Tuesday, 6 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 06.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

न्यायमूर्ती एन व्ही रमणा देशाचे ४८वे सरन्यायाधीश होतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमणा यांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रमणा यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांचा कार्यकाळ पुढच्या वर्षी २६ ऑगस्ट पर्यंत असेल. आंध्र प्रदेशमधल्या शेतकरी कुटुंबातले रमणा हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

****

कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढती संख्या आणि वाढता मृत्यू दर पाहता केंद्र सरकारनं महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि पंजाबमध्ये ‘जन स्वास्थ्य दल’ पाठवले आहेत. महाराष्ट्रातल्या ३०, छत्तीसगढमधल्या ११ आणि पंजाबमधल्या नऊ जिल्ह्यांमध्ये हे दल पाठवण्यात आले आहेत. कोविडचा प्रसार रोखणं, प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात हे दल राज्य सरकारला सहकार्य करणार आहेत. हे दल राज्यांचा दौरा करुन कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी करणार आहेत. यामध्ये उपचार सुविधा, प्रतिबंधात्मक कार्य, रुग्णखाटांची उपलब्धता, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, इतर उपचार साहित्य आणि लसीकरणाचा समावेश आहे. भारत सरकारनं तीन वरीष्ठ अधिकाऱ्यांना या तीन राज्यांमध्ये नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलं आहे. शहरी विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव कुनक कुमार यांची महाराष्ट्राचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

****

देशभरात कोविड प्रतिबंधासाठी आजपासून विशेष अभियान सुरु करण्यात आलं आहे. याअंतर्गत मास्क वापरणं, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य सुविधांवर भर देण्यात येणार आहे. १४ एप्रिलपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे. गेल्या रविवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोविड प्रतिबंधासाठी जागरुकता आणि जनसहभाग महत्वपूर्ण असल्याचं म्हटलं होतं.

****

लसीकरणापासून वंचित राहीलेले आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतल्या कर्मचाऱ्यांसाठी, सरकारी कोविड लसीकरण केंद्रात नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी, यासंबंधी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. १८ ते ४४ वर्ष वयाचे आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतल्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याकरता, आवश्यक कागदपत्र जमा करणं अनिवार्य असल्याचं, या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

****

देशानं कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महत्वाचा टप्पा पार केला आहे. देशात आतापर्यंत आठ कोटी ३१ लाखाहून अधिक नागरीकांचं कोविड लसीकरण झालं आहे.

दरम्यान, देशात काल नव्या ९७ हजार कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी २६ लाख झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, एक लाख ६५ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल जवळपास ५० हजार रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत, एक कोटी १७ लाख रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या सात लाख ८८ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

राज्यात कोविड-19 चा मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला आहे. राज्यातल्या शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा, येत्या २० एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीनं लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध नर्सिंग कॉलेजमधल्या जी.एन.एम आणि ए.एन.एम हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप पूर्ण झालेल्या १५ हजार परिचारिकांच्या नोंदणीचं काम तातडीनं पूर्ण करुन, त्यांच्या सेवाही आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

****

कोविड प्रतिबंधासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. औरंगाबाद शहरातली सर्व दुकानं आणि बाजापेठ बंदला व्यापाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

****

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरण हाच उपाय असल्याचं, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. मी जबाबदार या मोहिमेच्या माध्यमातून कोरोना संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी, दानवे यांच्या संयोजनाखाली जनजागृती संवाद दौरा सुरू असून, जिल्ह्यातल्या विविध गावांना भेट देऊन, कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. काल वेरूळ, पळसवाडी, गल्लेबोरगाव, निरगुडी, धामणगाव, खिर्डी या गावांना भेट देऊन कोविड प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली.

****

मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या कोविड प्रादुर्भाव कालावधीमध्ये बँकिंग क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, अधिकाऱ्यांना सरकारनं प्राधान्यानं लसीकरण करावं, अशी मागणी सोलापूर जनता सहकारी बॅंकेचे संचालक तथा श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेटचे अध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना पत्र लिहिलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...