Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 April 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ एप्रिल
२०२१ दुपारी १.०० वा.
देशातल्या
कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज
एक बैठक होणार आहे. आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
यासंदर्भात गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी, कोविड महामारीची दुसरी
लाट थोपवण्यासाठी अधिक सावधानता बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
****
कोविडचा
प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना सर्वतोपरी मदत करत असून, रेल्वेगाड्यांच्या
माध्यमातून ऑक्सिजन सिलिंडर आणि टँकर्सचा पुरवठा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला
असल्याचं, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या
मुलाखतीत ते बोलत होते. ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची जलदगतीनं वाहतूक करण्यासाठी
आणि राज्यांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी, ग्रीन कॉरीडॉर बनवण्यात येत
असल्याचं गोयल यांनी सांगितलं.
****
दरम्यान,
नंदुरबार इथं विलगीकरण रेल्वे डब्यांचं काम सुरु झालं असून, त्यामध्ये कोविड रुग्ण
देखील दाखल झाले आहेत, अशी माहिती गोयल यांनी काल दिली. सध्या रेल्वेकडे १६ विभागात
चार हजार कोच, कोविड रुग्णांसाठी तयार आहेत. राज्य सरकारांच्या मागणीनुसार ते उपलब्ध
करून दिले जातील. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यांची उपलब्ध वैद्यकीय
यंत्रणा अपुरी पडल्यावरच, हे रेल्वे कोच वापरता येतात, असं त्यांनी सांगितलं.
****
देशात
आतापर्यंत १२ कोटी ३८ लाख ५२ हजार ५६६ नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं.
दरम्यान,
देशात काल नव्या दोन लाख ७३ हजार ८१० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर
एक हजार ६१९ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या
एक कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ७८ हजार ७६९
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल एक लाख ४४ हजार १७८ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत
एक कोटी २९ लाख ५३ हजार ८२१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या १९ लाख २९
हजार ३२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
प्रसिद्ध
दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं, त्या ७८ वर्षांच्या होत्या.
झोपडपट्टीतल्या महिलांचं आयुष्य दाखवणारा, १९८५ सालचा ‘बाई’ हा सुमित्रा यांचा पहिला
लघुपट, हा त्यांच्या स्त्रीवाणी या शोधप्रकल्पाचा भाग होता. या चित्रपटाला राष्ट्रीय
पुरस्कारही मिळाला. त्यांचा पुढचा लघुपट ‘पाणी’ यालाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित
करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी मुक्ती, चाकोरी, लहा, थ्री फेसेस ऑफ टुमारो असे
लघुपट बनवले. सुमित्रा यांना त्यांच्या योगदानाबद्दल, चित्र रत्न पुरस्कार आणि कामधेनू
पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं.
सुमित्रा
भावे यांनी सामाजिक कार्यकर्ती आणि संवेदनशील दिग्दर्शिका म्हणून केलेलं काम, या दोन्ही
क्षेत्रासाठी यापुढेही मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी,
भावे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
उस्मानाबाद
इथल्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त सत्यनारायण दंडनाईक यांचं आज निधन
झालं, ते ८१ वर्षांचे होते. त्यांनी उस्मानाबाद तालुक्यातल्या तेरणा शेतकरी सहकारी
साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम केलं होतं. तसंच राज्य निवड मंडळाचे सदस्य म्हणूनही
ते काही काळ कार्यरत होते. धाराशिव कुकुट पालन संस्थेचे ते मुख्य प्रवर्तक होते.
****
हरिद्वार
इथं कुंभमेळ्यासाठी जाऊन आलेल्या साधू महंताना चौदा दिवस गृह विलगीकरणात ठेवावं, यासाठी
त्रंबकेश्वर नगरपालिकेनं दहा आखड्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्रंबकेश्वर इथे दहा
शैव आखाडे आणि अनेक आश्रम असून, त्यातील अनेक साधू महंत हरिद्वारला कुंभ मेळ्यासाठी
गेले होते. गृह विलगीकरणात असताना रस्त्यावर फिरताना आढळल्यास साधू महंतांवर कारवाई
करण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनानं दिला आहे.
****
उस्मानाबाद
शहरात मोहल्ला क्लिनिक क्रमांक एक चं काल आमदार कैलास पाटील, तसंच नगराध्यक्ष मकरंद
राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं. कोविडची मागची लाट थोपवण्यासाठी
मोहल्ला क्लिनिकचं मोठं सहकार्य लाभलं होतं, यावेळेस ही नागरिकांचं सहकार्य मिळेल आणि
दुसरी लाट शमवण्यास मदत मिळेल, असा विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
****
औरंगाबाद
इथल्या मध्यवर्ती बसस्थानकातून पुढचा काही काळ नियोजित वेळापत्रकानुसार बस सुटणार नाहीत.
या स्थानकावरून जळगाव, भुसावळ, अहमदनगर, नाशिक, पुणे, धुळे, शिरपूर, अकोला, बुलडाण्यासह
औरंगाबाद जिल्हांतर्गत बस सेवा सुरू असते. सध्या प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे या
मार्गांवर जाणाऱ्या बस, आता किमान २० ते २५ प्रवासी जमा झाल्याशिवाय सुटणार नाहीत,
असं आगारप्रमुख सुनील शिंदे यांनी कळवलं आहे.
****
कजाकिस्तानमध्ये
अलमाटी इथं झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियानं रौप्य पदक पटकावलं.
८६ किलो वजनी गटात दीपकनं इरानच्या हसन यजदानी चाराती याचा पराभव केला. पुरुषांच्या
फ्रीस्टाइल प्रकारात भारतानं सात पदकं जिंकली.
****
No comments:
Post a Comment