Tuesday, 22 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. सर्वांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले, तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्यात आजपासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण.

·      राज्यात सहा हजार २७० नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात २२ जणांचा मृत्यू तर ३४८ बाधित.

·      मराठा आरक्षण आंदोलन एक महिना पुढे ढकलण्याची खासदार संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा.

·      इतर मागासवर्गीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न घेण्याची मंत्री विजय वडेट्टीवार यांची मागणी.

·      राज्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा.

·      सुशिक्षीत बेरोजगार मुलांना नोकरीचं अमिष दाखवून करोडो रुपयांना लुबाडणाऱ्या टोळीला हिंगोली पोलिसांकडून अटक.

आणि

·      परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणात पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त.

****

राज्यात आजपासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली. कालपर्यंत राज्यात ३० ते ४४ वयोगटातल्या व्यक्तींचं लसीकरण करत होतो, लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे, त्यामुळे अठरा पासून पुढच्या सर्व वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाला मान्यता देण्यात आली असल्याचं ते म्हणाले. तरुणांनी लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व आरोग्य केंद्रांवर आजपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस घेता येणार आहे. शहरातल्या आरोग्य केंद्रावर टोकन पद्धतीनं हे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावर २०० लस उपलब्ध असणार आहेत. २०० टोकन झाल्यानंतर नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी करू नये, असं आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी केलं आहे.

****

लसीकरणाच्या वाढत्या गतीमुळे कोविड साथीवर जलद मात मिळवता येईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत देशभरातल्या २८ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. १८ वर्षांवरील नागरिकांनी पुढाकार घेऊन लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.  काल सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिल्ली इथं आपल्या मतदारसंघातलल्या नागरिकांसमवेत योगासनं केली. संपूर्ण आरोग्यासाठी योग आवश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले. चांगलं आरोग्य ही महत्वपूर्ण बाब असल्याचं कोविड या साथीनं दाखवून दिलं, असं त्यांनी नमूद केलं.

****

राज्यात काल सहा हजार २७० नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५९ लाख ७९ हजार ५१ झाली आहे. काल ९४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख १८ हजार ३१३ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. काल १३ हजार ७५८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५७ लाख ३३ हजार २१५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ८९ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख २४ हजार ३९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ३४८ कोविड बाधितांची नोंद झाली, तर २२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या पाच, औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी चार, जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी तीन, उस्मानाबाद दोन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात १२४ नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद ७६, औरंगाबाद ५४, नांदेड ३१, जालना २४, परभणी २१, लातूर १७, तर हिंगोली जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळून आला.

****

राज्यात कोरोना विषाणूच्या नव्या डेल्टा प्लस प्रकाराची लागण झालेले २१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील नऊ रुग्ण रत्नागिरी इथले, जळगाव सात, मुंबई दोन तर पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे सात हजार ५०० नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या रुग्णांची संपूर्ण माहिती घेण्यात येत असून, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य शासनाच्या वतीनं दाखल केल्या जाणाऱ्या पुनर्विलोकन याचिकेसह, अन्य प्रशासकीय बाबींच्या पूर्ततेसाठी, मराठा आरक्षण आंदोलन एक महिना पुढे ढकललं असल्याचं, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र या काळात राज्यभर दौरा करणार असून, महिनाभरात मागण्यांची पूर्तता न झाल्यास, पुन्हा राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. खासदार संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली काल सकाळी नाशिक मध्ये मौन आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

****

इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडली असल्याची माहिती, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसंच बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. नागपूर इथं काल ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ओबीसी समाजाच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी, सर्वपक्षीय नेते, खासदार, आमदार, तसंच संघटना, यांची चिंतन बैठक आयोजित करण्यात येणार असून, या बैठकीच्या माध्यमातून ओबीसींच्या प्रश्नाला कुठलाही पक्षीय रंग न देता तोडगा काढण्यात येईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. महाविकास आघाडीला कोणताच धोका नसून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार काम करत राहील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

राज्यात काल कोरोना प्रतिबंधक नियम पाळून योग दिन साजरा करण्यात आला. केंद्रीय सांस्कृतिक कामकाज मंत्रालयानं औरंगाबाद इथली वेरुळ लेणी, मुंबईतलं नेहरू विज्ञान केंद्र आणि कान्हेरी गुंफा, पुण्यात आगा खान पॅलेस, नागपुरातली उच्च न्यायालयाची जुनी इमारत याठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं होतं. मुंबईत राजभवनातही योग प्रात्यक्षिक कार्यक्रम झाला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सहभागी होत योगासनं केली.

औरंगाबाद महानगरपालिकेत योग शिबीर घेण्यात आलं. पतंजली योग समितीच्या सदस्यांनी उपस्थितांना योगाबद्दल प्रशिक्षण दिलं. लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं क्रीडा संकुलमधील बॅडमिंटन हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या योग दिनाच्या कार्यक्रमाला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथं जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं योग शिबीर घेण्यात आलं, तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसंच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्यानं ‘आंतरराष्ट्रीय योग’ दिन साजरा करण्यात आला.

उस्मानाबाद इथं पतंजली योग समिती, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं काल योग दिवस ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून साजरा करण्यात आला.

जालना, परभणी, हिंगोली, लातूर, आणि बीड जिल्ह्यातही काल योग दिनाचे विविध कार्यक्रम पार पडले.  

****

मराठवाड्यातल्या रेल्वेच्या विविध प्रश्नांविषयी मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी, काल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. ओमप्रकाश वर्मा यांच्या विविध मागण्यासंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. परभणी-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम कालबद्ध पद्धतीनं लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं, मुदखेड ते मनमाड विद्युतीकरणासह दुहेरीकरण, रोटेगाव ते कोपरगाव हा २२ किलोमीटर रेल्वे मार्ग, औरंगाबाद-चाळीसगाव ८८ किलोमीटरच्या रेल्वे मार्गास मंजुरी द्यावी, जालना - खामगाव रेल्वे मार्गाचं पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावं, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त औरंगाबाद ते सेवाग्रामपर्यंत विशेष रेल्वे सुरु करण्याच्या मागणीसह, अन्य मागण्या वर्मा यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.

****

राज्यातील इतर मागासवर्गीय - ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला सत्ताधारी आघाडी सरकार वाचवू शकलं नसल्याच्या निषेधार्थ, २६ जूनला भारतीय जनता पक्ष उस्मानाबाद जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करणार असल्याचं, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितलं. ते काल उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ५६ हजार ओबीसी आरक्षित जागांवर, आरक्षण रद्द झाल्याचा परिणाम झाला असल्याचं ते म्हणाले.

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही आघाडी सरकारच्या निष्क्रीय कारभारावर टीका केली.

****

नांदेड जिल्ह्यातून पंढरपूर इथं जाण्यासाठी, ११ सदस्यांच्या आषाढी पायी दिंडी वारीस परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी सेवा संघाच्या मंडळींनी जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांच्याकडे केली आहे. याविषयी माहिती देतांना रंगनाथ ताटे महाराज म्हणाले –

सोशल डिसटन्सींग पाळून कमी लोकांना आम्हाला वारकरी संप्रदायला पंढरपूरची पायी वारी घडावी अशी परवानगी द्यावी. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की आमचं आराध्य दैवत भगवान पंढरेश्वर महात्म्याचं मंदीर खुलं करावं आणि सगळ्या भाविकांना दर्शन मिळावं.

****

संपूर्ण देशातल्या सुशिक्षीत बेरोजगार मुलांना नोकरीचं अमिष दाखवून करोडो रुपये लुबाडणाऱ्या टोळीला नांदेड, हिंगोली, मुंबई, दिल्ली, लखनऊ इथून अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशात जौनपूर जिल्ह्यातल्या मच्छली इथल्या संतोष सरोज यानं हिंगोली इथल्या एका तरुणाकडून रेल्वेत नोकरी लावण्याचं आमिष दाखवून दहा लाख रुपये लुबाडल्याची तक्रार संबंधित तरुणाने दाखल केली होती. अशा प्रकारे या आरोपीसह त्याच्या साथीदारांनी अनेक तरुणांना फसवल्याचं तपासात समोर आलं. नांदेड शहरातल्या रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून यापैकी तीन आरोपींना पकडण्यात आलं. या गुन्ह्याची व्याप्ती देशभर असून अन्य कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी वसमत शहर पोलिस ठाणे किंवा स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीशी संपर्क करण्याचं आवाहन हिंगोली पोलीस अधीक्षकांनी केलं आहे.

****

परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणात पुण्याचे बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले, तसंच त्यांच्या कुटुंबियांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली आहे. परकीय चलन व्यवहार प्रकरणात भोसले यांच्याकडून नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं, ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीत समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यांची २०१७ पासून चौकशी सुरु होती.

****

औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव इथं पोलिसांच्या नाकाबंदीत, पिकअप जीपमध्ये एक लाख २५ हजार रुपये किमतीचं, ५० किलो वजनाचं चंदनाचं लाकूड घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. गौसखाँ गफूरखाँ पठाण आणि जकीरखाँ अब्दुलखाँ पठाण अशी आरोपींची नावं आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासात ४४ ठिकाणी नाकाबंदी करुन, १९७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती, पोलिस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, जुन्या बंधाऱ्यांच्या दुरूस्तीची कामं एकाच वेळी हाती घेण्यात येतील, आणि यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समिती तसंच राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येईल, असं पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी काल सांगितलं. नियोजन भवन इमारतीचं उद्घाटन करताना काल ते बोलत होते. जिल्ह्यातील सध्याच्या प्राप्त निधीतून ६७ कोल्हापुरी बंधारे आणि १०९ लघु पाटबंधाऱ्यांच्या दुरूस्तीच्या कामांना मंजुरी दिली आहे. या कामांसाठी १०० ते १२५ कोटी रुपयांची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

इतर मागासवर्गीय - ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात तातडीनं निर्णय घ्यावा, या मागणीसाठी ओबीसी समाज बांधवांच्या विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं, काल परभणीत वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भवनासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. यामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

यावेळी आंदोलनकर्त्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्र्यांना मागण्यांचं निवेदन पाठवलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या आदिवासी तालुक्यात आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या उद्देशानं, आदिवासी उपयोजनेंतर्गत किनवट तालुक्यातल्या जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामास, आणि माहूर तालुक्यातल्या इवळेश्वर इथं नवीन कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामास मंजुरी मिळाली असून, एकूण तीन कोटी १५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा नरसारेड्डी -सतपलवार यांनी काल ही माहिती दिली.

****

परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये राहणाऱ्या नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते या विविध विकास कामांचं भूमिपूजन काल करण्यात आलं. या कामांमध्ये पूल बांधणी, सिमेंट काँक्रीट रस्ते आ।णि नाल्याचं बांधकाम अशा कामांचा समावेश आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातल्या घोडज इथं कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत तंत्रज्ञान सप्ताहाचा काल आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. एक जुलैपर्यंत हा सप्ताह चालणार असून, याअंतर्गत शेतकऱ्यांना पिक विमा, निविष्ठा, औषध फवारणी, यासह विविध विषयांवर कृषीतज्ञांचं मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.

****

राज्यात मोसमी पावसानं सध्या विश्रांती घेतली असून, पुढील चार ते पाच दिवसात कोठेही जोरदार पावसाचा इशारा नाही. काही ठिकाणी हलका पाऊस होईल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे.

****

No comments: