आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१० एप्रिल २०२१ सकाळी ११.००
वाजता
****
राज्यात वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यात कडक निर्बंध आणि सप्ताहांत टाळेबंदी
लाऊनसुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आणखी कडक निर्बंध लावण्याच्या
विचारात राज्य सरकार असून, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
****
राज्य शासनानं कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशानं विविध क्षेत्रात
काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती, आता त्याबरोबरच
ॲन्टीजेन चाचणीही ग्राह्य धरण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन, मदत तथा पुनर्वसन विभागाचे
प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी नवीन सुधारणांचे आदेश जारी केले.
****
लसीचा मर्यादित साठा असूनही महाराष्ट्र राज्याने आजपर्यंत ९७ लाखांहून अधिक नागरिकांना
लसीकरण केले आहे. देशात सर्वाधिक लसीकरण करून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर सातत्य
राखून आहे.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना कोरोना विषाणूची लागण
झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती ठीक असल्याची माहिती सूत्रांनी दिली
आहे.
****
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान आज सकाळी सात वाजता
सुरु झालं. पाच जिल्ह्यातल्या ४४ मतदार मतदारसंघांसाठी हे मतदान होत आहे.
****
राज्य लोकसेवा आयोग - एमपीएससीची उद्या रविवारी होणारी, दुय्यम सेवा अराजपत्रित
गट ब संवर्गाची, संयुक्त पूर्व परीक्षा, तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत, हा निर्णय घेण्यात आला.
****
प्राप्तीकर विभागाच्या मुंबईतल्या दोन निरीक्षकांना १५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं अटक केली. अटक केलेल्या दोघांना सी बी आय च्या विशेष
न्यायालयासमोर काल हजर करण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यात देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं काल
मुंबईत निधन झालं, ते ६३ वर्षांचे होते. अंतारपूरकर यांच्या निधनाबद्दल नांदेडचे पालकमंत्री
अशोक चव्हाण यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
सप्ताहांत टाळेबंदीच्या कालावधीत आज आणि उद्या औरंगाबाद शहरासह संपूर्ण जिल्ह्यात
संचारबंदी जारी राहणार असल्यानं अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणांसाठी नागरिकांना विनाकारण
बाहेर फिरता येणार नाही.
****
No comments:
Post a Comment