Wednesday, 7 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून, व्याजदर कायम राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केलं. कोरोना विषाणूचं संक्रमण वाढत असलं तरी अर्थव्यवस्थेत सुधारणा होताना दिसत आहेत. मात्र, रुग्णसंख्या वाढल्यानं अनिश्चिततेतही भर पडली आहे. असं असलं तरी भारत आव्हानांवर मात करण्यासाठी तयार आहे. फेब्रुवारीमध्ये महागाई दर पाच टक्क्यांवर होता, असं दास यांनी यावेळी सांगितलं. पतधोरण आढावा समितीनं रेपो दर चार टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून, रिव्हर्स रेपो दरही तीन पूर्णांक ३५ टक्केच निश्चित करण्यात आला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पन्न दहा पूर्णांक पाच राहणार असल्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे.   

****

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लागू केले असून, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.

औरंगाबाद शहरातल्या सिडको परिसरात व्यापाऱ्यांनी आज सरकारच्या कडक निर्बंधांना विरोध करत निषेधाचे फलक झळकावले.

मुंबईत दादरमधले व्यापारी कालपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. सरकारनं लादलेले कडक निर्बंध शिथिल करा, अशी मागणी व्यापारी करत आहेत.

****

कोविड महामारी अजून संपुष्टात आली नसून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करण्याचं आवाहन, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या ट्विट संदेशात, नागरीकांना लसीकरण करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर नागरिकांनी कोविड प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्यासही सांगितलं आहे.

सर्वांसाठी निष्पक्ष आणि सुदृढ जग निर्माण करणं, ही जागतिक आरोग्य दिनाची यंदाची संकल्पना आहे. जागतिक आरोग्य दिन म्हणजे आपल्या जगास आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असणाऱ्या सर्वांना धन्यवाद आणि कौतुक करण्याचा दिवस असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

****

देशात आतापर्यंत आठ कोटी ७० लाख ७७ हजार ४७४ नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं.

दरम्यान, देशात काल नव्या एक लाख १५ हजार ७३६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली तर ६३० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी २८ लाख एक हजार ७८५ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ६६ हजार १७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ५९ हजार ८५६ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत एक कोटी १७ लाख ९२ हजार १३५ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या आठ लाख ४३ हजार ४७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सात वाजता ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर यंदा हा कार्यक्रम दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार आहे. कोणताही ताण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी कशी करावी, याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमानिमित्त एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं; यातील विजेत्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे.

****

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ एप्रिलला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७६वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार माय जीओव्ही ओपन फोरमवर, नरेंद्र मोदी ॲप वर किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी काल विविध राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत राज्यांमधल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी टोपे यांनी विविध मुद्दे मांडताना महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लसीकरणाला गती मिळावी यासाठी केंद्र शासनानं मागणीप्रमाणे पुरवठा करण्यावर टोपे यांनी भर दिला.

****

इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएलच्या १४ व्या स्पर्धेला येत्या शुक्रवारपासून सुरवात होत आहे. यंदा या स्पर्धेतले सामने मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि अहमदाबाद या सहा ठिकाणी होणार आहेत. पहिला सामना सध्याचा विजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघात चेन्नई इथं होणार असून, अखेरचा सामना ३० मे रोजी अहमदाबाद इथं होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...