Monday, 12 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा.

****

देशात सध्या १२ लाखांहून अधिक कोरोना विषाणू संसर्गाचे सक्रीय रूग्ण आहेत. कोविड संसर्गातून रूग्ण बरे होण्याचा दर ८९ पूर्णांक ८६ शतांश टक्के झाला आहे. देशात काल ११ लाख ८० हजाराहून अधिक कोविड नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

दरम्यान, आतापर्यंत दहा कोटी ४५ लाखाहून अधिक लोकांना कोविड प्रतिबंधाचं लसीकरण झालं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

राज्यानं कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात विक्रमी नोंद करत काल एक कोटीचा टप्पा पार केला. लसीकरणात राज्य सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आतापर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली.

****

नाशिक शहरात रेमडेसिविर या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका डॉक्टरला काल पोलिसांनी ताब्यात घेतलं. डॉ.रवींद्र श्रीधर मूळक असं त्याचं नाव असून त्याने एका रुग्णाच्या नातेवाईकांना २५ हजार रुपयांना एक इंजेक्शन देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार केली. त्यानंतर पंचवटीतील अमृतधाम या परिसरात रात्री उशिरा या डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडे तीन इंजेक्शन्सचा साठा आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

राज्यात १५ दिवसांची टाळेबंदी तातडीनं लावली जाणार नाही, आधी त्यासाठीचं संपूर्ण नियोजन केलं जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ते काल जालना इथं बातमीदारांशी बोलत होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांशी चर्चा केली आहे. मात्र निर्णय झाला तरी, टाळेबंदी लागल्यावर उद्योजकांनी आपल्या कामगारांची काळजी घ्यावी, तसंच बाहेरच्या राज्यातून आलेल्या कामगारांनी घाबरू नये, आपल्या गावी जायची घाई करू नये असं आवाहनही टोपे यांनी केलं.

****

लसीकरण वाढवण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती आपण पंतप्रधानांना परत एकदा करणार असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल आहे. ते काल कृती दलासोबतच्या झालेल्या बैठकीत बोलत होते. कोविड प्रतिबंधासाठी निर्बंध लावल्यावर राज्यात, ऑक्सिजन प्लांट उभारणी, रुग्णखाटा तसंच इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणं, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणं, लसीकरण वाढवणं, विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणं यादृष्टीने तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

****

राज्यात रेमडीसीवीरचा पुरवठा सुरळीत होण्याकरता जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी काल बुलढाणा इथं दिली. कोरोना संसर्गाबाबत झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

****

सातारा जिल्ह्यात बावधनमध्ये बगाड यात्रेत सहभागी झालेल्या लोकांपैकी ६१ जण कोरोना विषाणू बाधित आढळले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बावधनच्या या बगाड यात्रेवर प्रशासनानं बंदी घातली होती. ही बंदी झुगारुन आणि सामाजिक अंतराचे नियम धाब्यावर बसवून हजारोंच्या संख्येनं लोक या यात्रेत सहभागी झाले होते. या प्रकरणी ८३ जणांविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान झालेल्या गर्दीप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात अडीच हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

****

पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार पास्कल धनारे यांचा काल रात्री कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला. धनारे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून गुजरात मधल्या वापी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तेथे उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

****

मुंबईत वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे यांचं कोरोना विषाणू संसर्गामुळे निधन झालं आहे. ते ५४ वर्षांचे होते. बाधित आढळल्यानंतर त्यांना बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरु असतानाच आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत १०१ पोलिस कर्मचाऱ्यांचं निधन झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २५ तारखेला आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा ७६ वा भाग असेल. यासाठी जनतेला आपली मतं आणि सूचना नमो ॲप अथवा माय जीओव्ही वर आपली मांडता येतील.

****

मराठवाड्यात पुढचे चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विभागातल्या सर्वच जिल्ह्यांत खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...