Tuesday, 31 August 2021

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

औरंगाबाद जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. कन्नड तालुक्यात औट्रम घाटात तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. कुणीही औट्रम घाटामधून प्रवास करू नये असं आवाहन वाहतूक पोलीसांनी केलं आहे. कन्नड घाट बंद पडल्यामुळे औरंगाबाद मार्गे जाणाऱ्यांनी जळगावकडून, तर औरंगाबादकडे येणाऱ्यांनी नांदगावमार्गे येण्याचं आवाहन, महामार्ग सुरक्षा पथकानं केलं आहे.

कन्नड तालुक्यात पिशोर इथल्या खडकी नदीला पूर आल्यानं या रस्त्याने मोठ्या संख्येने दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. नागद परिसरातून मोठ्या प्रमाणात पशुधन वाहून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली आहे.

जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदी, उपनद्यांना आणि नाल्यांना मोठा पूर आला आहे.

****

केंद़ीय मंत्री नारायण राणे यांना काल महाड न्यायालयाच्या आदेशानुसार अलिबाग पोलिस ठाण्यात हजर व्हायचं होतं, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण उपस्थित राहू शकत नसल्याचं पत्र राणे यांच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे सादर केलं.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र संघाचे राज्य उपाध्यक्ष आणि संघाच्या स्थापनेपासूनचे विश्वस्त संतु पुंजा आढाव, यांचं काल अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथं निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या अनेक, राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांसमवेत ते दलित, उपेक्षित जणांच्या कल्याणार्थ प्रयत्नरत राहिले.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या बाबुर्डी घुमट गावामध्ये राहुरी कृषी विद्यापीठ आणि खाजगी भागीदारीतून स्वंयचलीत हवामान केंद्र बसवण्यात आलं आहे. फुले इरीगेशन शेड्युलर अॅप आणि ऑटोमॅटीक पंप कंन्ट्रोलर शेतकऱ्यांना देण्यात आलं असून यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर त्या दिवसाचं हवामान आणि त्यानुसार पिकांना किती वेळी पाणी द्यायचं याबाबत सूचना मिळणार आहे.

****

मराठवाड्यात काल १८४ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 August 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्र...