Thursday, 7 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.10.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 October 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०७ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात भारतानं ज्या वैद्यकीय सुविधा निर्माण केल्या, त्यातून देशाचं सामर्थ्य दिसून आलं असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तराखंडमधल्या ॠषिकेश इथं ३५ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, पंतप्रधान मदत निधी अंतर्गत ऑक्सिजन संयंत्रं राष्ट्राला समर्पित केल्यानंतर, ते आज बोलत होते. यामुळे देशातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पीएसए ऑक्सिजन संयंत्रं उपलब्ध होणार आहेत. देशातल्या प्रत्येक भागात व्हेंटिलेटर्स सुविधा, कोविड लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन, सगळ्यात मोठी लसीकरण मोहिम, यामुळे आपल्या देशाची संकल्पशक्ती, सेवाभाव आणि एकतेचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचं काटेकोर पालन करणं सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वानी पार पाडली पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातली धार्मिक स्थळं आजपासून खुली झाली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबादेवी मंदीरात दर्शन घेतलं, त्यानंतर ते बोलत होते. सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त आणि पुजारी यांनी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात ठेवून, शिस्तबद्धरित्या दर्शनाची व्यवस्था केली. परिसराची वरचेवर स्वच्छता करणं, सुरक्षित अंतर ठेवणं, जंतूनाशकांचा वापर करणं, असं केलं तर एक चांगलं उदाहरण आपण घालून देऊ शकतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, शारदीय नवरात्रोत्सवाला आज घटस्थापनेपासून प्रारंभ झाला. औरंगाबाद शहरातल्या कर्णपुरा इथल्या भवानी मातेच्या मंदिरात आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं शहरातल्या गजानन महाराज मंदिराचं प्रवेशद्वार उघडून आणि आरती करून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या साईबाबा मंदीरात भाविक येण्यास सुरुवात झाली आहे. शिर्डी ग्रामस्थांकडून आलेल्या भाविकांचं स्वागत करण्यात येत आहे.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ९२ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ४३ लाख नऊ हजार ५२५ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या ९२ कोटी ६३ लाख ६८ हजार ६०८ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या २२ हजार ४३१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३१८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ३८ लाख ९४ हजार ३१२ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ४९ हजार ८५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल २४ हजार ६०२ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३२ लाख २५८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ४४ हजार १९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

राज्यात कोविड लसीकरणाच्या उद्द‍िष्ट पूर्तीसाठी कृती आराखडा तयार करुन आठ ते १४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये, ‘मिशन कवच कुंडल’ ही विशेष मोहिम राबवण्याचे निर्देश, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोविड लसीकरणाबाबत झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. या मोहिमेमध्ये विशेष करुन खाजगी रुग्णालयांचा सक्रिय सहभाग घ्यावा, जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनीधींचा सहभाग वाढवावा, असं ते म्हणाले.

****

उस्मानाबाद इथं राष्ट्रसेविका समिती आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं शहरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या पण प्रसिद्धीपासून वंचित राहत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा नवरात्रोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला. महिलांमध्ये सामाजिक जागृती व्हावी, महिला सामाजिक कार्यासाठी पुढे येऊन कटिबद्ध व्हाव्यात, या उद्देशानं कर्तृत्ववान महिलांना समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

****

गोंदिया जिल्ह्यात नक्षल्यांनी पुरून ठेवलेल्या स्फोटकाचा मोठा साठा पोलिसांनी हस्तगत केला. गडचिरोली आणि गोंदियाचे पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनात काल ही कारवाई करण्यात आली. अंदाजे ६७ डेटोनेटर, २३ जिलेटीन रॉड आणि वायरसह अन्य विस्फोटक साहित्य पोलीसांनी हस्तगत केलं.

****

भारतीय महिला कुस्तीपटू अंशु मलिक हिनं काल नॉर्वेमध्ये सुरू असलेल्या वरिष्ठ गटातील जागतिक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयासह तिनं या स्पर्धेत भारताचं पहिलं पदक निश्चित केलं आहे. आज तिचा सामना अमेरिकेच्या कुस्तीपटू हेलन मोरोलिसशी होईल. दरम्यान, 59 किलो वजनी गटात भारताच्या सरिता हिला मात्र उपांत्य फेरीत बल्गेरियच्या खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागला.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला क्रिकेट संघात आजपासून क्विन्सलॅंड इथं तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतला पहिला सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दोन वाजून दहा निमिटांनी हा सामना सुरु होईल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...