Wednesday, 23 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. सर्वांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले, तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसांचं घेण्याचा निर्णय; विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीवर विरोधी पक्षाचा बहिष्कार.

·      डेल्टा प्लसचे रूग्ण आढळलेल्या महाराष्ट्रासह तीन राज्यांना तातडीनं उपाययोजना करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश.

·      ७५ वर्षांवरील नागरिक आणि अंथरुणाला खिळलेल्या विकलांगांना घरोघरी जाऊन लसीकरण्यासाठी कृती दल स्थापन.

·      राज्यात आठ हजार ४७० नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात १६ जणांचा मृत्यू तर ३६५ बाधित.

·      देशातल्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वातावरण सुधारण्यावर राष्ट्र मंचच्या दिल्लीतील बैठकीत चर्चा.

·      कोरोना विषाणू संसर्गमुक्त गावात दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्याची शक्यता पडताळून पाहण्याचे मुख्यमंत्र्यांचे शिक्षण विभागाला निर्देश.

आणि

·      मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका केल्याची खासदार संभाजीराजे छत्रपती यांची माहिती, तर कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाजाचं चक्का जाम आंदोलन.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसांचं घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं, विधीमंडळ कामकाज मंत्री अनिल परब यांनी काल सांगितलं. पाच आणि सहा जुलैला हे अधिवेशन मुंबईत होईल. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या दोन दिवसीय अधिवेशनात प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी होणार नाहीत. फक्त पुरवणी मागण्या, तसंच विनियोजन विधेयकं आणि इतर महत्त्वाची विधेयकं चर्चेसाठी घेतली जाणार आहेत.

****

कोरोना विषाणू संसर्गाचं कारण देत राज्य सरकार अधिवेशन आणि राज्यासमोरच्या प्रश्नांपासून पळ काढत असल्याचा आरोप, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. सरकारनं केवळ दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा केली, त्याचा निषेध म्हणून आपण विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले –

राज्याचं अधिवेशनच होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न सरकारच्या वतीनं केला जातोय. एकीकडे हजारोच्या भीडमधे सरकारी पक्षाच्या कार्यालयांचं उद्घाटन होऊ शकतं, दुसरीकडे राज्यातल्या बारमधे कितीही लोकं गेले तरी चालू शकतं. पण राज्याच्या विधीमंडळामधे मात्र कोरोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचं नाही अशा प्रकारची सरकारची मानसिकता आहे. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन या ठिकाणी सरकारनी प्रस्तावित केलं आणि सरकारच्या या प्रस्तावाचा निषेध करून आम्ही बिझीनेस ॲडव्हायजरी कमिटीतनं बहिर्गमन केलेलं आहे.

****

डेल्टा प्लसचे रूग्ण आढळलेल्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि केरळ या तीन राज्यांना, केंद्र सरकारनं तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं, या तीनही राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. रुग्ण आढळलेल्या भागात निर्बंध किंवा आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास सांगण्यात आलं आहे. देशात सध्या डेल्टा प्लसचे एकूण २२ रुग्ण सापडले असून, यात १६ रूग्ण राज्यातले आहेत. ज्या ठिकाणी डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत, त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावं, गर्दी कमी करावी आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी करावा, व्यापक प्रमाणावर चाचण्या कराव्यात, रूग्णांचा शोध घेण्याचं काम वाढवावं, आणि जास्तीत जास्त लोकांना लसीकृत करावं, अशा सूचना आरोग्य मंत्रालयानं या तीन राज्यांना दिल्या आहेत.

****

७५ वर्षांवरील नागरीक आणि अंथरुणाला खिळलेल्या विकलांग नागरिकांचं घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत एक कृती दल स्थापन केल्याची माहिती राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात दिली. यासंदर्भात दाखल जनहित याचिकेवरच्या काल झालेल्या सुनावणी दरम्यान, राज्य सरकारनं घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास तयार असल्याचं सांगितलं. त्यासाठी येत्या आठवडाभरात निर्णय घेतला जाईल, असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, मुंबईत अलिकडेच उघडकीला आलेल्या बनावट लसीकरण मोहीमेसारखी प्रकरणं पुन्हा घडू नयेत, यासाठी तातडीनं धोरण आखण्याचे निर्देशही न्यायालयानं, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. बनावट लसीकरणासंदर्भात माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांची, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या पीठानं स्वतः दखल घेत, हे निर्देश दिले. लसीकरणासंदर्भात गृहनिर्माण संस्था, रुग्णालयं आणि नागरी स्वराज्य संस्थांमध्ये संवाद आणि समन्वय असायला हवा, असंही न्यायालयानं सूचवलं. या बनावट लसीकरण प्रकरणासंदर्भातल्या पोलीस तपासाचा प्रगती अहवाल, येत्या २४ जूनपर्यंत सादर करावा, असे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले.

****

राज्यात काल आठ हजार ४७० नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५९ लाख ८७ हजार ५२१ झाली आहे. काल १८८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख १८ हजार १४९ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. काल नऊ हजार ४३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५७ लाख ४२ हजार २५८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक नऊ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख २३ हजार ३४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ३६५ कोविड बाधितांची नोंद झाली, तर १६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या आठ, तर जालना, लातूर, नांदेड आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात १४७ रुग्ण आढळले. औरंगाबाद ७७, उस्मानाबाद ५०, लातूर ३३, परभणी २४, नांदेड १५, जालना १४, तर हिंगोली जिल्ह्यात पाच नवे रुग्ण आढळून आले.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेऊन गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षीही आषाढी वारीला पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश, सोलापूरचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. १७ ते २५ जुलै या काळात चंद्रभागा परिसरात, कलम १४४ लागू करण्यात येणार आहे, तसचं सोलापूर जिल्ह्यातही या काळात त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला या काळात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानी काल झालेल्या बैठकीत, देशातल्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वातावरण सुधारण्यामध्ये, राष्ट्र मंचच्या भूमिकेवर चर्चा झाल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार ॲडव्होकेट माजिद मेमन यांनी सांगितलं. जवळपास १५ विविध विरोधी पक्षांचे नेते या बैठकीत सहभागी झाले होते. ही राजकीय बैठक नव्हती, तसंच भारतीच जनता पक्षाच्या विरोधातील राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी पवार यांनी ती बोलावली नव्हती, ही बैठक राष्ट्र मंचचे प्रमुख यशवंत सिन्हा यांनी बोलावली होती, असा खुलासा मेनन यांनी केला. बैठकीला काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं. जे राष्ट्र मंचच्या विचारांशी सहमत आहेत, अशा सर्वांना बैठकीस बोलावलं होतं, यामध्ये कोणताही राजकीय मतभेत नव्हता, तसंच बैठकीत राजकीयदृष्ट्या कोणतीही मोठा घडामोड घडली नसल्याचं, मेमन म्हणाले.

****

ग्रामीण भागातील जी गावं मागील काही महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्ग मुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोना विषाणू संसर्ग मुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावात इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करता येतील का, याची शक्यता शिक्षण विभागानं तपासून पहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

मराठा आरक्षणासंदर्भातली पुनर्विचार याचिका राज्य सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल ही माहिती दिली. पुनर्विचार याचिका दाखल करताना राज्य सरकारने पूर्ण दक्षता घेतली आहे. कोणत्या आधारावर हे आरक्षण देण्यात आलं, यासंदर्भात या याचिकेत गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरित परिशिष्ट देखील भाषांतरीत करण्यात येतील, असं नमूद केलं असल्याचं, संभाजीराजे यांनी सांगितलं.

दरम्यान, कोल्हापूर इथं काल सकल मराठा समाजानं चक्का जाम आंदोलन केलं. मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन सरकारनं चार दिवसांत न दिल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

****

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला, सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या पीठानं, महाराष्ट्र सरकार, जिल्हा जातपडताळणी छाननी समिती आणि आनंदराव अडसूळ यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जून रोजी होणार आहे.

****

बीड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलिस दलासाठी खरेदी केलेल्या मोटारसायकल, जीप, अशा एकूण १६५ वाहनांचं काल पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण झालं. जिल्हा पोलीस दलानं येत्या काळात अधिक सक्षम आणि सतर्क राहून काम करावं, यासाठी लागणारी सर्व संसाधनं उपलब्ध करून देऊ, जिल्ह्यात गुन्हेगारीवर पोलिसांचा धाक निर्माण व्हावा, सर्वसामान्य जनतेला सुरक्षित असल्याची जाणीव निर्माण करणारं वातावरण तयार व्हावं, ही अपेक्षा यावेळी पालकमंत्री मुंडे यांनी व्यक्त केली.

बीड जिल्हा रूग्णालयास दहा अत्याधुनिक सुविधा असलेल्या रूग्णवाहिकाचं लोकार्पणही मुंडे यांच्या हस्ते काल झालं. जिल्ह्यात तिसरी लाट आलीच तर ऑक्सिजन बेडपासून सर्वोतोपरि तयारी झाली असल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले –

यामध्ये लहान मुलांचे अडीचशे ओ टू चे बेड केलेले आहेत. एकूण सर्वच तयारी जिल्हा प्रशासनाची याठिकाणी झालेली आहे. ॲम्बुलन्सची कमतरता होती, त्या ॲम्बुलन्सही आमच्या सरकारनं आज बीडला पाठवून दिलेल्या आहेत. म्हणजे एकूणच मॅनपॉवर पासून इतर सर्व ज्या काही गोष्टी अचानकपणे लाट आली तर जी काही काळजी घ्यायची ती सर्व काळजी जिल्हा प्रशासनानं घेतली आहे.

****

मराठवाड्यातल्या रेल्वेचा विकास करण्यासाठी, मध्य रेल्वे अंतर्गत औरंगाबादेमध्ये विभाग स्थापन करण्याची मागणी, मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी केली आहे. औरंगाबाद इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. दक्षिण मध्य रेल्वे मराठवाडा, विशेषत: औरंगाबाद - जालन्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप, त्यांनी यावेळी केला. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत मराठवाड्याला फक्त एकच लातूर रोड ते लातूर हा १८ किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग मिळाला असल्याचं ते म्हणाले.

****

इतर मागास प्रर्वग - ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी, औरंगाबाद शहरात काल ‘आक्रोश आंदोलन’ करण्यात आलं. अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीनं करण्यात आलेल्या या आंदोलनात, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. ओबीसींची पुन्हा जनगणना करण्यात यावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी यावेळी केली.

****

इतर मागासवर्गीय-ओ बी सी आरक्षण समितीच्या वतीनं काल उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी विविध मागण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आपल्या विविध मागण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. मात्र, आंदोलन सुरु होताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.

****

संस्कृत भारतीचे पूर्व प्रांताध्यक्ष, डॉक्टर लक्ष्मण काशिनाथ मोहरीर यांचं काल पुण्यात निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते आजारी होते. मोहरीर हे संस्कृतचे जाणकार, संत साहित्याचे अभ्यासक, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरीचे भाष्यकार तथा व्यासंगी प्रवचनकार होते. औरंगाबादच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयातून प्रपाठक पदावरून ते पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. संस्कृत कथा, संताची अभंगवाणी, वृक्ष दिंडी यासह विविध विषयांवरची, त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आधुनिक जीवनमूल्यांच्या संदर्भात संत तुकारामाच्या वांङमयाचा अभ्यास, या विषयावर त्यांनी १९९३ मध्ये मराठवाडा विद्यापीठातून पीएच डी हा पदवी संपादन केली होती. आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरुन त्यांचे अनेक कार्यक्रम प्रसारीत झाले आहेत.

****

औरंगाबादच्या विद्या प्राधिकरणाचे संचालक प्रा.डॉ.सुभाष कांबळे यांचं काल औरंगाबादमध्ये निधन झालं, ते ५५ वर्षांचे होते. गेल्या १५ मे पासून ते आजारी होते. जिल्हा प्रशिक्षण आणि शिक्षण संस्थेत प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत असताना डॉ. कांबळे यांनी शिक्षकांसाठी विविध उपक्रम राबवले.

****

गेल्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

येत्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

No comments: