Friday, 4 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर झालं असून, रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नाही. रेपो दर चार टक्के इतका, तर रिव्हर्स रेपो दर तीन पूर्णांक ३५ टक्के इतका कायम असल्याचं, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं. आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न सात पूर्णांक तीन टक्के राहणार असल्याचं दास यांनी सांगितलं. मात्र मान्सूनच्या आगमनामुळे देशाच्या आर्थिक उत्पन्नात येत्या काळात वाढ होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. जागतिक बाजाराला चालना मिळाल्यास देशाच्या निर्यातीतही सुधारणा होईल, अशी आशा दास यांनी व्यक्त केली.

****

देशात आतापर्यंत २२ कोटी ४१ लाखाहून अधिक नागरिकांचं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलं. काल दिवसभरात २८ लाख ७५ हजार नागरिकांना लस टोचण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****

देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असून, तो ९३ पूर्णांक शून्य आठ टक्के इतका झाला आहे. काल दोन लाख सात हजार ७१ अधिक रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत दोन कोटी ६५ लाख ९७ हजार ६६५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. तर काल नव्या एक लाख ३२ हजार बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दोन हजार ७१३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या दोन कोटी ८५ लाख ७४ हजार ३५० झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत तीन लाख ४० हजार ७०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १६ लाख ३५ हजार ९९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

राज्यात कृषी प्रक्रिया आणि मालाची विक्री, मूल्यसाखळीचं बळकटीकरण यासाठी विविध योजनांची सांगड घालण्यासाठी कृषि प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार असल्याचं कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी काल मुंबईत सांगितलं. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कृषी मालाचा महाराष्ट्र ब्रँड विकसित करण्यासाठी उत्पादन निहाय मानकं निश्चित करावी असं कृषीमंत्र्यांनी सांगितलं.

****

कांद्याचे भाव वाढल्यास देशातील नागरिकांना योग्य भावात कांदा उपलब्ध व्हावा या उद्देशानं केंद्र सरकारकडून कांदा स्थिरीकरण निधी अंतर्गत नाफेडमार्फत गेल्या पाच-सहा वर्षांपासून कांदा खरेदी केली जात आहे. मात्र नाफेडनं नेमलेल्या कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेनं काल लासलगाव बाजार समितीत नाफेड करता कांदा खरेदीची बोली लावल्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलावच बंद पाडले. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांसह बाजार समिती प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

****

पालघर जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची काल केंद्रीय पथकानं पाहणी केली. तौक्ते चक्रीवादळाचा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात तडाखा बसला असून मच्छीमारांचं, त्यांच्या बोटींचं, शेतीचं, घराचं, शाळांचं आणि इतर ही वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हे पथक लवकरात लवकर आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे.

****

मराठा आरक्षण रद्द होण्यास अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमिती कमी पडल्याचा आरोप भाजपचे माजी मंत्री अशिष शेलार यांनी केला आहे. ते काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणाविषयीच्या अनेक प्रश्नांची चव्हाण यांना उत्तरे द्यावी, असं शेलार म्हणाले.

****

मुंबईच्या जोगेश्वरीच्या ओशिवरा इथल्या रहिवाशी इमारतीला आज सकाळी आग लागली. अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणली असून, आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

****

राज्यातल्या कोविड रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या प्राणवायू नलिका आणि प्रणाली तपासून त्याबाबत त्रुटी आढळू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात ५९ शासकीय आणि खाजगी कोविड रुग्णालयातल्या प्राणवायु नलिका आणि यंत्रणेची तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड इथल्या शासकिय तंत्रनिकेतनकडे या तपासणीची जबाबदारी दिली होती.

****

कोरोना संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करताना प्राणवायुची कमतरता भासू नये, म्हणून राज्य शासनाने ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजना जाहीर केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी नाशिक विभागातून आत्तापर्यंत १४ उद्योजकांनी अनुकूलता दर्शवली आहे. हे प्रकल्प साकारल्यास १५० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. शासनाच्या योजनेत ऑक्सिजन उत्पादन करु इच्छिणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहनपर सवलत योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

****

नांदेड शहरात आज सकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नवा मोंढा भागात विक्रीसाठी आलेल्या हळदीचं मोठं नुकसान झालं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने गोदाम उपलब्ध करून दिली नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागत असल्याचा आरोप, शिवसेनेचे नेते प्रल्हाद इंगोले यांनी केला आहे.

परभणी शहरासह पूर्णा, जिंतूर आदी भागातही आज पाऊस झाला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...