Monday, 21 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात आजपासून १८ वर्षावरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्याची मोहीम राबवण्याची सरकारनं तयारी केली आहे. सर्व तरुण श्रोत्यांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले, तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना उत्साहात सुरूवात; प्रत्येक देश, प्रत्येक समाज आणि प्रत्येक व्यक्ती आरोग्य संपन्न व्हावा - पंतप्रधानांची कामना.

·      १८ वर्षावरील सर्वांना मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्याची देशव्यापी मोहीम आजपासून सुरू.

·      काँग्रेसनं जरी स्वबळावर निवडणूक लढवली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवेल - प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण.

·      राज्यात नऊ हजार ३६१ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात १९ जणांचा मृत्यू तर ४०८ बाधित.

·      औरंगाबादचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांची मराठा आरक्षणाशी संबंधित निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल.

आणि

·      जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या परिसरात कास पठाराच्या धर्तीवर, ‘झकास पठार’ पथदर्शी उपक्रम राबवण्यास सुरूवात.

****

देशभरात सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना आज सकाळी उत्साहात सुरूवात झाली आहे. या कार्यक्रमांना जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘उत्तम आरोग्यासाठी योग’ अशी यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे. योग दिनानिमित्त आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी, प्रत्येक देश, प्रत्येक समाज आणि प्रत्येक व्यक्ती आरोग्य संपन्न असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कोविड साथीच्या कठीण काळात योग आत्मशक्तीचं महत्वपूर्ण माध्यम बनलं असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –

मै जब फ्रंट लाईन वॉरियर्स से, डॉक्टर्स से बात करता हूं तो मुझे बताते हैं की कोरोना के खिलाफ लडाई में उन्होंने योग को भी अपना सुरक्षा कवच बनाया है। डॉक्टरों ने योग से खुद को भी मजबूत किया और अपने मरिजों को जल्दी स्वस्थ करने में इसका उपयोग भी किया। और आज अस्पतालों से ऐसी कितनी तस्वीरे आती है जहां डॉक्टर्स, नर्सेस मरीजों को योग सिखा रहे हैं, तो कहीं मरीज अपना अनुभव साझा कर रहे हैं। प्राणायम, अनुलोम-विलोम जैसे ब्रिदिंग एक्सरसाईजेस हमारे रेस्पायरेटरी सिस्टीम को कितनी ताकत मिलती है ये भी दुनिया के विशेषज्ञ खुद बता रहे है। 

 

केंद्रीय क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांनी योग दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

देशभरातली विद्यापीठ आणि अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्येही योग दिनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ‘योग-एक भारतीय वारसा’ या अभियानांतर्गत देशभरातील एकूण ७५ सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी योगाभ्यास आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. यार्तंगत औरंगाबाद नजिकच्या वेरूळ लेणीमध्येही काही वेळापूर्वी कार्यक्रमास सुरूवात झाली. राज्यात पुण्याचा आगा खान पॅलेस, मुंबई नजिकची कान्हेरी लेणी आणि नेहरू विज्ञान केंद्र, तसंच नागपूर इथं जुन्या उच्च न्यायालयाच्या इमारतीतही अशाच प्रकारचे कार्यक्रम होत आहेत.

जागतिक योग दिनानिमित्त आज भारतीय टपाल खात्याकडून टपाल तिकिटांवर विशेष रद्दीकरण शिक्का मारला जाणार आहे.

****

केंद्र सरकारच्या वतीनं १८ वर्षावरील सर्वांना मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्याची देशव्यापी मोहीम आजपासून सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच महिन्याच्या सात तारखेला याबाबत घोषणा केली होती. या लसीकरणासाठीची सर्व तयारी करण्यात आली असून, राज्यांच्या लस पुरवठ्यात वाढ केली जात आहे. या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारला १५ हजार कोटी रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे.

****

काँग्रेसनं जरी स्वबळावर निवडणूक लढवली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवेल, असं मत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सांगलीत एका कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलतांना पाटील यांनी, सध्या राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. निवडणुकांसंदर्भात जो काही निर्णय होईल, तो एकोप्याने घेतला जाईल, असं नमूद केलं.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी, आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाशी युती करावी अशी मागणी करणारं पत्र, पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेला त्रास थांबावा म्हणून ही युती करावी, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. याबरोबरच महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना पक्ष फोडत असल्याचा आरोपही, त्यांनी या पत्रात केला आहे.

****

हवामानावर आधारित पुनर्रचित फळ पीक विम्याचे निकष बदलून ते पूर्वीप्रमाणेच केल्याची माहिती, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. पिक विम्याच्या निकषांबाबत राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला असून, यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचं ते म्हणाले. केळी, संत्री, द्राक्षे, डाळींब, पेरू, सिताफळ आदी पिकांना हवानामावर आधारित पुनर्रचीत पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत पर्जन्यमान, वारा, आर्द्रता, तापमान आदी निकषांवर आधारित नुकसान भरपाईची तरतूद केली आहे.

****

नाशिक जिल्ह्यात, कोरोना काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या एका कोरोना योद्धयाचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या कुटुंबावर मोठा आघात झाला. पण केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण निधी योजनेअंतर्गत, ५० लाख रुपयांचं अर्थसहाय्य मिळाल्यानं हे कुटुंब सावरलं. याबाबत या कोरोना योद्धयाचा मुलगा राजेंद्र सुरेश आव्हाड यांनी आकाशवाणीला सांगितलं –

माझे वडील कै.सुरेश काशीनाथ आव्हाड हे नाशिक महानगर पालिका कचरा विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. कोविड काळात त्यांनी कोविड रुग्णांची सेवा करत असतांना त्यांना कोविड संसर्ग झाला. त्यात त्यांचे निधन झाले. केंद्र सरकार पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत आम्हाला पन्नास लाख रुपये विम्याचा लाभ भेटला असून त्यासाठी मी केंद्र सरकार आणि नाशिक महापालिका आयुक्त जाधव साहेब, सर्व अधिकारी यांनी आम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य केले. त्याबद्दल मी, माझे परिवार त्यांचे आभार मानतो.

****

राज्यात काल नऊ हजार ३६१ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५९ लाख ७२ हजार ७८१ झाली आहे. काल १९० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख १७ हजार ९६१ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९७ शतांश टक्के झाला आहे. काल ९ हजार १०१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५७ लाख १९ हजार ४५७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ७६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ३२ हजार २४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ४०८ कोविड बाधितांची नोंद झाली, तर १९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सात, बीड पाच, लातूर तीन, उस्मानाबाद दोन, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल १५५ रुग्ण आढळले. औरंगाबाद ९८, उस्मानाबाद ४६, लातूर ४२, नांदेड ३४, जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी १५, तर हिंगोली जिल्ह्यात चार नवे रुग्ण आढळून आले.

****

राज्यात रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा डेल्टा प्लस हा प्रकार आढळल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, अधिक नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूच्या नवीन डेल्टा प्लस प्रकाराला रोखण्याची ताकद भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सिन या लसीत आहे की नाही, याबद्दलचं संशोधन पुण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संस्थेत होणार आहे. संस्थेतील संशोधन विभाग प्रमुख डॉक्टर प्रज्ञा यादव यांनी काल ही माहिती दिली. भारत बायोटेकनं बनवलेली कोव्हॅक्सिन लस या नव्या विषाणूला रोखण्यास किती सक्षम आहे, हे या अभ्यासातून निष्पन्न होणार आहे. 

****

मराठा आरक्षण रद्द ठरवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशा मागणी करणारी याचिका, औरंगाबादचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. घटनेतील तरतुदीनुसार ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा भंग होत असल्यामुळे, न्यायालयानं हे आरक्षण रद्द ठरवलं होतं. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर पुनर्विचार करण्याची मागणीही, पाटील यांनी याचिकेत केली आहे. राज्य सरकारनं मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याआधीच पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.

****

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या सौंदर्यात भर पडावी, आणि पर्यटन व्यवसायाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी त्या परिसरात विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. सातारा जिल्ह्यातल्या कास पठाराच्या धर्तीवर, ‘झकास पठार’ हा पथदर्शी उपक्रम राबवण्यात येत आहे. महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी, अजिंठाच्या व्ह्यू पॉईंट वर विविध फुलझाडांचं बीजारोपण करुन, उपक्रमाचा प्रारंभ केला. रानफुलांची ७० प्रकारची बियाणी जमा करण्यात आली असून, एक हेक्टर जमिनीवर ती पेरली आहेत. येत्या ऑक्टोबर पर्यंत ती रुजून उगवतील अशी अपेक्षा आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी, झकास पठार ही संकल्पना मांडली आहे.

यावेळी राज्यमंत्री सत्तार यांनी अजिंठा डोंगर रांगांची व्ह्यू पॉईंट वरून पाहणी केली, तसंच अजिंठा डोंगर रांगेत किमान २५ लाख वृक्ष लागवड करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.

****

आंतरराष्ट्रीय योग दिनाची जनजागृती करण्यासाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत, काल सकाळी औरंगाबाद शहरात सायकल रॅली काढली. या रॅलीत सहभागी उत्कृष्ट सायकलपटूसाठीचा प्रथम पुरस्कार उमेश मारवाडी यांना, द्वितीय पुरस्कार अश्विनी जोशी आणि तृतीय पुरस्कार सोनम शर्मा या विजेत्यांना देण्यात आला.

****

योगासनं प्रशिक्षण सरावापुरती मर्यादित न ठेवता ती जीवनशैलीची भाग झाली पाहिजे, असं मत भारतीय योग संस्थानच्या औरंगाबाद आणि सोलापूरचे विभागीय प्रमुख डॉ. उत्तम काळवणे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादमध्ये काल त्यांना ‘क्रीडा भारती योग पुरस्कार २०२१’ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक मानसिंह पवार उपस्थितीत होते. औरंगाबाद शहरात २०१२ पासून भारतीय योग संस्थानच्या माध्यमातून योग, प्राणायम, ध्यान, मुद्राअभ्यास आणि शुद्धीक्रिया या क्षेत्राचा प्रचार-प्रसार केला जात आहे. या माध्यमातून आजवर २५० योगशिक्षक, ४० योग प्रशिक्षण केंद्र आणि तीस ते ३५ हजार विद्यार्थी घडवल्याचं त्यांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी तालुक्यात तेरखेडा इथं हिंदवी चौरे या नऊ वर्षाच्या मुलीनं, साडेपाच मिनिटांमध्ये ‘निरालांबा पूर्ण चक्रासन’ या योगासनाचे शंभर चक्रासन करून, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं आहे. अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून –

हिंदवीला लहानपणापासून योगाची तिच्या आईवडिलांकडून माहिती मिळाली. शाळेत तिला योगाचे धडे मिळाले. शाळास्तरीय स्पर्धेत तालुका आणि जिल्हा पातळीवर तिनं योगाच्या परिक्षेत योगाची कला आणि योगाचा सराव असल्यामुळे तिला चांगले गुण मिळाले. तिचं योगाचं पुस्तक वाचून निरालांबा पूर्ण चक्रासन या योगासनाविषयी माहिती मिळाली. त्याचा तिनं सराव केला. साडे पाच मिनिटांत निरालांबा पूर्ण चक्रासन या प्रकारची १०० चक्रासनं करून गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधे तिनं स्वतःच नाव कोरलं तर तिनं एशिया स्पर्धेपर्यंत मजल मारून भारतासाठी योग करण्याचा तसंच देशाचं योगाचं नेतृत्व करण्याचं ध्येय असल्याचं सांगितलं.

देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद

****

राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात वेळेत कागदपत्र सादर न केल्यानं इतर मागासवर्गीय - ओ.बी.सीं.चं राजकीय आरक्षण धोक्यात आलं आहे. याविरोधात २६ जून रोजी आंदोलन करणार असल्याचा इशारा, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला आहे. त्या काल पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या.

****

देशपातळीवर बंजारा समाजाची ओळख इतर मागास वर्गीय- ओ.बी.सी. म्हणूनच असल्यानं, ओबीसी आंदोलनात आम्ही सहभागी होणार असल्याचं, माजी मंत्री संजय राठोड यांनी जाहीर केलं आहे. ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते. मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या राठोड यांनी यावेळी बोलतांना, ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं पदोन्नती, भरती प्रक्रिया याबाबत ओबीसींवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी, सर्व ताकदीनं ओबीसी आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यात सध्या डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यात बाल रूग्णांचं प्रमाण जास्त असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जालना जिल्ह्यात अद्याप सर्वदूर दमदार पाऊस न झाल्यानं खरिपातल्या पेरण्या रखडल्या आहेत. एकूण प्रस्तावित क्षेत्राच्या केवळ १२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्यानं, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केलं आहे.

****

राज्यात येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची, तर मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

परभणी इथं जिंतूर मार्गावरच्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन काल आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते झालं. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कामाची स्थानिकांची मागणी होती.

****

No comments: