Wednesday, 7 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.04.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

जागतिक आरोग्य दिवस आज पाळण्यात येतो. सात एप्रिल १९४८ रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती. आरोग्याप्रती लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणं हा या दिनाचा उद्देश आहे. सर्वांसाठी निष्पक्ष आणि सुदृढ जग निर्माण करणं, ही जागतिक आरोग्य दिनाची यंदाची संकल्पना आहे. जागतिक आरोग्य दिन म्हणजे  आपल्या जगास आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असणाऱ्या सर्वांना धन्यवाद आणि कौतुक करण्याचा दिवस असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

विदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात राहणं बंधनकारक आहे, मात्र काही प्रवाशांकडून नियम पाळले जात नसल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे पालिकेनं नवी सुधारित नियमावली जारी केली आहे. ब्रिटन, युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहणं सक्तीचं करण्यात आलं आहे. नियम न पाळणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर करण्याचा इशारा पालिकेनं दिला आहे.

****

कोविडचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे, त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन या औषधाचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. तसंच, कोरोना रुग्णवाढीचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी राहील यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, गृह विलगीकरणात असलेले रुग्ण घरातच राहावेत याची काळजी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

****

मराठवाड्यात काल नव्या पाच हजार ४४५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९१ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ३०, नांदेड जिल्ह्यातल्या २३, बीड दहा, परभणी नऊ, उस्मानाबाद आठ, जालना पाच, तर हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ३३७ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ६२, लातूर ९२५, बीड ७१६, परभणी ४३६, जालना ४२५, उस्मानाबाद ४१५, तर हिंगोली जिल्ह्यात १२९ नवे रुग्ण आढळून आले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...