Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 June 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात ३० वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत
आहे. सर्वांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू
संसर्गाचा धोका अद्याप संपलेला
नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण
काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** कोविड साथीशी लढताना योग हा एक
आशेचा किरण - पंतप्रधान नरेंद्र
मोदी
** जगातल्या अनेक
भाषांमध्ये योग प्रशिक्षणाचे अनेक व्हिडीओ असलेले एम योग अॅप सुरू करण्याची घोषणा
** इतर
मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य
संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत- मंत्री विजय वडेट्टीवार यांची भूमिका
** मराठा समाज आरक्षण प्रश्नी सकल मराठा समाजाच नाशिक शहरात दुसरं
मौन आंदोलन
आणि
** औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात आज प्रत्येकी तीन कोविड
बाधितांचा मृत्यू, बीड जिल्ह्यात १२४ नवे बाधित
****
सगळं जग कोविड साथीशी लढत असताना योग हा एक आशेचा किरण राहिला आहे, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त
जनतेला संबोधित करत होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे गेली दोन वर्षे योगदिनाचे मोठे समारंभ
आयोजित केले गेले नसले, तरी योगाबाबतचा उत्साह कमी झालेला नाही, कोविड १९शी आपण
लढू शकतो, हा विश्वास योगानं दिला असल्याचं ते म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाचा सामना करण्यासाठी कुणीही मानसिक दृष्ट्या तयार नसतांना
योग हे आत्मविश्वासाचं माध्यम ठरलं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. लोकांच्या आरोग्याची काळजी
घेण्यामधे योग प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहक भूमिका यापुढंही बजावत राहील, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.
पंतप्रधानांनी यावेळी एम योग अॅप सुरू करण्याची घोषणा केली.
या ॲपमधे जगातल्या अनेक भाषांमध्ये योग प्रशिक्षणाचे अनेक व्हिडीओ उपलब्ध असून, त्याद्वारे
भारताचा ‘एक विश्व- एक आरोग्य’ हा विचार पुढं नेता येईल, असं मोदी म्हणाले.
****
औरंगाबाद इथं महानगरपालिकेच्या मुख्यालयात जागतिक योग
दिनानिमित्त योग शिबीर घेण्यात आलं. सकाळी ७ ते ८ या वेळेत पतंजली योग समितीच्या
सदस्यांनी उपस्थितांना योगा बद्दल
प्रशिक्षण दिलं.
लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं क्रीडा संकुलमधील बॅडमिंटन हॉलमध्ये
आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या योग दिनाच्या कार्यक्रमाला फेसबुक
लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथं जिल्हा परिषद शाळेच्या
मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं योग शिबीर घेण्यात आलं. जालना, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही
आज योग दिनाचे विविध कार्यक्रम पार पडले.
****
इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही
तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका आपण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडली असल्याची माहिती
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसंच बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार
यांनी दिली आहे. नागपूर इथं आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ओबीसी समाजाच्या समस्यांवर
मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय नेते, खासदार, आमदार, तसंच संघटना यांची चिंतन बैठक आयोजित करण्यात येणार असून
या बैठकीच्या माध्यमातून ओबीसींच्या प्रश्नाला कुठलाही पक्षीय रंग न
देता तोडगा काढण्यात येईल असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. महाविकास आघाडीला कोणताच
धोका नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार काम करत राहील
असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासह अन्य मागण्यांसाठी आज
सकल मराठा समाजानं नाशिक शहरात खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली दुसरं मौन
आंदोलन केलं. सर्वोच्च न्यायालयातील पुनर्विलोकन याचिकेसह अन्य
मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे, मात्र राज्य सरकारच्या अखत्यारीतील मागण्या त्यांनी
सोडवल्या पाहिजेत असं संभाजी राजे म्हणाले. जिल्ह्यातील अनेक
राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मराठा
समाजाचं आरक्षण अडचणीत आलं, तसंच ओबीसींचं राजकीय आरक्षणही संपलं, त्यामुळे आता
न्यायालयीन लढ्यासाठी केंद्र शासनानं, स्पष्ट भूमिका घेऊन साथ दिली पाहिजे, असं भुजबळ
म्हणाले. मराठा आरक्षणासाठी विधी मंडळाच्या अधिवेशनात आपलं पूर्ण सहकार्य राहील
असं विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. तर राज्य शासनाच्या
अखत्यारीत असलेल्या मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकार लवकरच दिलासा देईल असं
कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं.
दरम्यान, ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णया विरोधात
उद्या औरंगाबाद इथं महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आक्रोश आंदोलन करण्यात
येणार आहे. ज्यांच्यासाठी हे आंदोलन आहे असे आजी माजी ओबीसी सरपंच, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती
सदस्य यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन या परिषदेनं केलं आहे.
****
आज जागतिक संगीत दिवस. जगभरातल्या १२० देशांमध्ये आज हा
दिवस साजरा केला जातो. सर्वप्रथम फ्रान्स मध्ये १९८२ मध्ये संगीत दिन साजरा
करण्यात आला होता. रस्त्या रस्त्यांवर तसंच उद्यानांसारख्या खुल्या जागांवर
नि:शुल्क संगीताच्या कार्यक्रमांचं आयोजन हा यामागचा मुख्य उद्देश होता.
जगभरातल्या संगीत प्रेमींसाठी हा एक विशेष दिवस असून संगीतकार, गीतकार, आणि गायकांना
सन्मानित करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो.
****
मुंबईचा कोरोना विषाणू
संसर्गाचा बाधित रुग्णदर ३ पूर्णांक ७९ टक्के तर
ऑक्सिजन खाटा व्याप्तीचा दर २३ पूर्णांक ५६ टक्के इतका आहे. या निकषानुसार मुंबई सध्या
पहिल्या गटात आहे. मात्र मुंबईतलं लोकसंख्येच्या घनतेचं प्रमाण, भौगोलिक रचना, उपनगरातून मुंबईत
लोकलनं दाटीवाटीनं प्रवास करुन दररोज मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि कृती दलानं
वर्तवलेल्या तिसऱ्या लाटेची शक्यता या कारणांमुळे मुंबईत येत्या २७ जूनपर्यंत तिसऱ्या गटातील निर्बंध
लागू राहणार आहेत. मुंबई महापालिकेनं परिपत्रकाद्वारे आज ही
माहिती दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन कोविड बाधितांचा शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय-रुग्णालय घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात कोविड
संसर्गानं आतापर्यंत तीन हजार ३९० रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण कोविड
बाधित रुग्णांची संख्या एक लाख ४५ हजार ४७६ झाली असून एक लाख ४१ हजार ७२ रुग्ण कोविडमुक्त
झाले आहेत.
****
जालना जिल्ह्यातही आज दिवसभरात तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार १३७ झाली
आहे. आज दिवसभरात जालन्यात २४ नवीन रुग्ण
आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार ३५ इतकी झाली असून, आजपर्यंत
जिल्ह्यातले ५९ हजार ६११ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या २८७
रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज १२४ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये
आष्टी २४, बीड २०, पाटोदा १८, केज १४, शिरुर १३, गेवराई १०, अंबाजोगाई आणि वडवणी प्रत्येकी
सात, धारुर सहा, माजलगाव चार आणि परळी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
इतर मागासवर्गीय- ओबीसींच्या
राजकीय आरक्षणासंदर्भात तातडीनं निर्णय घ्यावा, या मागणीसाठी ओबीसी समाज बांधवांच्या विविध सामाजिक
संघटनांच्यावतीनं आज परभणीत वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भवनासमोर
रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. यामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
यावेळी आंदोलनकर्त्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
यांच्यासह अन्य मंत्र्यांना मागण्यांचं निवेदन पाठवलं.
****
मराठवाड्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांविषयी मराठवाडा रेल्वे विकास
समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे
आंदोलन केलं. ओमप्रकाश वर्मा यांच्या विविध मागण्यासंदर्भात खासदार इम्तियाज जलील
यांनी यावेळी विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. परभणी - मनमाड रेल्वे मार्गाच्या
दुहेरीकरणाचे काम कालबद्ध पद्धतीनं लवकरात लवकर
पूर्ण करण्यात यावं, मुदखेड ते मनमाड विद्युतीकरणासह दुहेरीकरण, रोटेगाव ते
कोपरगाव हा २२ किलोमीटर रेल्वे मार्ग, औरंगाबाद - चाळीसगाव ८८ किमीच्या रेल्वे मार्गास मंजुरी द्यावी यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.
*********
No comments:
Post a Comment