Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 11 April 2021
Time 7.10AM to 7.25AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ एप्रिल
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या
संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन
श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन
करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन
घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात
वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा
अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
कोरोना विषाणू संसर्गाचं अनर्थचक्र थांबवण्यासाठी काही
काळ कडक निर्बंध लावावेच लागतील- मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांचा इशारा
**
राज्यात रेमडिसीवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष
स्थापन करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
**
देशभरात आजपासून लसीकरण उत्सव विशेष अभियानाला प्रारंभ
**
राज्यात ५५ हजार ४११ कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात
९० जणांचा मृत्यू तर
७ हजार २१४ बाधित
**
ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक तु. शं. कुलकर्णी यांचं निधन
आणि
**
मराठवाड्यात काही
भागात पाऊस
****
कोरोना विषाणू संसर्गाचं
अनर्थचक्र थांबवायचं असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच
लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
दिला आहे. राज्यातली कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर काल विरोधी पक्ष नेते
तसंच मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या
बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे,
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विरोधी
पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसंच प्रवीण दरेकर, यांच्यासह
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेऊन सूचना मांडल्या.
विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला
जाईल, रेमडीसिव्हीर औषधाची उपलब्धता, ऑक्सिजनची उपलब्धता चाचण्यांचे अहवाल लवकर मिळणं, अशा
सूचनांवर शासन कार्यवाही करेल, असं मुख्यमंत्री
म्हणाले. कडक निर्बंध लावतांना गरीब,
श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास
होऊ नये ही सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने विचार केला जाईल, पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ रोखणे हे अतिशय गरजेचं असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो निर्णय घेतला
जाईल त्याला सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं.
****
राज्यात रेमडिसीवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन होणार आहेत.
याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे निर्देश दिल्याचं राज्याचे आरोग्य
आयुक्त डॉक्टर रामास्वामी यांनी काल सांगितलं. मुख्यत: खाजगी रुग्णालयात
रेमडीसीवीरची मागणी वाढत असतांनाच खाजगी औषध दुकानदारांकडून चढ्या दरानं त्याची
विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. रेमडीसीवीर संदर्भात निवासी
उपजिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत कार्यरत ऑक्सिजन नियंत्रण कक्षात तक्रारी सुध्दा
स्वीकारण्यात याव्यात आणि त्याचं निराकरण स्थानिक अन्न औषध प्रशासन
कार्यालयामार्फत करण्याची सूचना करण्यात आली आहे. रेमडीसीवीरची गरज भासल्यास अन्न
औषध प्रशासनच्या राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क करुन योग्य ती कार्यवाही
करण्याचे निर्देश पत्रात दिले आहेत.
****
देशभरात आजपासून लसीकरण उत्सव विशेष अभियानाला प्रारंभ होत आहे. आज ११
एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून १४ एप्रिलला भारतरत्न डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत ही विशेष लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकताच सर्व
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना ही विशेष
लसीकरण मोहीम राबवण्याबाबत आवाहन केलं होतं. याद्वारे युवकांनी ज्येष्ठ नागरीक आणि
गरजवंतांना लसीकरणासाठी मदत करावी, असं
आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.
****
राज्यात काल ५५ हजार ४११ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३३ लाख ४३ हजार ९५१
झाली आहे. काल ३०९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात
या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५७ हजार ६३८
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ७२ शतांश टक्के झाला आहे.
काल ५३ हजार ५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २७ लाख ४८ हजार
१५३ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८२ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
पाच लाख ३६ हजार ६८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या ७ हजार २१४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये
औरंगाबाद जिल्ह्यातल्या २५, नांदेड जिल्ह्यातल्या २७, परभणी १४,लातूर आणि
उस्मानाबादमध्ये प्रत्येकी ७, बीड ८,जालना जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ९६४ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार
७५९, लातूर १ हजार ४८६, परभणी
६८४, बीड ७६४, जालना ६५२, उस्मानाबाद ५५८, तर हिंगोली जिल्ह्यात १११ नवे रुग्ण
आढळून आले.
****
केंद्रीय पथकानं काल उस्मानाबाद इथं भेट देऊन कोविड स्थितीचा आढावा घेतला.
शहरातल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांशी चर्चा करून या पथकानं कोविड
बाधितांवर उपचार पद्धतींची माहिती घेतली. रुग्णालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या
प्राणवायू प्रकल्पाची पाहणी केली. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत
पथकानं आशा स्वयंसेविकांकडून लसीकरण जनजागृतीची माहिती घेतली. उस्मानाबाद शहरातल्या
प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन, या पथकानं विलगीकरणात
असलेल्या नागरिकांवर उपचाराचीही माहिती घेत, आवश्यक सूचना
केल्या.
****
परभणी जिल्ह्यात केंद्रीय पाहणी पथकाने काल परभणी तालुक्यात पिंगळी इथं आरोग्य
केंद्राला भेट देऊन कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना तसंच लसीकरण कार्यक्रमाची
माहिती घेतली. या ठिकाणी केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर पथकाने समाधान व्यक्त
केलं. जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती अंजली आनेराव यांनी या पथकाला ग्रामीण
भागात आरोग्य संस्थांमधल्या अपुऱ्या मनुष्यबळाबाबत माहिती देत याविषयी पाठपुरावा
करण्याची मागणी केली.
****
कोविड रुग्णांवर उपचारासाठी आवश्यकता असेल, तरच सिटी
स्कॅन चाचणी करावी अशी महत्त्वपूर्ण सूचना केंद्रीय पथकाने केली आहे. औरंगाबाद इथं
महानगरपालिकेच्या मेलट्रॉन कोविड सेंटर इथं या पथकानं काल भेट देऊन व्यवस्थेचा
आढावा घेतला, त्यावेळी हे निर्देश दिले. गेल्या वर्षभरापासून
रुग्णालय प्रशासनानं केलेल्या कामाबद्दल पथकानं समाधान व्यक्त केलं.
****
लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली आहे. काल उदगीर इथं झालेल्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शहरी भागात संपर्क शोध करुन, व्यापारी - फेरीवाल्यांच्याही कोव्हिड चाचण्या करण्याचे निर्देश बनसोडे
यांनी दिले. उदगीर इथं कोविड बाधितांच्या उपचारासाठी नियेाजित ट्रामा केअर केंद्र
येत्या दहा दिवसांत कार्यान्वीत करण्याची सूचना बनसोडे यांनी केली.
****
नांदेड इथं महापालिकेच्या कोविड तपासणी केंद्रांवर काल अनेक कोविड संशयीत
रुग्णांना तपासणीविनाच घरी परतावं लागलं. आर.टी.पी.सी.आर. तपासणीसाठी आवश्यक
असलेल्या किट संपल्यामुळे या नागरिकांना घशातल्या स्रावाचे नमुने देता आले नाहीत, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
राज्यात पिण्यासाठीच्या पाणी टंचाई निवारणार्थ कार्यान्वयीत उपाययोजनांना मुदत
वाढ देण्यात आल्याचं पाणी पुरवठा आणि
स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगीतलं आहे. तात्पुरत्या पाणी पुरवठा
योजना, नळ योजना, विंधन
विहिरी विशेष दुरुस्ती इत्यादी उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचा कालावधी
शिथील करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. या कामांकरता येत्या ३० एप्रिल
पर्यंत मंजूरी देण्यात आली आहे. टंचाई कालावधीत याचा उपयोग होण्याच्या दृष्टीनं
सदर कामं येत्या ३१ मेपर्यंत पूर्ण करणं आवश्यक असल्याचं पाटील यांनी म्हटलं
आहे.
****
ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक तु. शं. कुलकर्णी यांचं काल नांदेड इथं
वार्धक्यामुळे निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन
महाविद्यालयातून मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले तुशं यांनी
मराठवाडा साहित्य परिषदेचं तसंच मराठवाडा साहित्य परिषदेच्या संमेलनाचं अध्यक्षपद
भुषवलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठान या मासिकाचे संपादक म्हणून ही
त्यांनी काम पाहिलं. त्यांचे "तृणाची वेदना’, ‘ग्रीष्मरेखा’,
‘अखेरच्या वळणावर’ हे कथासंग्रह प्रसिद्ध
आहेत. ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता’ या
ग्रंथाचं त्यांनी साहित्य अकादमीसाठी संपादन केलं आहे. मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार
समितीचे सदस्य, नव लेखकांना अनुदान देणाऱ्या साहित्य संकृती
मंडळाचे तज्ज्ञ परीक्षक, राज्य नाट्य प्रयोग परीक्षक,
राज्य साहित्य आणि संकृती मंडळाचे सदस्य अशा विविध जबाबादाऱ्या
त्यांनी समर्थपणे सांभाळल्या होत्या. साहित्य क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना,
मसापचा जीवन गौरव पुरस्कार तसंच नांदेड जिल्हा परिषदेच्या नरहर
कुरुंदकर साहित्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या देहदानाच्या
इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह, डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाला सुपूर्द करण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव इथले साहित्यिक पत्रकार प्रदीप
पाटील कामरसपल्लीकर यांचं काल सकाळी नांदेड इथं निधन झालं. ते ५० वर्षांचे होते.
रुग्णालयात त्यांच्यावर कोविडसाठीचे उपचार सुरु होते. पाटील यांचा 'गावकळा' हा कथासंग्रह, 'गावगोठा'
ही कादंबरी, तसंच 'संदर्भ
शोधतांना' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या या
काव्यसंग्रहाला 'प्रसाद बन वाङमय पुरस्कार' ही मिळाला होता. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट विकास
वार्ता पुरस्कारही देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभा मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर
यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी देगलूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
करण्यात आले. त्यापूर्वी आमदार अमरनाथ राजूरकर, मोहनराव
हंबर्डे, बालाजी कल्याणकर, यांच्यासह
जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर, यांनी प्रशासनाच्यावतीनं
अंतापूरकर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
****
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना कोविड
लसीचं महत्त्व पटवून देत, लसीकरणाबाबत प्रबोधन करण्याची सूचना
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी काल
औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातल्या बाजार सावंगी, गदाना,
तसंच वेरूळ इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.
लसीकरण सुरू असलेल्या ठिकाणी जेष्ठ नागरिकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी
आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही चव्हाण यांनी दिल्या
****
लातूर जिल्ह्याच्या हरंगुळ बुद्रुक या छोट्याशा गावात ४५ वर्षांवर वय असलेल्या
१५९ नागरिकांनी लस घेऊन लसीकरणात शंभर टक्के प्रतिसाद नोंदवला आहे. तीन एप्रिल
रोजी या गावात लसीकरणाला सुरवात झाली, त्यावेळी ६० जणांचं लसीकरण झालं होतं.
****
औरंगाबाद महानगर पालिकेच्या सर्व प्रभागात सुरू असलेलं कोविड लसीकरण आज बंद
असणार आहे. पुढील आठवड्याचे नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची
माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली. महापालिकेकडे
लसीच्या दहा हजार मात्रांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
प्रसिद्ध साहित्यिक प्रेमानंद गज्वी यांनी नागरिकांना कोविड संसर्गापासून
बचावासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्याचं आवाहन केलं आहे.
गेले वर्षभर आपण कोरोनाने अत्यंत
हैरान झालेलो आहोत. तेव्हा आपली सगळ्यांचीच एक मोठी जबाबदारी आहे. सरकार तर प्रयत्न
करतेच, पण आपण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले आणि सरकार ज्या पध्दतीने आपल्याला सांगतं
त्या प्रमाणे आपण जर वागलो, तर आपल्या जिवनात आलेला हा कोरोनाचा आजार लवकरात लवकर आपल्या
जिवनातून हद्दपार होईल. तेव्हा नियमीतपणे मास्क लावा, हात स्वच्छ करा आणि कोरोनाच्या
बरोबर आपली लढाई चालू ठेवा.
****
मराठवाड्यात काल काही ठिकाणी पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात रात्री पाचोड
परिसर, विहामांडवा, कडेठाण
तसंच बालानगर, खुलताबाद परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. लासूर
स्टेशन परिसरात रात्री साडे दहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी
कोसळल्या. जायकवाडी परिसरात रिमझिम पाऊस झाला. परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात
काही गावांमध्ये काल सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्याच्या
काही भागातही काल पावसाच्या सरी कोसळल्या. लातूर जिल्ह्यातही दुपारी काही भागात
पाऊस झाला. जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह तर अर्धापूर तालुक्यात रिमझिम पाऊस
झाला. हिंगोली जिल्ह्यात कनेरगाव नाका तसंच कडोळी इथं काल दुपारी जोरदार पाऊस
झाला. सेनगाव तालुक्यातल्या वाघजळी इथं शेतात हळद झाकण्यासाठी गेलेल्या
शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. या पावसामुळे मोसंबी, डाळींब, आंबा या फळांचं तसंच ज्वारी, बाजरी,
कांदा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
****
दख्खनचा ताज म्हणून प्रसिध्द असलेल्या औरंगाबाद इथल्या बीबी-का-मकबरा परिसरात
पर्यटकांसाठी 'ध्वनी आणि प्रकाश' कार्यक्रमाच्या
सादरीकरणासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची सूचना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी
केली आहे. आमदार अंबादास दानवे यांनी यासंदर्भात आदित्य ठाकरे यांची भेट घेतली
होती. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर
करण्यासाठी अंदाजपत्रकासह आवश्यक प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश निर्गमित
झाले आहेत.
//************//
No comments:
Post a Comment