Monday, 12 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** कोविड पार्श्वभूमीवर राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय

** जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरता येणार

** बीड जिल्ह्यात नवे ७०३ कोविडग्रस्त; औरंगाबाद जिल्ह्यात आज १७ रुग्णांचा मृत्यू 

आणि

** औरंगाबाद इथं ब्रेक द चेनला विरोध करत उघडलेली दुकानं, पोलीस कारवाईनंतर पुन्हा बंद

****

राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली. त्यानुसार आता दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या ...

दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा आहेत. त्या पुढे ढकलण्या संदर्भामधला निर्णय आम्ही घेतलेला आहे. दहावीची परीक्षा सर्वसाधारणपणे जून महिन्यात होईल. आणि बारावीची परीक्षा ही मे च्या शेवटी होईल. की जेणेकरुन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं कुठलही नुकसान होऊ नये. सर्व लोकप्रतिनीधी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, टीसीएस यांनी सुध्दा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ज्या सुचना दिल्या होत्या त्या आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितल्या. राज्यशासनाच्या बोर्डाने जो निर्णय घेतलेला आहे. तो आपण इतर बोर्डांनी स्विकारावा. असं सुध्दा आता हे त्यांना सांगण्यात येईल.

 

विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध राजकीय संघटना, शिक्षण तज्ज्ञ आणि तंत्रज्ञांशी चर्चेनंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षेचा विचार करून सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि केंब्रीज बोर्डांनीही आपल्या परीक्षांच्या वेळापत्रकाचा फेरविचार करावा, असं आवाहन गायकवाड यांनी केलं आहे.

 

दरम्यान, दहावी बारावी परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. १२ वीच्या विद्यार्थ्यांना पुढे आय.आय.टी, जेईई, नीट वगैरे परीक्षा देऊन इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचे असतात हे लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षेचं नियोजन करावं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. परीक्षेसंदर्भात सुनियोजित कार्यप्रणाली शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी, परीक्षेसाठी मोठे हॉल शोधले जावेत, विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर बसवावे, परीक्षा केंद्राची, प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावे, अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्यात यावे, परीक्षा यंत्रणेतील सर्वांचं लसीकरण करून घ्यावं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

****

जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी दिली जाईल, असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे, राज्यातली कोरोनास्थिती आणि प्रतिबंधक उपयायोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ तसंच वेग देण्यासाठी, अधिग्रहीत खासगी रुग्णालयांमधील सुविधांच्या खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात येतील, अशी घोषणाही पवार यांनी केली. रेमिडिसिव्हीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता, वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिलं जाईल. तसंच हे औषध फक्त गरजू रुग्णांनासाठीच वापरलं जाईल. जिल्हाधिकारी त्यावर नियंत्रण ठेवतील. असं पवार यांनी सांगितलं. ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत पुढचे पंधरा दिवस महत्त्वाचे असून याकाळात रुग्णखाटा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर आदी उपलब्ध करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. या लढाईसाठी निधी आणि मनुष्यबळ कमी पडू दिलं जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

****

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबिया तर्फे वर्ल्ड साइन ऑफ ईक्वालिटी 'समतेचे जागतिक प्रतीक' म्हणून घोषीत करण्यात आलं आहे. १४ एप्रिल हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीदिन समता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णयही कोलंबियानं घेतला आहे.

****

भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा गर्दी न करता, साधेपणानं, घरीच राहून ऑनलाईन अभिवादन करून साजरी करावी, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. चैत्यभूमी वर १४ एप्रिलला गर्दी न करता, शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिर घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करावं, असंही त्यांनी सांगितलं आहे.

‘चैत्यभूमीचं लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करावं. इथला स्तूप जीर्ण झाला असून मोडकळीस आला आहे. या  स्तुपाची दुरुस्ती तातडीनं झाली पाहिजे असं आठवले यांनी म्हटलं आहे.

****

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साधेपणाने साजरी करण्यासंदर्भात विविध ठिकाणी शांतता समितीची बैठक घेण्यात येत आहे.

****

बीड जिल्ह्यात आज ७०३ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक २३९ रुग्ण अंबाजोगाई तालुक्यातले असून, त्याखालोखाल बीड तालुक्यात ११२, आष्टी ९०, परळी ६८, शिरुर ६२, केज ५५, गेवराई २५, माजलगाव १९, पाटोदा १२, वडवणी ११ आणि धारुर इथल्या १० रुग्णांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज १७ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन जण हे जालना जिल्ह्यातील तर एक जण हिंगोली जिल्हयातल्या सेनगाव येथील आहे. जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या आता एक हजार ९९४ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या आता ९८ हजार ७७६ झाली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोविड संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत असून सर्व उपचार सुविधांसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कोरोना चाचण्यांची दोन नवीन यंत्र प्रशासनाला प्राप्त झाली असून, आणखी एक यंत्र मिळणार आहे. त्यामुळे आता दररोज दहा हजारांच्यावर चाचण्या करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. जिल्ह्यात वीस हजार ५१० रुग्णखाटा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

नागरिकांनी मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता कोव्हिड लसीकरण करून घ्याव, उपलब्ध असलेल्या दोन्ही प्रकारच्या लस सुरक्षित आहेत असं नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो च्या वतीनं कोव्हिड -१९ लसीकरण तसच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियानाच्या उदघाटन प्रसंगी आज ते बोलत होते. नांदेड जिल्ह्यात पुढील २० दिवस या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी आज ब्रेक द चेनला विरोध करत दुकाने सुरु केली. मात्र, पोलिस प्रशासनानं ही दुकाने पुन्हा बंद करायला लावली. येत्या एक दोन दिवसात संपूर्ण टाळेबंदी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दुकाने उघडण्यात आली होती, टाळेबंदी लावण्यापूर्वी शासनानं व्यापारी वर्गाला वेळ द्यावा. १०० टक्के टाळेबंदी लावावी, ऑनलाईन खरेदी विक्री व्यवहारही पूर्ण बंद करण्यात यावे अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जग्गनाथ काळे यांनी केली आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथल्या रेल्वे उड्डाण पुलाच काम तत्काळ पूर्ण कराव, या मागणीसाठी गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी परभणी इथं बेमुदत उपोषणास सुरु केलं आहे. या उड्डाणपुलाचं लवकर काम पूर्ण कराव या आणि अन्य मागण्या आमदार गुट्टे यांनी केल्या आहेत.

****

लातूर जिल्ह्यात काल अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. रेणापूर तालुक्यात कारेपूर परिसरात काल झालेल्या वादळी पाऊस आणि गारपीटीमुळे, भाजीपाला आणि फळबागांच मोठ नुकसान झाल आहे.

//**********//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...