Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09
April 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ९ एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ
होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक
नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या
नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं.
या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी
होणारी पूर्व परीक्षा तुर्तास स्थगित
**
कोविड लसींअभावी मुंबईतली अनेक लसीकरण केंद्र
आज बंद
**
परभणी इथं कोविड केंद्र तसंच लसीकरण केंद्राची केंद्रीय पथकाकडून पाहणी
आणि
**
औरंगाबाद इथं २३ कोविडग्रस्तांचा मृत्यू; बीड जिल्ह्यात नवे ७३२ रुग्ण
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या
रविवारी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संवर्गाची संयुक्त पूर्व परीक्षा
पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातली कोविड स्थिती लक्षात घेऊन परीक्षेच्या तारखा
एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांची
सुरक्षा, विविध राजकीय पक्षांचं या संदर्भातलं मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय
एकमताने घेण्यात आला आहे.
****
कोविड प्रतिबंध लसीचा साठा उपलब्ध न
झाल्यामुळे मुंबईतली ७१ पैकी २६ लसीकरण केंद्र आज बंद आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी
पेडणेकर यांनी ही माहिती दिली. आज मुंबईत कोविड लसींच्या एक लाख ७६ हजार मात्रा पोहोचण्याची
आशा आहे. जोपर्यंत लसीच्या या मात्रा मिळत नाहीत, तोपर्यंत लसीकरण स्थगित करावं लागल्याचं
महापौरांनी सांगितलं.
नवी
मुंबईतली खाजगी आणि महापालिकेची अशी सर्व लसीकरण केंद्र आज बंद ठेवण्यात आली आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत
१ लाख ४३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. नवी मुंबईत कोरोना
लसीकरणासाठी महापालिकेची २६ आणि १६ खाजगी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
****
राज्यपालांनी केंद्राकडे कोविड लसीच्या वाढीव मात्रा पुरवण्याची
मागणी करावी, असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राज्यात हातावर पोट असलेला कष्टकरी कामगार तसंच
छोटे व्यापारी अडचणीत आहेत, त्यांना थेट आर्थिक मदत करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे
केली असल्याचं, दरेकर यांनी यावेळी सांगितलं.
****
प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी, नागरिकांना कोविड
संसर्गापासून बचावासाठी घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.
नमस्कार मंडळी मी पद्मजा
फेणाणी जोगळेकर सध्या करोना पुन्हा फार मोठ्या प्रमाणात फैलावतोय तरी सर्वांनी स्वत:ची
आणि घरच्यांची काळजी घ्या. विनाकारण बाहेर फिरु नका. इच्छा असूनही कोणाचा कोणाशी भेटण्याचा
योग येत नाही. तरी आपण आपली आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या. कारण ‘जान है तो जहान है’.
घरी रहा सुरक्षित रहा. धन्यवाद.
****
राज्यात
रक्ताचा तुडवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेश युवक काँग्रेसनं राज्यभर रक्तदान
शिबिरं आयोजित करून, २५ हजार पिशव्या रक्तसंकलन करण्याचा निर्धार केला आहे. युवक काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ही माहिती दिली. मागील वर्षीही युवक काँग्रेसच्या
पुढाकाराने २८ हजार ५०० रक्तपिशव्यांचं संकलन केल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं घालून
दिलेल्या कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करुनच ही रक्तदान शिबीरं घेतली जातील, असही
तांबे या वेळी म्हणाले.
****
पुणे इथं रेमडेसिवीर इंजेक्शन अधिक किंमतीनं विकत
असल्याचं निदर्शनास आल्यानं महापालिका
आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातल्या तीन रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या मध्ये आदित्य बिर्ला रुग्णालय,
लोकमान्य रुग्णालय आणि पिंपरी इथल्या डी. वाय. पाटील रुग्णालयाचा समावेश आहे.
****
परभणी जिल्ह्यातील रेमडीसेव्हर इंजेक्शनचा काळा बाजार रोखून
खरेदी-विक्रीसाठी नियमावली तयार करुन पारदर्शकता आणावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने
करण्यात आली आहे. या मागणीचं पत्र संघटनेनं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन
या मागणीचं निवेदन सादर केलं.
****
गोंदिया
जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात काल
आग विझवतांना मृत्युमूखी पडलेल्या तीन हंगामी
वनमजूरांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर
करण्यात आली आहे. मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली असून आगीत जखमी वनमजूरांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
देशात
प्रत्यक्ष कर संकलनात सुमारे पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा प्रत्यक्ष कराच्या
रुपात नऊ लाख ४५ हजार कोटी रुपये महसूल जमा झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली
आहे. या आर्थिक वर्षात दोन लाख ६१ हजार कोटी रुपये परतावा जारी केल्याची माहिती मंत्रालयाकडून
देण्यात आली.
****
परभणी
जिल्ह्यात कोविडच्या प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी
दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने आज शासकीय रुग्णालयातल्या कोविड
केंद्र तसंच लसीकरण केंद्राला भेट
देऊन पाहणी केली. शहरातील अन्य कोविड केंद्रांचीही
या पथकानं पाहणी केली. कोविड केंद्रात
उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधत या पथकाने व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यापूर्वी
आज सकाळी या पथकाने जिल्हाधिकारी दीपक
मुगळीकर यांची भेट घेऊन चर्चा केली.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज २३ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये २२ रुग्ण हे औरंगाबाद
जिल्ह्यातील आहेत तर एक रुग्ण जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथला आहे. मृत रुग्णांमध्ये
१२ पुरुष आणि ११ महिला रुग्णांचा समावेश आहे. जिल्हयात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं
एक हजार ९१७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या ९४
हजार ३५ झाली आहे.
****
बीड
जिल्ह्यात आज ७३२ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. यामध्ये सर्वाधिक २१६ रुग्ण बीड
तालुक्यातले असून अंबाजोगाई आणि आष्टी तालुक्यात प्रत्येकी १२७, केज ६७, गेवराई ५५,
परळी ४८, माजलगाव ३५, पाटोदा २६, वडवणी आठ आणि शिरुर इथल्या सहा रुग्णांचा समावेश आहे.
****
नाशिक इथले विभागीय माहिती कार्यालयातील प्रदर्शन
सहाय्यक राजेंद्र हिरामण येवले यांचं आज धुळे इथं निधन
झालं. ते ५० वर्षांचे होते. मागील १२ दिवसांपूर्वी
कोविडची लक्षणं आढळल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
****
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पात्र नागरिकांनी कोविड
लस घेण्याचं आवाहन परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ
अशोक ढवण यांनी केलं आहे.
जिथं जिथं लसीकरणाचा कार्यक्रम
चालू आहे त्या ठिकाणी उपलब्धतेनुसार आणि आपल्या क्रमानुसार विशेषत: जेष्ठ जे नागरिक
आहेत त्यांनी प्राधान्याने लसीकरण करुन घ्यावं आणि इतरांनी लस उपलब्ध होईपर्यंत शासनाने
आणि आरोग्य यंत्रनेने घालून दिलेले सर्व नियम आणि निर्बंध यांचं कटाक्षानं पालन करावं.
****
औरंगाबाद
जिल्हा प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा सप्ताहांत टाळेबंदीसाठी सज्ज झाली आहे.
औरंगाबादमध्ये स्थानिक नियमावलीनुसार आज संध्याकाळी आठ वाजेपासून सोमवार सकाळी सात
वाजेपर्यंत ही टाळेबंदी लागू राहणार आहे. या कालावधीत औरंगाबाद शहरासह संपूर्ण जिल्ह्यात
संचारबंदी जारी राहणार असल्यानं अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणांसाठी नागरिकांना विनाकारण
बाहेर फिरता येणार नाही.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड
विभागातून धावणाऱ्या कुठल्याही गाडीत तसंच
रेल्वे स्थानकावर गर्दी सारखी परिस्थिती नाही. विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदरसिंग यांनी ही माहिती दिली. कोविडपूर्वी विभागातून
दररोज एक लाख दहा हजार प्रवासी रेल्वेतून प्रवास करत, सध्या मात्र प्रवासी संख्या दररोज
साडे सात हजाराच्या जवळपास आहे. सामाजिक माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या गर्दीच्या
चित्रफितींवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
****
`इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएलच्या` १४ व्या
स्पर्धेला आजपासून सुरवात होत आहे. यंदा या स्पर्धेतले सामने मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता,
दिल्ली आणि अहमदाबाद या सहा ठिकाणी होणार आहेत. पहिला सामना सध्याचा
विजेता मुंबई इंडियन आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू या दोन संघात चेन्नई इथं होणार असून,
विजेतेपदाचा सामना ३० मे रोजी अहमदाबाद इथं होणार आहे. गेल्यावर्षी
कोरोना विषाणू संसर्गामुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आली होती. या वर्षीही कोविड संसर्गाच्या
प्रादुर्भावामुळे प्रेक्षकांविना या स्पर्धा होणार आहेत.
//*********//
No comments:
Post a Comment