Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 April 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ एप्रिल
२०२१ दुपारी १.०० वा.
****
राज्यात
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, अनेक जिल्हा प्रशासनांनी निर्बंध अधिक कडक केले
आहेत.
परभणी
जिल्ह्यात पूर्ण टाळेबंदीला आजपासून सुरूवात झाली. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी
जारी केलेल्या आदेशानुसार सर्व बॅंका, किराणा सामान दुकानं, भाजी बाजार, फळ विक्रेते,
बेकरी, मिठाई, खाद्य वस्तुंसह सर्व प्रकारची दुकानं, येत्या २२ तारखेपर्यंत पूर्णपणे
बंद राहणार आहेत.
उस्मानाबाद
जिल्ह्यात कोविड निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा आता
दुपारी दोन वाजेपर्यंतच सुरु राहतील. नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्यानं,
हा निर्णय घेतल्याचं, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितलं. नागरिकांनी निर्बंधांचं
पालन करून, प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
बीड
जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात आज आणि उद्या रुग्णालय तसंच औषधी दुकानं वगळता प्रकारची
दुकानं बंद राहणार आहेत.
रत्नागिरी
जिल्हा प्रशासनानंही अत्यावश्यक सेवेवर कालपासून बंधनं आणली आहेत. जिल्ह्यात सर्व किराणा
दुकानं बंद करून घरपोच सेवा सुरू केली जाणार आहे. औषधांच्या दुकानात कर्मचाऱ्यांची
कोविड चाचणी करावी लागणार आहे, दुकानं उघडी दिसल्यास कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला
आहे.
नाशिक
मध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची जागेवरच अँटिजेंन चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा
प्रशासनानं घेतला आहे.
औरंगाबाद
इथंही विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोविड अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. यासाठी
आरोग्य विभागाची १२ फिरती पथकं तैनात करण्यात आली आहेत.
****
पंढरपूर
- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत
१९ पूर्णांक ३३ टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोविड
महामारीच्या पार्श्वभूमीवर हरीद्वार इथं सुरु असलेला कुंभमेळा प्रतिकात्मक स्वरुपातच
व्हावा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज आचार्य महामंडलेश्वर
स्वामी अधवेशानंद गिरी यांच्याशी संवाद साधून, कुंभमेळ्याची स्थिती जाणून घेतली. पंतप्रधानांसोबत
झालेल्या चर्चेनंतर स्वामी अधवेशानंद गिरी यांनी लोकांना कुंभमेळ्यात न येण्याचं आणि
कोविड प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.
****
दरम्यान,
पंतप्रधानांनी काल १२ राज्यातल्या ऑक्सिजन पुरवठ्याचा आणि उपलब्ध साठ्याचा आढावा घेतला.
देशात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आणि योग्य प्रमाणात करण्यासाठी केंद्र सरकारची मंत्रालयं
आणि विविध राज्य सरकारं यांच्यात समन्वय आवश्यक आहे, असं ते म्हणाले. वैद्यकीय वापरासाठीच्या
ऑक्सिजनचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
वैद्यकीय
वापरासाठीच्या द्रवरूप ऑक्सिजन कंटेनर ट्रकची वाहतूक करण्यास रेल्वे मंत्रालयानं तत्त्वतः
मंजुरी दिली आहे. कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानं द्रवरूप ऑक्सिजनचा
पुरवठा करण्याबाबत महाराष्ट्र सरकारनं केलेल्या मागणीनंतर रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय
घेतला आहे.
****
कोरोना
विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार
सज्ज असल्याची ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी दिली आहे. कोरोनाबाधितांची
संख्या वाढत असली तरी वैद्यकीय ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरचा तुटवडा नाही तसंच सरकार
आरोग्यविषयक सोयी सुविधांमधे सातत्यानं वाढ करत आहे, असं त्यांनी काल सांगितलं. कोविडचा
प्रसार वेगानं होत असलेल्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांबरोबर आज हर्षवर्धन चर्चा करणार
आहेत.
****
देशात
आतापर्यंत ११ कोटी ९९ लाख ३७ हजार ६४१ जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.
दरम्यान,
देशात काल नव्या दोन लाख ३४ हजार ६९२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर
एक हजार ३४१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची
संख्या एक कोटी ४५ लाख २६ हजार ६०९ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ७५ हजार
६४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल एक लाख २३ हजार ३५४ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत
एक कोटी २६ लाख ७१ हजार २२० रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या १६ लाख ७९
हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
राज्यात
'एक देश एक शिधापत्रिका' योजनेचीही प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. राज्यात दरमहा सात
लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीचा वापर करुन धान्याचं वाटप केलं जातं.
शिधापत्रिकांवरील १२ अंकी क्रमांकाचा वापर करुन लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरणाद्वारे
धान्य वितरित केलं जातं. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ९४ लाख ५६ हजार शिधापत्रिकाधारकांनी
जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेद्वारे धान्याचा लाभ घेतल्याचं, याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्याच्या कळंब इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयातला वरीष्ठ लिपिक अमृत बंडगर याला
दहा हजार रुपये लाच घेताना काल अटक करण्यात आली. जमिनीचं खरेदी खत करुन देण्यासाठी
त्यानं तक्रारदाराकडून ही लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment