Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑगस्ट २०२१ दुपारी १.०० वा.
****
राज्यात आज अनेक जिल्ह्यात
मुसळधार पाऊस सुरु आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी
मुसळधार पाऊस झाला. कन्नड तालुक्यात औट्रम घाटात तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यानं
वाहतूक ठप्प झाली आहे. कुणीही औट्रम घाटामधून प्रवास करू नये असं आवाहन वाहतूक पोलीसांनी
केलं आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक शिऊर बंगला, नांदगाव मार्गे वळवण्यात आली
आहे. तसंच दौलताबाद टी पॉईंट समोर बॅरिकेट लावून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कन्नड तालुक्यात पिशोर इथल्या
खडकी नदीला पूर आल्यानं या रस्त्याने मोठ्या संख्येने दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा
येण्या -जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पिंपरखेड नादर इथल्या नदीला पूर आला असून, पिशोरच्या
नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
जालना जिल्ह्यातल्या बहुतांश
भागात आज पहाटेपासून पाऊस सुरु आहे. घनसावंगी, अंबड तालुक्यात पावसाचा जोर अधिक असून,
या भागातल्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. घनसावंगी तालुक्यातल्या गोदावरी नदीवरील मंगरूळ
उच्च पातळी बंधारा शंभर टक्के भरल्यानं आज सकाळी बंधाऱ्याचे आठ दरवाजे उघडण्यात आले.
यातून ८० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर राजाटाकळी बांधाऱ्यातूनही
७० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपत्रात सोडण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यात काल रात्रभर
पाऊस सुरु होता. त्यामुळे जिल्ह्यातले नदी, नाले, ओढे, लघू-मध्यम प्रकल्प हे दुथडी
भरून वाहत आहेत. परळी, बीड, गेवराई आणि माजलगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला.
****
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम
उपनगरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईच्या
सखल भागात पाणी भरण्याची शक्यताही आहे. मात्र या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर किंवा रस्ते
वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. येत्या चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
तीन महिलांसह नऊ जणांनी आज
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त
न्यायमूर्ती अभय श्रीनीवास ओक आणि बी व्ही नागराथना, गुजरात उच्च न्यायालयाचे निवृत्त
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि बेला एम त्रिवेदी, सिक्कीम उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती
जितेंद्र कुमार माहेश्वरी, तेलंगणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हिमा कोहली,
केरळ उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सी टी रविकुमार, मद्रास उच्च न्यायालयाचे
निवृत्त न्यायमूर्ती एम एम सुंदरेश, आणि माजी अतिरिक्त महाधिवक्ता पी एस नरसिंह, यांना
सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
****
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
दुसर्या दिवशी आज दहीहांडी उत्सव साजरा केला जातो. मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर यंदाही दहीहांडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिलेली नाही.
या निर्णयाच्या निषेधार्थ आज मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या
वतीनं दहीहांडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात
दादर इथं दहीहांडी फोडण्यात आली. मलबार हिल, वरळी, भांडुप, मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी
दहीहंडी फोडली. निर्बंधांचं उल्लंघन करणार्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात
केली आहे.
****
शासनाच्या ब्रेक द चेनमध्ये
कोणत्याही प्रकारची शिथिलता नसून, त्यानुसार सर्वांनी पालन करावं, ध्वनी प्रदूषण होणार
नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केल्या
आहेत. गणेश उत्सवाच्या अनुषंगानं काल पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी यावेळी बोलताना, सर्वांना कोविड नियमांचं पालन
करूनच गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं.
****
हिंगोली जिल्ह्यात नांदेड
राष्ट्रीय महामार्गावर ट्रक मध्ये टँकर ठेवून बायोडिझेलची खुलेआम विक्री करणाऱ्या साठ्यावर
बाळापुर पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी रोख रकमेसह साठ लाखाचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला आहे. आखाडा बाळापुर पोलीस ठाणे हद्दीत भाटेगाव शिवारातल्या कॅनल जवळ
एका धाब्यासमोर बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा सुरू होता. याठिकाणाहून दोन जणांना ताब्यात
घेण्यात आलं असून, दोन जण फरार आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड
आणि सोयगाव तालुक्यात येत्या दोन आणि तीन सप्टेंबर रोजी महालसीकरण अभियानाच्या माध्यमातून,
नागरिकांना मोफत लस देण्यात येणार आहे. या परिसरातल्या नागरिकांनी अभियानाचा लाभ घेण्याचं
आवाहन, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे.
****
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत
नेमबाजीत भारताच्या सिंघराज अधाना याने पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात
कांस्य पदक जिंकलं. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत आठ पदकं जिंकली आहेत.
****
No comments:
Post a Comment