Saturday, 10 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 10.04.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 April 2021

Time 7.10AM to 7.25AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांकएप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      एमपीएससीची दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संवर्गाची उद्या होणारी पूर्व परीक्षा तुर्तास स्थगित.

·      सेवानिवृत्त डॉक्टर्स आणि परिचारिकांना पुढील काही काळासाठी सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश.

·      इयत्ता दहावी - बारावीच्या परीक्षांसंदर्भातला निर्णय येत्या पाच दिवसात - शालेय शिक्षण मंत्र्यांची माहिती.

·      राज्यात कोविड लसीच्या चार लाख ५९ हजार मात्रा प्राप्त; उद्या आणखी दोन लाख ८३ हजार मात्रा मिळणार.

·      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी.

·      राज्यात नवे ५८ हजार ९९३ कोविडग्रस्त; मराठवाड्यात ९० बाधितांचा मृत्यू तर नव्या सात हजार ३२३ रुग्णांची नोंद.

·      देगलूर-बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं काल मुंबईत निधन.

·      वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाकडून औरंगाबाद; परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात पाहणी.

आणि

·      निर्धारित रकमेपेक्षा अधिक शुल्क घेतल्याप्रकरणी परभणी इथं सिटीस्कॅन सेंटरवर कारवाई.

****

राज्य लोकसेवा आयोग - एमपीएससीची उद्या रविवारी होणारी, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संवर्गाची, संयुक्त पूर्व परीक्षा, तुर्तास स्थगित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत, ही परीक्षा सध्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातली कोविड स्थिती लक्षात घेऊन परीक्षेच्या तारखा एमपीएससीकडून नव्यानं घोषित केल्या जातील असं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांची सुरक्षा, विविध राजकीय पक्षांचं या संदर्भातलं मत आणि मागण्या विचारात घेऊन, हा निर्णय एकमतानं घेण्यात आला आहे.

****

सेवानिवृत्त डॉक्टर्स तसंच परिचारिकांना पुढील काही काळासाठी सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. राज्यातल्या सर्व नामांकित खासगी रुग्णालयांचे संचालक आणि तज्ञांशी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, या बैठकीत सहभागी देशमुख यांनी, हे निर्देश दिले. पुढील तीन किंवा सहा महिन्यांसाठी या निवृत्त डॉक्टर तसंच परिचारिकांच्या सेवा घेता येऊ शकतील, त्यामुळे अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध होईल, असं देशमुख म्हणाले. खासगी रुग्णालयांनी या काळात अतिदक्षता कक्षातल्या रुग्णखाटा, प्राणवायू सुविधेसह रुग्णखाटा यांचा विस्तार करण्याची सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी केली. राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात तातडीने व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन बेड विस्ताराचे काम हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी, कोरोनाविरुद्ध सर्वांनी एकजुटीने लढा देण्याचं आवाहन यावेळी केलं.

****

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भातला निर्णय येत्या पाच दिवसात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल दिली. राज्यातल्या कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आमचं प्राधान्य असून, परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्या म्हणाल्या. पालक, शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी, राजकीय पक्ष, तंत्रज्ञानातील दिग्गज आणि अन्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकच्या पर्यायाबात सल्लामसलत सुरु असल्याचंही, मंत्री गायकवाड यांनी सांगितलं.

****

राज्यात काल कोविड लसीच्या चार लाख ५९ हजार मात्रा प्राप्त झाल्या. पुणे, मुंबई, सातारा, सांगली, पनवेल यासारख्या ठिकाणी या मात्रा पुरवण्यात आल्या आहेत, राज्याचे लसीकरण अधिकारी डी. एन. पाटील यांनी काल ही माहिती दिली. येत्या दोन ते तीन दिवसांसाठी या मात्रा पुरेशा आहेत. उद्या ११ तारखेला आणखी दोन लाख ८३ हजार मात्रा मिळतील, असं पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, कोविड प्रतिबंध लसीअभावी मुंबईतली ७१ पैकी २६ लसीकरण केंद्र काल बंद होती. नवी मुंबईतली खाजगी आणि महापालिकेची अशी सर्व लसीकरण केंद्रही काल लसीअभावी बंद होती.

****

राज्यात रक्ताचा तुडवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर, प्रदेश युवक काँग्रेसनं राज्यभर रक्तदान शिबिरं आयोजित करून, २५ हजार पिशव्या रक्तसंकलन करण्याचा निर्धार केला आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ही माहिती दिली. मागील वर्षीही युवक काँग्रेसच्या पुढाकाराने २८ हजार ५०० रक्तपिशव्यांचं संकलन केल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं घालून दिलेल्या कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करुनच ही रक्तदान शिबीरं घेतली जातील, असही तांबे या वेळी म्हणाले.

****

प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी, नागरिकांना कोविड संसर्गापासून बचावासाठी घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.

नमस्कार मंडळी मी पद्मजा फेणाणी जोगळेकर सध्या करोना पुन्हा फार मोठ्या प्रमाणात फैलावतोय तरी सर्वांनी स्वत:ची आणि घरच्यांची काळजी घ्या. विनाकारण बाहेर फिरु नका. इच्छा असूनही कोणाचा कोणाशी भेटण्याचा योग येत नाही. तरी आपण आपली आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या. कारण ‘जान है तो जहान है’. घरी रहा सुरक्षित रहा. धन्यवाद.

****

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १३० वी जयंती साजरी केली जाणार आहे. राज्यात वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारनं जयंती साजरी करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना काल जारी केल्या. सकाळी सात ते संध्याकाळी आठ या दरम्यान जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करावी. प्रभात फेरी, दुचाकी फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नये, बाबासाहेबांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला अभिवादन करतांना, एकाचवेळी पाच पेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊ नये, आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं, आदी सूचना करण्यात आल्या आहेत. मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरुन करण्यात येणार आहे. त्यामुळे अनुयायांनी चैत्यभूमीवर येवू नये, त्या ऐवजी घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावं, असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

****

देशात प्रत्यक्ष कर संकलनात सुमारे पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा प्रत्यक्ष कराच्या रुपात नऊ लाख ४५ हजार कोटी रुपये महसूल जमा झाल्याची माहिती, अर्थ मंत्रालयाने दिली आहे. या आर्थिक वर्षात दोन लाख ६१ हजार कोटी रुपये परतावा जारी केल्याची माहिती, मंत्रालयाकडून देण्यात आली.

****

राज्यात काल ५८ हजार ९९३ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३२ लाख ८८ हजार ५४० झाली आहे. काल ३०१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५७ हजार ३२९ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ७४ शतांश टक्के झाला आहे. काल ४५ हजार ३९१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २६ लाख ९५ हजार ६५ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८१ पूर्णांक ९६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात पाच लाख ३४ हजार ६०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या सात हजार ३२३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ३२, नांदेड जिल्ह्यातल्या २७, परभणी १३, जालना आठ, बीड पाच, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ४१३ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ६५०, लातूर एक हजार ४०४, परभणी ८४२, बीड ७३२, उस्मानाबाद ५६४, जालना ५२३, तर हिंगोली जिल्ह्यात १९५ नवे रुग्ण आढळून आले.

****

नांदेड जिल्ह्यात देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ६३ वर्षांचे होते. गेल्या १७ मार्चला अंतापूरकर यांना कोविडची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. नांदेड इथं प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मुंबईत बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. आमदार अंतारपूरकर यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

नाशिक इथले विभागीय माहिती कार्यालयातले प्रदर्शन सहाय्यक राजेंद्र हिरामण येवले यांचं काल धुळे इथं निधन झालं, ते ५० वर्षांचे होते. मागील १२ दिवसांपूर्वी कोविडची लक्षणं आढळल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

****

वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने औरंगाबाद शहरात विविध ठिकाणी पाहणी करून कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. या कामात लोकांचा सहभाग आणि आशा कार्यकर्त्यांचे काम बघून, केंद्रीय पथकाने त्यांचं तसंच महापालिकेच्या आरोग्य विभागाचं कौतुक केलं. या पथकानं शहरातल्या प्रतिबंधित क्षेत्रालाही भेटी दिल्या. लसीकरण केंद्रालाही या पथकानं भेट देऊन लसीकरण व्यवस्थेचा आढावा घेतला. महानगरपालिकेच्या वॉर रूमचं कामकाज जाणून घेत, या पथकानं कामाबद्दल समाधान व्यक्त करत, आवश्यक सूचानाही केल्या.

****

परभणी जिल्ह्यात कोविडच्या प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने काल शासकीय रुग्णालयातल्या कोविड केंद्र तसंच लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. शहरातील अन्य कोविड केंद्रांचीही या पथकानं पाहणी केली. कोविड केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधत या पथकाने व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यापूर्वी आज सकाळी या पथकाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन चर्चा केली.

****

नांदेड जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं काल पाहणी केली. आरोग्य विभाग तसंच जिल्हा प्रशासकीय यंत्रणेमार्फत केल्या जात असलेल्या नियोजनाचा, विष्णुपुरी इथं डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसंच लोहा इथल्या कोविड केंद्राला भेट देऊन पाहणी केली, तर कारेगाव इथं गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या एका बाधिताची भेट घेवून चौकशी केली.

****

पुणे इथं रेमडेसिवीर इंजेक्शन अधिक किंमतीनं विकत असल्याचं निदर्शनास आल्यानं, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातल्या तीन रुग्णालयांना, कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या मध्ये आदित्य बिर्ला रुग्णालय, लोकमान्य रुग्णालय आणि पिंपरी इथल्या डी. वाय. पाटील रुग्णालयाचा समावेश आहे.

****

परभणी शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णाचे सिटीस्कॅन करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क घेतल्याप्रकरणी, पोरवाल डायक्नोस्टिक सिटीस्कॅन सेंटरवर कारवाई करण्यात आली. एका सिटीस्कॅनसाठी पाच हजार रुपये आकारले जात असल्याचं याबाबतच्या तक्रारीत नमूद आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांना याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले.

दरम्यान, परभणी जिल्ह्यातला रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार रोखून, खरेदी-विक्रीसाठी नियमावली तयार करुन पारदर्शकता आणावी अशी मागणी, प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. संघटनेनं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन सादर केलं.

****

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत टाळेबंदीची नियमावली शिथिल करावी, अन्यथा व्यावसायिक तसंच गोर गरीब जनतेला दरमहा पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा इथले भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केली आहे. काल त्यांनी या मागणीचं मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं निवेदन तहसीलदारांकडे सादर केलं. कोविडचे नियम पाळून सर्व बाजारपेठा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नाभिक समाजाच्या वतीनं काल तुळजापूरच्या तहसीलदारांना निवेदन सादर करत, सर्व नियम पाळून केश कर्तनालयं सुरू ठेवण्याची परवानगी मागितली आहे.

****

वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पात्र नागरिकांनी कोविड लस घेण्याचं आवाहन परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक ढवण यांनी केलं आहे –

जिथं जिथं लसीकरणाचा कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी उपलब्धतेनुसार आणि आपल्या क्रमानुसार विशेषत: जेष्ठ जे नागरिक आहेत त्यांनी प्राधान्याने लसीकरण करुन घ्यावं आणि इतरांनी लस उपलब्ध होईपर्यंत शासनाने आणि आरोग्य यंत्रनेने घालून दिलेले सर्व नियम आणि निर्बंध यांचं कटाक्षानं पालन करावं.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणाऱ्या कुठल्याही गाडीत तसंच रेल्वे स्थानकावर गर्दी सारखी परिस्थिती नाही. विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदरसिंग यांनी ही माहिती दिली. कोविडपूर्वी विभागातून दररोज एक लाख दहा हजार प्रवासी रेल्वेतून प्रवास करत, सध्या मात्र प्रवासी संख्या दररोज साडे सात हजाराच्या जवळपास आहे. सामाजिक माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या गर्दीच्या चित्रफितींवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातल्या जांभळा गावचे ग्रामसेवक बबन हलगडे याला एका खाजगी व्यक्ती गणेश शेलार याच्यामार्फत तीस हजार रुपयांची लाच घेतांना काल लाचलुचपत पथकानं रंगेहात पकडलं. जांभळा शिवारातल्या शेतीमध्ये कृषी विभागाकडून मंजूर झालेल्या विहीरीसाठी ग्रामपंचायत ठराव, आणि कुटुंब प्रमाणपत्र देण्यासाठी, ग्रामसेवक हलगडे यांनं ही लाच मागितली होती.

****

परभणी इथल्या शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य बी. आर. झटे यांचं काल दुपारी परभणीतील एका खासगी रुग्णालयात निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.

****

गोंदिया जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात काल आग विझवतांना मृत्युमूखी पडलेल्या तीन हंगामी वनमजूरांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली असून, आगीत जखमी वनमजूरांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल स्पर्धेच्या काल पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघानं मुंबई इंडियन्स संघाचा दोन गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सने दिलेलं १६० धावांचं लक्ष्य बंगळूरु संघानं शेवटच्या चेंडूत पूर्ण केलं. या स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली डेअरडेविल्स यांच्यात सामना होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...