Sunday, 4 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 April 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 April 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.

****

** पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचं वार्षिक मूल्यमापन न करता उत्तीर्ण करण्याचा राज्यसरकारचा निर्णय

** कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं वृत्तपत्र संपादक, मालक, मराठी नाट्य निर्माता, चित्रपटगृह चालक तसंच व्यायाम शाळांच्या मालक, संचालकांना आवाहन

** कोविड संसर्ग साखळी तोडण्यासाठी तपासण्यांची व्याप्ती वाढवण्याची केंद्र सरकारची राज्यांना सूचना

** राज्यात ४९ हजार ४४७ नवे कोविड रुग्ण, मराठवाड्यात ८२ रुग्णांचा मृत्यू तर ५ हजार ३७६ बाधित

** औरंगाबाद जिल्ह्यात रात्रीच्या संचारबंदीत ३० एप्रिलपर्यंत वाढ

आणि

** काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एन. एम. कांबळे आणि माजी राज्यमंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांचं निधन

****

राज्यात पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना २०२०-२१ या चालू शैक्षणिक वर्षात वर्गोन्नती देण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. सर्व विद्यार्थ्यांचं वार्षिक मूल्यमापन न करता त्यांना उत्तीर्ण केलं जाणार आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं हा निर्णय घेतला आहे. त्या म्हणाल्या....  

राज्यामधले जे विद्यार्थी आहेत जे पहिली ते आठवीचे विद्यार्थी आहेत. शिक्षण हक्क अधिकारांच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट जे आहे, त्यांना पास करुन त्यांना पुढच्या वर्गामध्ये पाठवण्या संदर्भामधला निर्णय हा शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही आज घेत आहोत. आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की, आपण विविध मार्गातून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न या मधल्या काळामध्ये करण्याचं काम केलं. परंतु पहिले ते आठवीचे विद्यार्थी आहेत त्यांची वर्गोन्नती करण्याचा आ‍पण या ठिकाणी निर्णय घेतला आहे.

 

इयत्ता ९ वी तसंच ११ वीच्या विद्यार्थ्यांबाबतही लवकरच असा निर्णय घेण्याचे संकेत गायकवाड यांनी दिले. विद्यार्थ्याना वर्गोन्नती देत असताना त्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे मार्फत निर्गमित करण्यात येतील, असं गायकवाड यांनी सांगितलं.

****

दरम्यान, या आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कुठलीही कपात न करण्याचा निर्णय, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतला आहे. गेल्या वर्षी अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आलेल्या प्रकरणांचा तसंच विषयांचा नव्या वर्षात समावेश करण्यात आला आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्षात या इयत्तांचा ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला होता.

****

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वृत्तपत्रांचे संपादक, मालक, वितरक, मराठी नाट्य निर्माता, आणि मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह चालक संघटनेचे प्रतिनिधी तसंच राज्यातल्या व्यायाम शाळांचे मालक, संचालक यांच्याशी दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला. कोविड विषाणू विरुद्धची लढाई एकट्या सरकारची नाही, सरकार करत असलेल्या प्रयत्नांना सर्वांनी राजकारण न करता, साथ दिली पाहिजे, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कोरोनाशी लढताना राज्यात भीतीचं वातावरण नसावं, एकमेकांची योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने समाजात जागृती व्हावी, आणि या कामी माध्यमांनी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. सरकारला टाळेबंदी करणं आवडत नाही. कुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही, मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवं आव्हान उभं राहिल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. राज्याच्या हिताचा म्हणून जो निर्णय घ्यावा लागेल, त्यामध्ये व्यायामशाळा-जिम चालकांनी सर्व शक्तीनिशी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. चित्रपटगृह चालक-मालक संघटनेलाही मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं.

****

टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनता, हातावरचे पोट असणारे गोरगरीब, कष्टकरी, बारा बलुतेदार, छोटे उद्योजक यांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने प्रथम व्यवस्था उभी करावी मगच टाळेबंदीचा विचार करावा, असं भारतीय जनता पक्षाने म्हटलं आहे. पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काल पत्रकार परिषदेत पक्षाची ही भूमिका मांडली. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आपण कोरोनाच्या संकटात सरकारला साथ देऊ, मात्र सरकारने सामान्य जनतेचा पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा, असं उपाध्ये यांनी नमूद केलं. राज्यातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, कोरोना चाचणी सुविधा मोफत उपलब्ध करुन द्यावी आणि कोविडवर शासकीय तसंच खाजगी रुग्णालयात मोफत उपचार करावेत, अशी मागणीही उपाध्ये यांनी केली.

****

कोविड संसर्ग साखळी तोडण्यासाठी तपासण्यांची व्याप्ती वाढवणं तसंच प्रतिबंधित क्षेत्र निर्माण करण्याची सूचना केंद्र सरकारने ११ राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. यामध्ये महाराष्ट्रासह पंजाब, कर्नाटक, दिल्ली, हरियाणा आणि छत्तीसगढ या राज्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक तसंच आरोग्य सचिवांची उच्चस्तरीय बैठक घेऊन, कोविड प्रतिबंधासाठी तत्काळ प्रभावी उपाययोजना करण्याचे तसंच मार्गदर्शक सूचनांचं कठोर पालन करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, आरोग्य कर्मचारी आणि कोरोना काळात आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता  नसल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. काही अपात्र लाभार्थी लसीकरणासाठी या श्रेणीतून नोंदणी करत असल्याचं आढळून आलं आहे, यामुळे  नियमांचं उल्लंघन होत असल्याचं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

राज्यात काल ४९ हजार ४४७ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २९ लाख ५३ हजार ५२३ झाली आहे. काल २७७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५५ हजार ६५६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८८ शतांश टक्के झाला आहे. काल ३७ हजार ८२१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २४ लाख ९५ हजार ३१५ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८४ पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात चार लाख एक हजार १७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या ५ हजार ३७६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८२ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २१, नांदेड जिल्ह्यातल्या २६, जालना आठ, तर परभणी जिल्ह्यातल्या सहा रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल १ हजार ३९५ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार २०७, लातूर ६९२, जालना ५६५, परभणी ५२७, बीड ४३४, उस्मानाबाद ३४३, तर हिंगोली जिल्ह्यात २१३ रुग्ण आढळून आले.

****

औरंगाबाद जिल्ह्यात रात्रीच्या संचारबंदीची वेळ वाढवण्यात आली आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत रात्री आठ वाजेपासून सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी असेल. याबरोबरच दर शनिवार आणि रविवारचा सप्ताहांत टाळेबंदीही ३० एप्रिलपर्यंत कायम असेल.

काल जिल्ह्यातील सप्ताहांत टाळेबंदीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. शहरातली बहुतांश दुकानं बंद दिसून आली. रस्त्यावर वाहतुकही तुरळक स्वरुपात होती. जिल्ह्यात आजही पूर्ण टाळेबंदी लागू राहणार आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल खुलताबाद आणि फुलंब्री तालुक्यात प्रत्यक्ष भेट देऊन अधिकारी, नागरिकांशी संवाद साधला. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात, लसीकरणावर अधिक भर द्यावा, अशा सूचना त्यांनी प्रशासकीय तसंच वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या.

****

जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यानं काही गावं स्वयंस्फूर्तीनं बंद पाळत आहेत. भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगी गावात दोन दिवसांची जनता संचारबंदी पाळण्यात येत असल्यानं काल रस्त्यांवर, बाजारात शुकशुकाट दिसून आला. घनसावंगी तालुक्यातल्या वालसावंगी इथं दोन दिवसांपासून पुकारण्यात आलेल्या बंदला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यात जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करत सैलानी बाबा यात्रा उत्सव भरवल्या प्रकरणी १ हजार ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैलानी इथं भरणारी हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा दरगाह परिसरात भरणारी यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र, परवा २ एप्रिलला संध्याकाळी, संदल मिरवणुकीच्या वेळी अचानक, हजारो भाविक या भागात जमा झाले. हा जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. नियंमांचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिली.

****

पुण्यात बंदच्या दरम्यान बससेवा चालू ठेवण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. वाढत्या कोविड संसर्गामुळे पुण्यात आठवडाभरासाठी सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे

****

ख्रिस्ती धर्मियांचा येशूच्या पुनरुत्थानाचा सण ईस्टर संडे आज साजरा होत आहे. यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या कठीण काळात येशू ख्रिस्तांचा मानवता, प्रेम, दया, क्षमा आणि त्यागाचा संदेश सर्वांकरताच मार्गदर्शक असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे.

****

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एन. एम. कांबळे यांचं काल मुंबई इथं निधन झालं. ते शंभर वर्षांचे होते. मूळ साताऱ्याचे कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं होतं. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खाती सांभाळली आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे दोन वेळा अध्यक्ष, तसंच १९५७-६२ दरम्यान ते मुंबईचे महापौर होते.

****

राज्याचे माजी राज्यमंत्री तथा नांदेडचे माजी खासदार गंगाधरराव कुंटुरकर यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. कुंटूरच्या सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणारे कुंटुरकर यांनी, बिलोली पंचायत समितीचे सभापती तसंच नांदेड जिल्हा परिषदेचे दीर्घकाळ अध्यक्षपद भुषवलं होतं. दोन वेळी आमदार तर एकदा खासदारपदी निवडून गेलेले कुंटुरकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही काम केलं होतं. काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी अनेक वर्ष सांभाळल्यावर, राष्ट्रवादी पक्षातही त्यांनी अनेक वर्ष काम केलं. गेल्या दीड वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. नायगाव तालुक्यातल्या जय अंबिका साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, राज्य सहकारी बँकेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं. कुंटुरकर यांच्या निधनानं, ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेला नेता हरपला, अशा शब्दात, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण आणि, माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

****

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचं काल नाशिक इथं कोविड संसर्गामुळे निधन झालं. देशपांडे यांनी विमा कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून सुमारे पाच दशकं भरीव कार्य केलं आहे. देशपांडे यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे.

****

केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या कामाला प्रत्यक्ष १५ मार्चपासून सुरवात झाली आहे. या ५४ किलोमीटरच्या मार्गातील सर्वेक्षण पूर्ण झालं असून, ज्या ठिकाणी रेखांकन पूर्ण झालेलं आहे, अशा ठिकाणी भूसंपादन केलं जात असल्याचं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं. किती गावातल्या किती नागरिकांच्या जमिनी संपादित केल्या जाणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. या रेल्वे मार्गासाठी पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब शहरात बनावट नोटा बाजारात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. असरफ अली असं या इसमाचं नाव असून, पोलिसांनी सापळा रचून राहत्या घरातून त्याला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली असता. कचऱ्याच्या डब्यात पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या तीन तर दोनशे रुपये दर्शनी मूल्याच्या पाच बनावट नोटा आढळल्या. या आरोपीला काल न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

//**********//

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 08 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...