार झाला.
****
नाशिक शहरात कोरोनाबा विषाणू
बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग १५ मार्च पर्यंत बंद
ठेवण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी हे आदेश जारी केले.
****
नंदुरबार जिल्ह्यात आष्टे
शिवारातल्या वनविभागाच्या जंगलाला काल रात्री उशिरा मोठी आग लागली होती. आज सकाळी
सहा वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment