Thursday, 7 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.10.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 October 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-19ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      देशभरात सात मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्या तसंच रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय

·      उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथल्या घटनेविरोधात राज्यातल्या महाविकास आघाडीचा ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंद

·      गारपीट आणि अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी, शेतकऱ्यांना मदतीचं वाटप करण्यासाठी, १२२ कोटी रूपयांचा निधी मंजूर

·      अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनानं तात्काळ विशेष पॅकेज जाहीर करण्याची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची मागणी

·      नळदुर्ग इथल्या घरकुल घोटाळा प्रकरणातील दोन माजी नगराध्यक्षासह आठ जणांचा टकपूर्व जामिन अर्ज सर्वोच्य न्यायालयानं फेटाळला

आणि

·      शारदीय नवरात्रोत्सवाला आज घटस्थापनेनं प्रारंभ, कोविड पार्श्वभूमीवर बंद असलेली राज्यातली धार्मिक स्थळं भाविकांना दर्शनासाठी खुली

****

देशभरात सात मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत अधिक माहिती देताना, पीएम मित्रा योजनेअंतर्गत या टेक्सटाईल पार्कच्या उभारणीसाठी आगामी पाच वर्षांत चार हजार ४४५ कोटी रुपये खर्च येणार असल्याचं सांगितलं.

केंद्र सरकानं रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकेतच्या आधारावर ७८ दिवसांचा बोनस जाहीर केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. रेल्वेच्या सुमारे ११ लाख ५६ हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

****

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथल्या घटनेविरोधात राज्यातल्या महाविकास आघाडीनं ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली.  

दरम्यान, या हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून दखल घेतली आहे. आज यासंदर्भात न्यायालयात सुनावणी होणार आहे. या हिंसाचारात चार आंदोलन शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

****

लखीमपूर खेरी घटनेत शेतकऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूसंदर्भात राज्य मंत्रिमंडळानं एक ठराव संमत करून खेद व्यक्त केला.  मंत्रिमंडळानं दोन मिनीट उभं राहून मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचं सक्षमीकरण करण्याचा तसंच समाजकार्य महाविद्यालयातले शिक्षक तसंच शिक्षक समकक्ष संवर्गांना, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतन देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.

****

राज्यातील सहा जिल्हा परिषद आणि ३८ पंचायत समित्यांमधल्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीची काल मत मोजणी झाली. अकोला जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागांवर आणि भाजपला एकाच जागेवर समाधान मानावं लागलं, तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले.

धुळे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत, १५ पैकी आठ जागांवर भाजपची सरशी झाली, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळाला.

नंदूरबारमधल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत ११ पैकी चार जागा भाजपला, तीन शिवसेना, तीन काँग्रेस तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आहे. तर नंदुरबार पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप चार, शिवसेना पाच, काँग्रेस तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक जागा मिळवली आहे.

 

पालघर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी पाच उमेदवार निवडून आले. भाजपचे ४ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा १ उमेदवार निवडून आला. पंचायत समितीवरही शिवसेनेचे पाच उमेदवार निवडून आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन, भाजपला तीन, मनसेला एक आणि बहुजन विकास आघाडीला तीन जागा मिळवण्यात यश आलं.

 

नागपूर जिल्हा परिषदे१६ पैकी नऊ जागा सत्ताधारी कॉंग्रेस पक्षानं जिंकल्या. भाजपनं तीन, राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन, शेतकरी कामगार पक्ष आणि गोंडवाना गणतंत्र पक्षानं, प्रत्येकी एक जागा जिंकली. पंचायत समितीच्या ३१ गणांपैकी, काँग्रेसनं २१, भाजप सहा, राष्ट्रवादी काँग्रेस दोन, तर बहुजन समाज पक्ष आणि गोंडवाना गणतंत्र पक्षानं प्रत्येकी एक जागा जिंकली.

वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं पाच, काँग्रेस, भाजपा, आणि वंचित आघाडी प्रत्येकी दोन, तर शिवसेना आणि जनविकास आघाडी यांना प्रत्येकी एक जागा मिळाली, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

****

नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्ष रेखा ठाकुर यांनी ही माहिती दिली.

****

मराठवाड्यात काल १०५ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या चार, तर औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात काल ३७ नवे रुग्ण आढळले. बीड २२, औरंगाबाद २१, लातूर १८, परभणी तीन, तर जालना आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.

****

परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यानं तालुक्यात सर्व धार्मिक स्थळं, शाळा, आठवडी बाजार, अशा गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. यादरम्यान प्रशासनानं सर्वतोपरी खबरदारी घ्यायची असून, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असं आवाहन, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी आरोग्य यंत्रणांना तीव्र शब्दात सूचना देऊन, सतर्कतेचा इशारा दिला आहे.

****

मार्च, एप्रिल तसंच मे २०२१ या कालावधीत, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागात गारपीट आणि अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी, शेतकऱ्यांना मदतीचं वाटप करण्यासाठी, १२२ कोटी २६ लाख ३० हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. मंजूर निधीपैकी औरंगाबाद विभागासाठी, १५ कोटी ५१ लाख ५४ हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. हा निधी विभागीय आयुक्तांमार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

****

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य शासनानं तत्काळ विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केली आहे. काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणेचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात केंद्र सरकारकडून ही मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं, कराड यांनी सांगितलं. ते म्हणाले...

जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. आणि ही अतिवृष्टी वारंवार झालेली आहे. मराठवाड्याला राज्यशासनाने विशेष पॅकेज दिलं पाहिजे. आणि मराठवाड्याचं जे नुकसान झालेलं आहे. नुकसान भरपाई म्हणून ताबडतोब पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी अशी आमची मागणी आहे. जर शेतकऱ्याला मदत झाली नाही तर रब्बी पिक जे पंधरा वीस दिवसांनी पेरणी करावी लागते तर ते शेतकरी रब्बी पिक सुद्धा घेऊ शकणार नाहीत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात दाऊतपुर, इर्ला, काजळा आणि रामवाडी इथं झालेल्या नुकसानीची खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल पाहणी दिली. राज्य सरकारनं राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी वार्ताहरांशी बोलतांना केली.

****

औरंगाबाद शहरासह परिसरात काल दुपारी तीन वाजेनंतर विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. जिल्हा न्यायालयाच्या आवारातल्या वाहनतळातली झाडं उन्मळून पडल्यानं, काही चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचं नुकसान झालं. औरंगाबाद - पुणे महामार्गावरही झाडं महामार्गावर उन्मळून पडली. 

जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल दुपारी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग इथल्या घरकुल घोटाळा प्रकरणातल्या, दोन माजी नगराध्यक्ष, एक माजी उपनगराध्यक्ष, आणि मुख्याधिकाऱ्यासह आठ जणांचा टकपूर्व जामिन अर्ज सर्वोच्य न्यायालयानं फेटाळला आहे. सन २००५ मध्ये नळदुर्ग शहरात एक हजार २०६ घरकूल बांधण्याची ही योजना मंजूर झाली होती, मात्र केवळ ३०० घरं बांधून उर्वरित निधी संगनमतानं हडप करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं या प्रकरणात, आरोपींवर गुन्हा दाखल करुन, त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम व्याजासह वसुल करण्याचे आदेश दिले होते, या निर्णयाला आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. 

****

शारदीय नवरात्रोत्सवाला आज घटस्थापनेपासून प्रारंभ होत आहे. त्यासोबतच कोविड पार्श्वभूमीवर बंद असलेली राज्यातली धार्मिक स्थळं आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुली झाली आहेत. नवरात्रोत्सवादरम्यान, गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. याऐवजी आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन, विविध आजारांबाबत जनजागृती करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा पूर्ण होऊन पहाटेच्या सुमारास देवी सिंहासनारूढ झाली.

नांदेड जिल्ह्यात माहूर गडावर रेणुका देवी मंदिरातही घटस्थापनेपासून विविध धार्मिक अनुष्ठानांना प्रारंभ होत आहे.

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं योगेश्वरी मंदीरही आजपासून दर्शनासाठी खुलं होत आहे.

औरंगाबाद शहरातल्या कर्णपुरा, हरसिद्धी देवींच्या मंदिरात सजावट करण्यात आली आहे.

****

नांदेड इथले प्रसिद्ध चित्रकार नयन बारहाते यांचं काल नांदेड इथं निधन झालं, ते ६१ वर्षांचे होते. अनेक पुस्तकांना मुखपृष्ठ देणारे बारहाते हे सर्जनशील कलावंत होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

हवामान -

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला राजस्थान, गुजरातच्या काही भागातून कालपासून सुरवात झाली. उत्तर आणि मध्य भारतातल्या काही भागातून परतीसाठी पुढचे २४ तास अनुकूल असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. राज्यात येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि माठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...